रत्नागिरी : अरबी समुद्रातून कोकण किनारपट्टीच्या समांतर वाटचाल करीत असलेल्या तौते चक्रीवादळाने गती बदलल्याने त्याचे रूपांतर अतितीव्र चक्रीवादळात झाले. त्याचा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यालगत असणाऱ्या राजापूर, रत्नागिरी तालुक्यातील जवळपास सर्वच गावांना बसला. यामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या प्राथमिक आढाव्यात हे स्पष्ट झाले.
आज दुपारी साधारण १२ च्या सुमारास वादळाने रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश केला. त्यानंतर वाऱ्याचा वेग ताशी १३० किलोमीटरपर्यंत वाढल्याने मोठ्या प्रमाणावर झाडांच्या फांद्या तुटणे, झाडे उमळून पडणे, विजेचे खांब आणि तारा तुटुन विद्युत पुरवठा खंडित होणे असे प्रकार घडले. प्राथमिक माहितीनुसार रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यात काही घरांची पडझड झाली आहे. तथापि जीवितहानीचे वृत्त नाही. आज मध्यरात्रीच्या दरम्यान वादळा जिल्ह्यातून उत्तरेकडे सरकेल, असा अंदाज आहे.
जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनांतर्गत करण्यात आलेल्या नियोजनामुळे राजापूर तालुक्यात कच्च्या घरात राहणाऱ्या ६५२ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वाऱ्याचा वेग ताशी १२० किमीपर्यंत वाढण्याचा अंदाज लक्षात घेऊन तत्काळ नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्याचे काम प्रशासनाने केले. रत्नागिरी शहर, राजापूर तालुका, साखरीनाटे, आंबोळगड, मुंबई-गोवा महामार्ग तसेच किनाऱ्यालगतच्या गावांत मोठ्या प्रमाणावर नारळी-पोफळीची झाडे पडली. वादळामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. एकूण नुकसानीचा अंदाज घेण्याचे काम सुरू आहे.

मोडून पडलेली झाडे हटवून पोलिसांनी केले रस्ते सुरळित
ते चक्रीवादळाच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने सर्वत्र मदत आणि बचावकार्य केले आहे. प्रामुख्याने रस्त्यात मोडून पडलेली झाडे ताबडतोब हटवून वाहतूक सुरळित करण्याचे मोठे कार्य पोलिसांनी केले.
जिल्हा पोलिसांकडून किनारपट्टी भागातील गावात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या कालावधीत मच्छीमारांनी समुद्रात बोटी घेऊन जाऊ नये. इतर नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले होते. तोक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी सकाळपासून बंदोबस्त आणि गस्त पथके कार्यरत होती. दुपारनंतर रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार वादळी पाऊस सुरुवात झाली. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये झाडे पडून नुकसान झाले. अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यावर झाडे पडून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. पोलीस दलाने स्वतःकडील उपलब्ध साहित्याचा वापर करून ग्रामस्थांच्या मदतीने ती झाडे तात्काळ दूर करून रस्ता वाहतुकीस सुरळीत केला.
जिल्हा पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग यांनी स्वतः रत्नागिरीजवळ मिरजोळे, नाचणे येथे जाऊन पडझड झालेल्या ठिकाणी भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली. नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले. पूर्णगड पोलीस ठाणे हद्दीत कोळंबे रस्त्यावर मोठे झाड पडले होते. अधीक्षकांनी स्वतः पूर्णगड पोलीस ठाण्याच्या मदतीने झाड दूर करून रस्ता वाहतूक सुरळीत केला. देवरूख पंचायत समितीसमोर भलेमोठे झाड कोसळले. देवरूखचे पोलीस निरीक्षक श्री. जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ झाड दूर करून रस्ता सुरळित केला. देवरूख येथील मात्र मंदिर येथे पडलेले झाडही पोलिसांनी तत्काळ जाऊन दूर केले. नाटे ते पावस रस्त्यावर झाड पडून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. पूर्णगड पोलिसांनी ते दूर केले. दापोली पोलिसांनी महसूल विभागाच्या सूचनेनुसार किनारपट्टी भागातील केळशी, हर्णै, अडखळ, आडे, उटंबर, पाडले, आंजर्ले, पाज, पाळंदे गावातील लोकांना अन्य सुरक्षित ठिकाणी हलविले. संगमेश्वर तालुक्यातील कारभाटले गावातील रस्त्यावर पडलेले झाडही संगमेश्वर पोलिसांनी हटविले. नाटे पोलीस ठाण्याचे हद्दीतील किनारपट्टी भागातील गावातील लोकांना चक्रीवादळाचा धोका होऊ नये म्हणून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याकरिता नाटे पोलिसांनी मदत केली. रत्नागिरी शहराजवळील भाट्ये गावातील रस्त्यावर पडलेले झाड रत्नागिरी पोलिसांनी दूर केले. संगमेश्वर डिंगणी रस्त्यावरील झाड, दापोली तालुक्यातील लाडघर रस्त्यावरील झाड, साखरपा- देवरूख मार्गावरील झाड, रत्नागिरी तालुक्यात वाटद रस्त्यावर पडलेले झाड, पूर्णगड हद्दीतीस गावखडी येथे रस्त्यावर पडलेले सुरूचे झाड दूर करून पोलिसांनी वाहतूक सुरळित करायला मदत केली.
मदतीसाठी संपर्क क्रमांक
या चक्रीवादळामुळे कोणालाही आपत्कालीन मदत आवश्यक असल्यास तात्काळ जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक (०२३५२) २२२२२२, २७१२५७, नियंत्रण कक्ष व्हॉट्स अॅप क्रमांक ८८८८९०५०२२ येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

