रत्नागिरी जिल्ह्यात आता दर शनिवार-रविवारी लॉकडाउन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात करोना प्रतिबंधासाठी ब्रेक द चेन अंतर्गत सुरू असलेल्या कडक लॉकडाउनमध्ये १० जूनपासून काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. आता यापुढे दर शनिवार-रविवारी पूर्ण लॉकडाउन असेल, तर इतर दिवशी सायंकाळी पाच ते सकाळी पाच या वेळेत पूर्ण संचारबंदी लागू राहील. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी त्याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

राज्याच्या ब्रेक द चेन नियमांनुसार रत्नागिरी जिल्हा चौथ्या स्तरामध्ये येतो. त्याविषयीच्या सुधारित आदेशानुसार अत्यावश्यक सेवेशी संबंधित सर्व दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी चार या वेळेत सुरू राहतील. अत्यावश्यक सेवेच्या दुकानांमध्ये किराणा सामान, भाजीपाला, फळे, बेकरी, मिठाई, सर्व प्रकारची खाद्यपदार्थांची दुकाने, शासकीय विभाग आणि वैयक्तिक मान्सूनपूर्व कामकाजासाठी आवश्यक साहित्याची दुकाने यांचा समावेश असेल. ही दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी चार या वेळेत सुरू ठेवता येतील. अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने, मॉल्स, सिनेमागृहे, नाट्यगृहे बंद राहतील. रेस्टॉरंटमध्ये केवळ पार्सल सेवा सुरू ठेवता येईल. सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, चालणे आणि सायकलिंगसाठी सोमवार ते शुक्रवार या काळात सकाळी पाच नऊ वाजेपर्यंत मुभा राहील. मैदानी खेळांनाही हाच नियम लागू राहील. मेळावे, सामाजिक आणि सांस्कृतिक तसेच करमणुकीचे कार्यक्रम, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रम घ्यायला परवानगी राहणार नाही. लग्नसमारंभ जास्तीत जास्त २५ लोकांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी यांच्या पूर्वपरवानगीने आयोजित करता येतील. अंत्ययात्रेसाठी जास्तीत जास्त २० लोकांना उपस्थित राहता येऊ शकेल. कामाच्या ठिकाणी राहण्याची सोय असलेली बांधकामे सुरू राहतील. शेती आणि शेतीशी संबंधित सेवा आठवडाभर दररोज सकाळी ९ ते सायंकाळी चार या वेळेत सुरू राहतील. अत्यावश्यक सेवेत मोडणार्याे ई-कॉमर्स सेवा सुरू राहतील. व्यायामशाळा, केशकर्तनालये, ब्यूटी पार्लर्स, स्पा सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत सुरू ठेवता येतील. या सेवा सुरू ठेवायला परवानगी देण्यात आली असली, तरी त्या ठिकाणी करोनाशी संबंधित मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे आणि सुरक्षित अंतर पाळणे अत्यावश्यक असेल. करोनाविषयक लसीकरण केलेल्यांनाच तेथे सेवा देता येतील.

मालवाहतूक नियमित सुरू राहील. प्रवाशांचा आंतरजिल्हा प्रवास, खासगी वाहने, टॅक्सी, बसेस, लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवाही सुरू राहतील. रत्नागिरी जिल्हा चौथ्या स्तरात असून पाचव्या स्तरातील जिल्ह्यातून येण्या-जाण्यासाठी ई-पास बंधनकारक असेल. इतरांना ते बंधन असणार नाही.

सुरुवातीला केवळ १० जूनचा दिवसच सूट मिळणार

संचारबंदीच्या नियमांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात नवे नियम लागू होणार असले तरी नागरिकांना केवळ १० जून या एकाच दिवशी सूट मिळणार आहे. कारण ११ आणि १२ जून या दिवशी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे तसेच १३ जून रोजी रविवार असल्यामुळे तिन्ही दिवशी संचारबंदी लागू राहणार आहे. नागरिकांना कडक लॉकडाउन संपल्यानंतर केवळ दहा जून हा एकच दिवस सूट मिळणार आहे. त्यानंतरची सूट १४ जूननंतरच मिळणार आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply