नवी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी यात्रेकरिता मुंबईतून येणाऱ्या प्रवाशांकरिता कोकण रेल्वेमार्गावर लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी या मार्गावर एक विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. याशिवाय दादर-सावंतवाडी मार्गावर होळीसाठी एक गाडी सोडण्यात येणार आहे.
पहिली गाडी क्र. 01161 एलटीटीहून २३ फेब्रुवारी रोजी रात्री पावणेबारा वाजता सुटेल आणि २४ फेब्रुवारीला ती सावंतवाडीला सकाळी १० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्र. 01162 सावंतवाडीहून एलटीटीकरिता ती त्याच दिवशी सकाळी ११ वाजता सुटेल आणि रात्री ११ वाजता पोहोचेल. गाडीला प्रथम एसी १, टू टायर एसी १, थ्री टायर एसी ५, द्वितीय श्रेणी शयनयान ११ आणि बसण्याकरिता ३ डब्यांसह एकूण २३ डबे असतील.
दुसरी गाडी क्र. 01163 दादर-सावंतवाडी मार्गावर १६ आणि १९ मार्च रोजी दुपारी १२ वाजून सुटेल आणि रात्री ११ वाजून २० मिनिटांनी सावंतवाडीला पोहोचेल. परतीच्या प्रवासाकरिता गाडी क्र. 01164 सावंतवाडीहून १६ आणि १९ मार्च रोजी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी दादरला पोहोचेल. या गाडीला टू टायर एसी १, थ्री टायर ओसी २, द्वितीय श्रेणी शयनयान ७, बसण्याकरिता ५ डब्यांसह एकून १७ डबे असतील.
या दोन्ही गाड्या जाताना आणि येताना ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकांवर थांबणार आहेत.
या दोन्ही गाड्यांचे आरक्षण ५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
रत्नागिरी-मडगाव पॅसेंजर ३१ मार्चपर्यंत बंदच राहणार
दरम्यान, बोगद्यांची देखभाल आणि विद्युतीकरणाच्या कामासाठी सध्या बंद ठेवण्यात आलेली कोकण रेल्वेची रत्नागिरी-मडगाव आणि मडगाव-रत्नागिरी पॅसेंजर (गाडी क्र. 10101/10102) येत्या ३१ मार्चपर्यंत बंदच राहणार आहे. ही गाडी आजपासून (दि. २ फेब्रुवारी) पुन्हा सुरू करण्यात येणार होती. मात्र दुरुस्ती आणि देखभालीचे काम अजून सुरू असल्याने गाडी येत्या ३१ मार्चपर्यंत बंद राहणार असल्याचे कोकण रेल्वेच्या पत्रकात म्हटले आहे.