सैन्यात भरती होण्याची आवश्यकता पटवून देणारा कार्यक्रम

गोळप (ता. रत्नागिरी) येथे गोळप कट्टा नावाची सांस्कृतिक चळवळ गेली चार वर्षे सुरू आहे. चळवळीच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात निवृत्त सैनिक सुरेश गवाणी यांनी सैन्यभरतीचे महत्त्व पटवून दिले.
……….

मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा “गोळप कट्टा” सुरू झाला. प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी सुरू असलेला हा उपक्रम! वेगवेगळ्या क्षेत्रातील अनुभवी आणि कर्तृत्ववान व्यक्तींची आपण या कार्यक्रमातून ओळख करून घेतो.. आताचा, म्हणजे २० नोव्हेंबर २०२१ रोजी झालेलाकार्यक्रम पंचविसावा म्हणजे रौप्य महोत्सवी होता. कार्यक्रमाला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळचे पाहुणे होते सैन्यात २८ वर्षे सेवा करून निवृत्त झालेले रुबाबदार व्यक्तिमत्त्वाचे, जाज्वल्य देशाभिमानी, नसानसातून देशप्रेम वाहत असलेले सुरेश गवाणी. सध्या ते फिनोलेक्स कंपनीमध्ये सुरक्षा अधिकारी म्हणून आता कार्यरत आहेत. आपला सगळा प्रवास सांगताना त्यांनी सैन्यभरतीचे महत्त्व पटवून दिले. श्री. गवाणी यांच्या निवेदनाचा संपादित स्वरूपातील गोषवारा त्यांच्याच शब्दांत.
००००००००००

आमचे मूळ गाव बसर्गे, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर. लहानपणी गावात जवळपास दोनशे लोक सैन्यात होते. त्यातील कोणी सैनिकांचा ड्रेस घालून गावात आला की त्यांचा आदर्श वाटायचा, आपणही सैन्यात जावे, असे वाटायला लागले. तशी जिद्द निर्माण झाली. सैन्यदलात जाण्याची अवघड शारीरिक परीक्षा शेतकरी असल्याने जिद्दीने आणि कष्टाने पार पाडली. सैन्यदलात अवघड, खडतर प्रशिक्षण मिळाले, कसम परेडमध्ये तिरंगा हातात घेऊन शपथ घेतली की घर, आईबाबा, कुटुंब यापेक्षा देश मोठा आणि माझं कर्तव्य मोठं..

निवडीनंतर विविध ठिकाणी सेवा करायला मिळाली. त्यात बारामुल्ला, उरी, सियाचीन, आसाम, अरुणाचल प्रदेश, भूतान, राजस्थान, श्रीलंका इत्यादी ठिकाणी काम केले. काश्मीरमध्ये दोन वेळा जिवावरचा प्रसंग येऊन गेला. एकदा चार दहशतवाद्यांशी समोर सामना झाला. आमचे तीन सैनिक त्यात शहीद झाले. मात्र त्या चौघांना मारण्यात आम्ही यशस्वी झालो. मात्र समोर लढताना गोळी कधी लागेल आणि कधी मरण येईल हे सांगता येत नव्हते. घरी परत जाऊ, असे वाटत नव्हते. एकदा बर्फात ड्युटी करताना बर्फ कोसळून आमचे सगळे सामान गाडले गेले. तब्बल चार दिवस खायला काही नाही, अशी स्थिती बेतली होती. मात्र सुखरूप राहिलो. सैन्यात काम करताना सगळी शस्त्रे वापरावी लागली.

लोकांना “दुरून डोंगर साजरे” वाटतात. मात्र सैनिकांच्या त्यागाची, कष्टाची, त्यांच्या सेवेची आपण कल्पना करू शकत नाही. आपली कल्पना आणि प्रत्यक्ष सैनिक करत असलेले काम यात प्रचंड फरक आहे. पूर्ण सेवेमध्ये माझ्यापेक्षा जास्त त्याग माझ्याशी संसार करताना माझ्या पत्नीने केला आहे. तिचा त्याग श्रेष्ठ आहे.
००००००००

श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी सैन्यदलातील विविध बटालियनची ओळख सांगून तशी नावे का पडली ते सांगितले. मिळालेल्या आठ पदकांचे महत्त्व सांगितले. साधा शिपाई ते सैन्यदलाचे प्रमुख यांच्या पोशाखांतील वैशिष्ट्य सांगितले, खडतर ट्रेनिंग काळातील आणि प्रत्यक्ष ड्युटीवर असणारा दिनक्रम सांगितला. एनसीसी, अर्धसैनिक दल, केंद्रीय राखीव दल, सैनिक इत्यादीमधील फरक सांगितला, बर्फामधील धोकादायक करवत बर्फ आणि विषारी बर्फ याबद्दल माहिती देऊन त्याचे भयंकर रूप उलगडून सांगितले. सैन्यात एक सैनिकामागे तीन सैनिक अन्नधान्य, शस्त्र इत्यादींचा पुरवठा करण्यासाठी असतात. सैन्यातील नोकरीमधील शॉर्ट सर्व्हिस, कमिशन इत्यादी विविध प्रकारांची माहिती त्यांनी दिली. शिस्त हा सैनिक आणि सामान्य नागरिक यांच्यातील मुख्य फरक आहे. आयुष्यात शिस्त आणि वक्तशीरपणा असेल, तरच प्रगती होईल हे सांगताना आळस ही गोष्ट आपले आयुष्य बदलून टाकते. प्रत्येकाने आळसावर मात केली पाहिजे तर तो देशाचा उत्तम नागरिक बनेल असेही त्यांनी सांगितले. आतंकवादी कितीही प्रयत्न करत राहिले तरी भारत अखंड होता आणि राहील. त्याला तोडण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, हे त्यांनी ठासून सांगितले. कधी परिस्थितीमुळे रजा मिळत नाही. मी एकदा चौदा महिन्यांनी घरी आल्यावर माझ्या लहान मुलीने मला ओळखले नाही, हे सांगताना त्यांच्यातील पिता हळवा झाला होता. पण त्या भावनेपेक्षा एक सैनिक आपले कर्तव्य श्रेष्ठ मानतो आणि देशसेवेपुढे माझे दुःख काहीच नाही, हे त्यांनी त्यांच्या देहबोलीतून सांगितले. हे सारे ऐकताना, विचार करून बघताना सैनिक का श्रेष्ठ आहे, याची जाणीव श्रोत्यांना झाली. एक वर्षाच्या ट्रेनिंगमध्ये सैनिक घडवला जातो. त्याची मानसिकता पूर्ण बदलली जाते. त्यांच्यामध्ये प्रचंड देशाभिमान निर्माण केला जातो, शारीरिक कणखरता आणि मानसिक कणखरता बनवली जाते. तसेच आपल्याला कुटुंबातील प्रत्येक गोष्ट एकमेकांना, सहकाऱ्यांना सांगायची. सगळ्या भावना शेअर करायची, हे सारे शिकवले जाते. त्यामुळे प्रत्येक जण कुटुंबापासून दूर असूनही सेवाकाळात मानसिकदृष्ट्या खंबीर बनलेला असतो.

जास्तीत जास्त तरुणांनी सैन्यात भरती व्हावे, यासाठी जमतील ती सगळी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. सैन्यात जाण्याची मानसिकता बनवण्यासाठी उपक्रम घेतल्यास मार्गदर्शन करण्याची तयारीही त्यांनी दाखवली. माजी सैनिक असलो तरी काही गोष्टी प्रमाणातच सांगायच्या असतात. ती मर्यादा राखून आपल्या अनुभवाचा खजिना श्रोत्यांसमोर रिता केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकले.

सैनिक नेमके काय करतात, त्यांचे खडतर आयुष्य, त्याग, देशप्रेम, सैनिकांचे श्रेष्ठत्व इत्यादी गोष्टी श्रोत्यांना मनापासून जाणवल्या.
गोळप कट्टा या उपक्रमात एका वेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती अनुभवायला मिळाली. आता पुढील महिन्यात तिसऱ्या शनिवारी पुन्हा भेटू एका वेगळ्या पाहुण्यांबरोबर!

  • अविनाश काळे
    (संपर्क : ९४२२३७२२१२)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply