संतसाहित्यातील शिकवणीची दैनंदिन जीवनाशी सांगड आवश्यक : धनंजय चितळे

चिपळूण : ओव्या आणि इतर संतसाहित्यामध्ये सर्वसामान्यांसाठी मोठी शिकवण दिली आहे. तिची दैनंदिन जीवनाशी सांगड घातली गेली पाहिजे, असे मत चिपळूण येथील प्रवचनकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक धनंजय चितळे यांनी व्यक्त केले.

चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाने अप्पासाहेब जाधव अपरान्त संशोधन केंद्राचा उपक्रम म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेच्या सहकार्याने ‘अपरान्तायन’ ही दृक्श्राव्य मालिका सुरू केली आहे. काल (दि. ७ मार्च) शिमगोत्सवातील फागपंचमीला सुरू झालेली ही मालिका धूलिवंदनापर्यंत म्हणजे १८ मार्चपर्यंत चालणार आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांशी या मालिकेत संवाद साधला जाणार आहे. काल पहिल्या दिवश ‘संत साहित्याची भाषा’ या विषयावर धनंजय चितळे यांच्याशी मसाप चिपळूण शाखेचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध कथाकार प्रा. संतोष गोनबरे यांनी संवाद साधला. श्री. चितळे यांनी संतसाहित्यातील विविध दाखले देत संतवाङ्मयाची महती सांगितली. ते म्हणाले की, व्यवहारातील भाषा आणि आध्यात्मिक परिभाषेतील शब्दांचे अर्थ वेगळे असतात. विज्ञान म्हणजे सायन्स असे म्हटले जाते. पण संतसाहित्यात विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान होय. लौकिक ज्ञान वेगळे आणि विज्ञान वेगळे. शास्त्र म्हणजे सायन्स असे म्हटले जाते. पण आध्यात्मिक परिभाषेत शास्त्र म्हणजे जगण्याची नियमावली आहे. संतांनी वेळोवेळी केलेल्या
उपदेशातून वाङ्मय निर्माण झाले.

प्रबोधनात्मक साहित्य कसे निर्माण झाले, याविषयी श्री. चितळे यांनी चक्रधर स्वामींच्या एका भक्ताची कथा सांगितली. ते म्हणाले, त्यांच्याकडे त्यांचा एक भक्त आपल्या कन्येला सोबत घेऊन गेला. तो स्वामींशी बोलत असताना त्याची कन्या काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती. चौथ्या वेळी मात्र तो भक्त चिडला आणि त्याने कन्येच्या थोबाडीत ठेवून दिली. त्यामुळे ती रडू लागली. स्वामींनी त्याचे कारण विचारले तेव्हा, भक्त म्हणाला की, तुमच्यासारखा गोरा रंग तिला हवा आहे. तो तिला देणे कसे शक्य आहे? तेव्हा स्वामींनी तिला जवळ बोलावले आणि तिला एक गोष्ट सांगितली. कावळ्याच्या शेणाच्या घराची ती गोष्ट होती. हीच जुनी गोष्ट मौखिक परंपरेने पुढे आली. आजही ती मुलांना सांगितली जाते. हे सारे वाचल्यानंतर संतवाङ्मयाची गोडी निर्माण झाल्याचे सांगून श्री. चितळे म्हणाले, नववीच्या विद्यार्थ्यांना पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य स्थिर आहे हे शिकवताना किंवा न्यूटन्सचे तीन लॉ समजावताना ज्ञानेश्वरीतील काही ओव्या आठवतात. उपजे तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे । हें घटिकायंत्र तैसें । परिभ्रमे गा ॥ म्हणजेच जे उपजते ते नाश पावते आणि नाश पावलेले पुन्हा दिसते. रहाटगाडग्यासारखा हा क्रम अखंड चालतो, असे भगवंताने अर्जुनाला सांगितले आहे. उदोअस्तुचेनि प्रमाणें । जैसें न चालतां सूर्याचें चालणें । तैसें नैष्कर्म्यत्व जाणें । कर्मींचि असतां ॥९९॥ सूर्य उदय व अस्त पावतो, या एका प्रमाणावरून तो चाललेला भासतो, पण वास्तविक तो चालत नाही, त्याप्रमाणे तो कर्माचरण करीत असताही आपले नैष्कर्म्य जाणतो, असाही दृष्टांत ज्ञानेश्वरीतील चौथ्या अध्यायातील ९९ क्रमांकाच्या ओवीमध्ये म्हटले आहे. हा अभ्यासाचा विषय आहे. ज्ञानेश्वरीकडे असे कोणी बघत नाही. विज्ञान शिकतात, ते परमार्थाचा विचार करत नाहीत आणि परमार्थवाले सांगतात की तुमचं विज्ञान जिथे संपते, तेथे आमचा परमार्थ सुरू होतो. या दोघांची सांगड घातली जात नाही. म्हणून ती परिभाषा सोडण्यास शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

योग्य अर्थापेक्षा सोयीस्कर अर्थ कसा प्रचलित होतो, याविषयी समर्थ रामदासांच्या एका ओवीचे उदाहरण देऊन श्री. चितळे म्हणाले, दासबोधात आपण यथेष्ट जेवणें | उरलें तें अन्न वाटणें |
परंतु वाया दवडणें | हा धर्म नव्हे || अशी एक ओवी आहे. तेथे यथेष्ट म्हणजे इष्ट ते जेवावे आणि बाकीच्या अन्नाचे दान करावे, असे म्हटले आहे. पण यथेष्ट या शब्दाऐवजी यथेच्छ असा शब्द वापरला जातो. त्यामुळे रामदास स्वामींच्या शिकवणीचा मूळ उद्देशच बाजूला राहतो. देवाचिये द्वारी उभा क्षणभरी | तेणे मुक्ती चारी साधियेल्या || असे म्हणताना उभा या शब्दाचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे. एखाद्याने उभे आयुष्य खर्ची घातले असे आपण म्हणतो. बाबा आमटे, लोकमान्य टिळक किंवा सर्वच स्वातंत्र्यसेनानींनी उभं आयुष्य देशासाठी दिले, असे म्हणताना उभे म्हणजे संपूर्ण आयुष्य असा अर्थ आहे. देवाचिये द्वारी अभंग म्हणताना उभा म्हणजे तो संपूर्ण क्षण देवासाठीच दिला पाहिजे. त्यावेळी दुसरा विचारच मनात असता कामा नये. प्रत्यक्षात तेथे गावाच्या चकाट्या पिटल्या जातात. त्याने मुक्ती कशी मिळेल, असा सवालही श्री. चितळे यांनी उपस्थित केला.

धनंजय चितळे यांच्याशी साधलेला संवाद सोबतचा व्हिडीओ पाहता येईल.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply