रत्नागिरीच्या विकासाच्या विविध मुद्द्यांवर नारायण राणेंशी चर्चा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील विकासाच्या विविध मुद्द्यांवर भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी त्यांच्या नुकत्याच झालेल्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान चर्चा केली. श्री. राणे यांनी रत्नागिरीच्या विकासबाबत काही सूचनाही केल्या.

एमआयडीसीच्या रिक्त जागांवर उद्योग सुरू व्हावेत, दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी एम्सची स्थापना, सरकारच्या योजनांचा लाभ अर्बन को-ऑप बँक, मध्यवर्ती बँकांमधून द्यावा, काजूला जीआय मानांकन, भूमिगत वीजवाहिन्यांचे प्रलंबित काम, प्रवासी विमानवाहतूक अशा विविध मुद्द्यांवर श्री. पटवर्धन यांनी चर्चा केली. त्यावर श्री. राणे यांनी सकारात्मक विचार मांडले. श्री. पटवर्धन यांनी श्री. राणे यांना दिलेल्या निवेदनातील महत्त्वाचे मुद्दे असे – रत्नागिरी शहरानजीकच्या औद्योगिक विकास महामंडळाच्या रिकाम्या जागेत नवीन औद्योगिक प्रकल्प सुरू व्हावेत, जेणेकरून सुशिक्षित, उच्चशिक्षित तरुणांचे भवितव्य उज्ज्वल होईल. त्यांना संधी उपलब्ध होतील. स्टरलाइट प्रकल्पाची जागा गेली अनेक वर्षे पडीक आहे. त्यातील अन्य जागाही पडीक आहे. तेथे मोठा औद्योगिक प्रकल्प सुरू करण्यासाठी शासकीय पातळीवर निर्णय व्हावा.

केंद्र शासनाच्या विविध योजना लघु आणि मध्यम उद्योगांसाठी सुरू आहेत. त्या राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत राबवल्या जातात. मात्र राष्ट्रीयीकृत बँकांचे अधिकारी, कर्मचारी यांना स्थानिक युवकांसंदर्भात अजिबात आस्था नसल्याने त्यांचा दृष्टिकोन नकारात्मक असतो. परिणामी नवे उद्योजकांना आर्थिक सेवांचा लाभ अत्यल्प प्रमाणात होतो. त्यावर उपाय म्हणून अर्बन को-ऑप बँका, मध्यवर्ती सहकारी बँका यांच्यामार्फतही केंद्र शासनाच्या योजना राबवल्या जाव्यात. अर्बन को-ऑप बँक, मध्यवर्ती बँकाचे अधिकारी, कर्मचारी, संचालक मंडळ स्थानिक असते. स्थानिक परिस्थितीशी जोडलेले असते. स्थानिक लोकांबद्दल त्यांना आस्था असते. त्याचा लाभ घेऊन उद्योजकांना केंद्र शासनाच्या उपयुक्त कर्जयोजनांचा लाभ देता येईल. केंद्र शासनाच्या उद्योजकांसाठी आणि औद्योगिक प्रकल्पासाठी असलेल्या विविध अर्थसाह्य योजना अर्बन को-ऑप तसेच मध्यवर्ती बँकांमार्फत राबवल्या जाण्यासाठी धोरणात्मक निर्णय करावा.

रत्नागिरीमध्ये केंद्र शासनाच्या योजनेतून भूमिगत वीजवाहिन्यांसाठी निधी मंजूर असून काम अत्यल्प प्रमाणात सुरूही झाले आहे. मात्र सध्या हे काम बंद आहे. त्यामुळे सतत शहर आणि परिसरातील वीजवहनामध्ये अडथळा येऊन पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होतो. नागरिकांनी त्याचा अनन्वित त्रास आणि व्यावसायिक, उद्योजकांना प्रचंड तोटा सोसावा लागतो. वादळी वारे, मुसळधार पाऊस असल्याने भूमिगत वीजजोडणी झाली तर वीजपुरवठा अखंड सुरू राहील. त्यासाठी केंद्र सरकारने निधीही मंजूर केला आहे. कामही सुरू झाले होते. मात्र जाणीवपूर्वक ते काम थांबविण्यात आले. ते काम केंद्राच्या योजनेतले असल्याने ते तात्काळ सुरू होऊन पूर्ण व्हावे असे निर्देश देऊन शहर आणि परिसरातील जनतेचा दुवा घ्यावा. कुवारबाव सबस्टेशन ते हार्बर सबस्टेशन भूमिगत वाहिन्या टाकण्याकरिता निधी मंजूर असूनही ते काम अर्धवट आहे. फिनोलेक्स कॉलनी ते पांढरा समुद्र ही वीजवाहिनी टाकून झाली. मात्र पांढरा समुद्र ते हार्बर सबस्टेशन तसेच फिनोलेक्स कॉलनी ते कुवारबाव सबस्टेशन हे काम होत नाही. त्यामुळे वीजपुरवठ्यात खंड पडतो. ही योजना तात्काळ पूर्णत्वास नेण्याचे निर्देश संबंधितांना द्यावेत.

रत्नागिरी विमानतळ कोस्टगार्डच्या ताब्यात आहे. विमानतळाच्या नूतनीकरणाचे कामही बहुतांशी झाले आहे. मात्र अजून प्रवासी वाहतुकीची विमानसेवा सुरू होऊ शकलेली नाही. रत्नागिरीत ३० वर्षांपूर्वी वायुदूत कंपनीची विमानसेवा सुरू होती. आता धावपट्टीचे काम पूर्णत्वाला जाऊनही विमानसेवा सुरू होत नाही. रत्नागिरी-मुंबई, रत्नागिरी-पुणे इत्यादी महत्त्वाच्या शहरांमध्ये जलद जा-ये करण्यासाठी विमानसेवेच्या प्रतीक्षेत येथील जनता आहे. ही सुविधा रत्नागिरीकरांसाठी लवकर उपलब्ध व्हावी.

रत्नागिरीतील काजूला जीआय मानांकत प्राप्त व्हावे. रत्नागिरीतील काजू उत्पादक मोठ्या संख्येने काजू बीचे उत्पादन करतात. काजू उद्योगाच्या गतिमानतेने मोठे अर्थकारण सक्रिय होऊ शकते. रत्नागिरी काजूची प्रत उत्तम आहे. या काजूला मानांकन प्राप्त झाले तर काजू उत्पादनाला आंतरराष्ट्रीय बाजारात आपली जागा प्राप्त होईल. त्याचा उचित लाभ येथील उत्पादकाला होऊन रत्नगिरी अल्फान्सोप्रमाणे रत्नागिरी कॅश्यूही अग्रेसर होऊन अर्थकारणाला गतिमानता येईल.

करोना महामारीमुळे हॉटेल, लॉजिंग तसेच पर्यटन व्यवसायांची हलखीची स्थिती झाली आहे. हॉटेल, लॉजिंग आणि पर्यटन उद्योग सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्याशी निगडित आहेत. त्यांना करोना संकटामधून परत उभे राहण्यासाठी व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी स्वतंत्र अल्प व्याज दराचे कर्ज उपलब्ध व्हावे. तसेच पुढील ५ वर्षे त्यांना आयकर सवलत द्यावी. त्यांच्या असलेल्या कर्जाचे रिशेड्युलिंग करून गतवर्षाचे आणि चालू वर्षाचे व्याज माफ करून मिळावे.

रत्नागिरी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी इंटरनेटचे नेटवर्क, कनेक्टिव्हिटी चांगली नाही. अनेक ठिकाणी सातत्याने रेंज नसते. किंबहुना अनेक गावे नेटवर्क कनेक्टिव्हिटी नसलेली आहेत. त्यामुळे विद्यार्थीवर्ग, युवावर्ग नव्या युगापासून तोडला गेला आहे. नेट कनेक्टिव्हिटी नसल्याने अभ्यासामध्येही व्यत्यय येत आहे. केंद्र शासनाच्या विविध योजनांचे लाभार्थी होतानाही अडचणी येत आहेत. संपर्कात व्यत्यय येत आहे. या सर्वांचा विचार करून रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र नेटवर्क उपलब्ध व्हावे, यासाठी संबंधित यंत्रणेला निर्देश द्यावेत.

रत्नागिरी जिल्ह्यात एम्स्चे हॉस्पिटल मंजूर करण्यात यावे. जिल्ह्यात आरोग्य सुविधा अत्यंत अपुऱ्या आहेत. असलेल्या सुविधा दर्जात्मक नाहीत. रत्नागिरीपासून अन्य मोठ्या शहरांचे अंतर दूरचे आहे. त्यामुळे रुग्णांना योग्य ट्रीटमेंट तसेच क्लिष्ट शस्त्रक्रिया यासाठी खूप त्रास आणि खर्च सोसावा लागतो. अशा स्थितीमुळे अनेकांना आपले जीव गमावले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात एम्स्चे हॉस्पिटल तसेच मेडिकल कॉलेज निर्माण होणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी पुढाकार घेऊन या दोन्ही गोष्टी रत्नागिरी जिल्ह्यात सुरू व्हाव्यात, यासाठी आग्रहपूर्वक प्रयत्न करावेत.

रत्नागिरी-मुंबई राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जलदगतीने पूर्णत्वास जाणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील लांजा ते चिपळूण या भागातील काम ठप्प आहे. रस्त्याची स्थिती दयनीय असल्याने प्रवाशांना व वाहनांना खूप त्रासदायक होत आहे. गेली ५ वर्षांपेक्षा अधिक काळ हा राष्ट्रीय महामार्ग विदीर्ण अवस्थेत आहे. पुढील पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्णत्वाला जाईल, असे पाहणे आवश्यक आहे. रस्त्यांच्या कामाचा विषय प्राधान्याने घेऊन तो पूर्णत्वास जाईल असे पाहावे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply