रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून १३ जूनपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्यातर्फे जारी करण्यात आलेल्या ताज्या बातमीपत्रानुसार या सर्व कालावधीत रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
या कालावधीत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून सोबतच मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
अतिवृष्टी, महापूर, भूकंप, त्सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्तींच्या वेळी प्रशासनाकडून नेहमी सतर्कतेचा इशारा दिला जातो. परिस्थितीच्या तीव्रतेनुसार ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड या चार प्रकारांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. अशा वेळी प्रत्येकाला एक प्रश्न पडतोच. तो म्हणजो ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट म्हणजे काय? नैसर्गिक संकटाच्या वेळीच तो का जारी केला जातो? रेड, ऑरेंज आणि यलो अॅलर्ट म्हणजे नेमके काय, याविषयीची माहिती हवामान विभागातर्फे देण्यात आली आहे.
ग्रीन अॅलर्ट – कोणतेही संकट नाही, सर्व काही ठीक आहे.
यलो अॅलर्ट – पुढील काही दिवसांमध्ये हवामानाच्या बदलामुळे संकट ओढवू शकते, अशी सूचना जारी करण्यात येते. दैनंदिन कामे रखडू शकतात. त्यामुळे सावधगिरी बाळगण्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात येतो.
ऑरेंज अॅलर्ट – कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते. येणाऱ्या संकटासाठी नागरिकांनी तयार राहावे म्हणून प्रशासनाकडून ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात येतो. वीजपुरवठा खंडित होणे, वाहतूक ठप्प होण्यासारखे प्रकार घडू शकतात. ही एक प्रकारे पुढच्या संकटाची तयारी असते. गरज असेल आणि महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा, असेही या अॅलर्टमध्ये सांगितले जाते.
रेड अॅलर्ट – नैसर्गिक आपत्ती ओढवल्यानंतर नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी रेड अॅलर्ट जारी करण्यात येतो. या अॅलर्टचा अर्थ लोकांनी स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवावे आणि धोकादायक भागात जाऊ नये, असा असतो. रेड अॅलर्टमध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये मोठे नुकसान होण्याची शक्यताही असते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

