मंडणगड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आज आंबडवे (ता. मंडणगड) या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पासष्टाव्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यात आले. त्यांच्या स्मारकातील अस्थिकलशापुढे नतमस्तक होण्यासाठी अनुयायांनी रीघ लावली होती.
आंबडवे हे डॉ. बाबासाहेबांच्या जीवनातील संस्मरणीय स्थळ आहे. त्या ठिकाणासह मंडणगड तालुका आणि जिल्ह्यात ठिकठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याला शासकीय अधिकारी तसेच विविध संघटनांनी पुष्पहार अर्पण केले. आंबडवे या गावी मोठा जनसमुदाय जमला होता. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिन साजरा करताना विशेष काळजी घेण्यात आली होती. आरोग्य विभागाने स्मारक परिसरात प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी केली. थर्मल स्कॅनिंगद्वारे तपामान तपासणी आणि सॅनिटायझरचा वापर अनिवार्य करण्यात आला होता. स्मारकात बाबासाहेबांचा पुतळा आणि अस्थिकलशाला अभिवादन करण्यात आले. प्रशासकीय अधिकारी, सामाजिक, राजकीय आणि तालुक्यातील आंबेडकरी अनुयायी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिवर्षाप्रमाणे स्मारकात अस्थिकलश आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालून पूजन करण्यात आले. कार्यक्रमाला रत्नागिरी समाज कल्याण विभागाचे आयुक्त संतोष चिकणे, मंडणगडचे तहसीलदार दत्तात्रय बेर्डे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते, सरपंच किरण धामणे, सर्कल श्री. साळवी, तलाठी मनोहर पवार, ग्रामस्थ सुदाम सुकपाळ, नरेंद्र सकपाळ, सुदर्शन सकपाळ, रंजन धोत्रे आणि आंबडवे पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. त्यानंतर अभिवादनासाठी रीघ लागली होती. यावेळी ग्रामस्थ मंडळाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आजच्या महापरिनिर्वाण दिनी आंबडवे येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद भेट देणार होते. पंतप्रधान नरेंद्र मोदीही लाइव्ह प्रेक्षपणाच्या माध्यमातून थेट संवाद साधणार होते. मात्र हे दोन्ही कार्यक्रम रद्द झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी दिसून आली. राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून काही दिवसांपूर्वी तयारी सुरू करण्यात आली होती. स्मारकाला नव्याने रंगरंगोटी करण्यात आली होती. याचबरोबर आंबडवे गाव परिसरात स्वच्छता करण्यात आली होती. राष्ट्रपतींचा दौरा रद्द झाला, तरी स्मारकाचे सुशोभीकरण केल्याने मात्र नागरिक संतुष्ट झाले.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media