सिंधुदुर्गात नव्या करोनाबाधितांची संख्या पाचशेहून अधिक

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज, ९ जून रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ५४८ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले. गेले अनेक दिवस जिल्ह्यातील नव्या बाधितांची संख्या पाचशेहून अधिक आहे. दरम्यान, जिल्हा आरोग्य विभागाच्या ताफ्यात आज सहा रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत.

सध्या जिल्ह्यात ६ हजार ९३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज चौघांच्या दुबार तपासणीसह ५४८ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ६७, दोडामार्ग – १९, कणकवली – १०४, कुडाळ – ७४, मालवण – ११३, सावंतवाडी – ३५, वैभववाडी – ५२, वेंगुर्ले – ८४.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ११४३, दोडामार्ग २८५, कणकवली १०९०, कुडाळ १२९८, मालवण १३५६, सावंतवाडी ८४७, वैभववाडी २९५, वेंगुर्ले ५९६, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २५. सक्रिय रुग्णांपैकी ३४५ रुग्ण ऑक्सिजनवर तर ४२ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज जिल्ह्यात आधीच्या २ आणि आजच्या १२ अशा १४ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ८०३ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृतांचा तपशील असा – देवगड २, कुडाळ ३, मालवण २, सावंतवाडी ५, वैभववाडी १, वेंगुर्ले १.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड ११०, दोडामार्ग – २५, कणकवली – १६३, कुडाळ – १२३, मालवण – १३१, सावंतवाडी – १२८, वैभववाडी – ५५, वेंगुर्ले – ६५, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ३.
……….
सहा रुग्णवाहिकांचे ऑनलाइन लोकार्पण

जिल्हा खनिकर्म निधीमधून प्राप्त झालेल्या सहा रुग्णवाहिकांचे आज, ९ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण करण्यात आले. जिल्हा खनिकर्म निधीमधून जिल्ह्यात एकूण १२ रुग्णवाहिका जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. त्यापैकी ६ रुग्णवाहिका यापूर्वीच प्राप्त झाल्या असून रुग्णांच्या सेवेत त्या दाखल झाल्या आहेत. आज आणखी ६ रुग्णवाहिकांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संजना सावंत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर ऑनलाइन सहभागी झाले होते. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, अमरसेन सावंत, आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, जान्हवी सावंत आदी प्रत्यक्ष उपस्थित होते.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रुग्णवाहिकांची पूजा करण्यात आली. यावेळी आमदार दीपक केसरकर म्हणाले, प्राथमिक आरोग्य केंद्रांना नवीन रुग्णवाहिका मिळाल्याचे समाधान आहे. पण सध्या असलेल्या जुन्या रुग्णवाहिकाही कार्यान्वित ठेवण्यात याव्यात. त्यातील काही रुग्णवाहिकांचा वापर शववाहिका म्हणून करावा.

आमदार वैभव नाईक म्हणाले, जिल्हा खनिकर्मचा निधी जिल्ह्यात खर्च करायला परवानगी दिल्याबद्दल अर्थमंत्री अजित पवार यांचे आभार मानतो. या निर्णयामुळेच जिल्ह्याला आज इतक्या मोठ्या प्रमाणावर रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी प्रास्ताविक केले.
……….

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply