रत्नागिरी : वर्ष संपत आलं, की नव्या वर्षाच्या दिनदर्शिकेचे अर्थात कॅलेंडरचे वेध लागतात. केवळ तारीख, वार, वर्ष, तिथी एवढंच प्रसिद्ध करणारी कॅलेंडर्स आता जवळपास इतिहासजमा झाली आहेत. कारण गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळे विषय, थीम्स घेऊन कॅलेंडर्स तयार करण्याचा ट्रेंड आहे. खाद्यसंस्कृतीपासून निसर्गसौंदर्यापर्यंत आणि फॅशन मॉडेल्सपासून गड-किल्ल्यांपर्यंत किती तरी वेगवेगळ्या विषयांचे फोटोज असलेली कॅलेंडर्स गेल्या काही वर्षांपासून प्रसिद्ध केली जातात. कोकणाच्या बाबतीत बोलायचं झालं, तर कोकणातल्या निसर्गसौंदर्याचं दर्शन घडविणारी कॅलेंडर्स अनेकांनी प्रसिद्ध केली आहेत; या वर्षी मात्र पर्यावरणाविषयी सजग असलेल्या कोकणातल्या एका तरुणाच्या पुढाकारामुळे कोकणातली जैवविविधता कॅलेंडरवर पाहायला मिळणार आहे. अणसुरे (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) इथल्या हर्षद तुळपुळे या तरुणाने २०२२ ची जैवविविधता दिनदर्शिका तयार केली आहे. शिवाय अत्यंत अल्प दरात ती घरपोच पाठवण्याचीही सोय केली आहे.

हर्षद तुळपुळे हा तरुण पर्यावरणविषयक मुक्त पत्रकार आहे. कोकणातली जैवविविधता, शेती, पशुपालन, पर्यावरण, कारागिरी, परिसरविज्ञान आदींसह अनेक विषयांतलं ग्रामीण भागातलं स्थानिक पारंपरिक ज्ञान याबद्दल हर्षदला विशेष आस्था आहे. याविषयी फेसबुकवर माहितीपूर्ण पोस्ट लिहून किंवा व्हिडिओ शेअर करून त्या माहितीचं डॉक्युमेंटेशन हा त्याचा आवडता छंद. ‘विवेक’सह काही माध्यमांमध्येही त्याचं या विषयांवर लेखन सुरू असतं. पर्यावरण या विषयाशी निगडित २५ तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तींच्या त्याने घेतलेल्या मुलाखतींचा संग्रह ‘गप्पा निसर्गाच्या’ या नावाने या वर्षीच पर्यावरणदिनी विवेक प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. आता त्याने जैवविविधता दिनदर्शिकेची संकल्पना मांडून ती प्रत्यक्षात आणली आहे.
या वर्षी जंगली वनस्पती ही थीम दिनदर्शिकेसाठी निवडण्यात आली आहे. विशेषतः कोकण आणि सह्याद्रीत आढळणाऱ्या एका जंगली वनस्पतीचा फोटो दिनदर्शिकेतल्या प्रत्येक तारखेवर आहे. त्या वनस्पतींचं मराठी आणि वनस्पतीशास्त्रीय नावही त्यासोबत दिलेलं आहे. म्हणजेच ही दिनदर्शिका ३६५ वनस्पतींची ओळख करून देणार आहे. शास्त्रीय नावं आणि अन्य माहिती डॉ. ऋतुजा कोलते, डॉ. अपर्णा वाटवे, डॉ. स्वप्ना प्रभू, डॉ. उमेश मुंडल्ये, डॉ. श्रीकांत कार्लेकर, पूर्वा जोशी यांनी दिली आहे. तसंच, वसंत काळे, अश्विनी केळकर, श्रीवल्लभ साठे आणि वैभव गाडगीळ यांनी वनस्पतींच्या फोटोजसाठी साह्य केलं आहे. काही निवडक वनस्पतींचे फोटो विकिमिडिया कॉमन्सवरून घेण्यात आले आहेत. डिझाइन व प्रिंटिंगची जबाबदारी रत्नागिरीतल्या स्पृहा आठल्ये (डिजी इम्पल्स) यांनी सांभाळली आहे.
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे हे कॅलेंडर आर्ट पेपरवर प्रिंट करण्यात आलं असून, सहा पानी पाठपोट असलेल्या या कॅलेंडरचा आकार ११x१७ इंच असा आहे. वर्ष संपलं की दिनदर्शिका एक प्रकारे कालबाह्य होते; मात्र अमूल्य माहितीचा खजिना असलेली ही संग्राह्य दिनदर्शिका त्याला अपवाद ठरेल. या कॅलेंडरची किंमत फक्त ६० रुपये ठेवण्यात आली असून, ऑर्डर नोंदवल्यावर ती पोस्टाने घरपोच पाठवली जाणार आहे. कोणाला भेट देण्यासाठी किंवा अन्य काही कारणाने १० किंवा त्याहून जास्त प्रतींची ऑर्डर एकदम नोंदवल्यास मुळातच अल्प असलेल्या किमतीतही १० टक्के सवलत दिली जाणार आहे.
हर्षदच्याच शब्दांत सांगायचं झालं, तर ही दिनदर्शिका घराच्या, कार्यालयाच्या भिंतीची शोभा वाढवणारी आणि येणाऱ्या-जाणाऱ्या माणसाला जैवविविधता या विषयाकडे आकर्षित करणारी, तसंच त्यातल्या वनस्पतीविश्वाची धावती ओळख घडवणारी आहे.
या दिनदर्शिकेची माहिती आपल्या संपर्कातल्या जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत पोहोचवावी, तसंच ऑर्डर नोंदवण्यासाठी आपलं नाव, पत्ता आणि प्रतींची संख्या ही माहिती 9405955608 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावी, असं आवाहन हर्षदने केलं आहे.
कोकणाच्या विकासाबद्दल बरंच बोललं जातं. त्यातलं प्रत्यक्षात किती केलं जातं हा एक संशोधनाचाच विषय आहे; पण कोकणाचं कोकणपण टिकवणं हेच त्याच्या विकासासाठी आवश्यक आहे, हे लक्षात घेण्याचं किंवा त्या दृष्टीने अंमलबजावणी करण्याचं प्रमाण दुर्दैवाने फार कमी आहे. जैवविविधता टिकवणं हा त्यातलाच एक अत्यंत महत्त्वाचा विषय. जैवविविधता टिकवण्यासाठी आधी मुळात ती किती व्यापक आहे, याची माहिती इथल्या प्रत्येकाला असायला हवी. तरच ती धोक्यात आहे याची जाणीव होऊ शकेल. त्या दृष्टीने जागरूक करण्यासाठी हर्षदची ही संकल्पना नक्कीच उपयुक्त ठरेल. कारण कोकणातल्या जैवविविधतेविषयी पुस्तकं बरीच असली, तरी पुस्तकं वाचून माहिती मिळवणाऱ्यांची संख्या मर्यादित आहे. दिनदर्शिका भिंतीवर असल्यामुळे येता-जाता दृष्टीस पडून जैवविविधतेबद्दलची माहिती सर्वसामान्यांना करून देण्यात ती महत्त्वाची भूमिका निभावू शकेल.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media