महाड (जि. रायगड) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केल्यामुळे अजरामर झालेल्या येथील चवदार तळ्याचा ९५ वर्धापन दिन आज उत्साहात साजरा झाला. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या समारंभाला हजारो नागरिक उपस्थित होते.
यावेळी कु. तटकरे म्हणाल्या की, जातीयवादाची दरी संपुष्टात यावी, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करून सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले होते. डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा अधिकाधिक प्रसार करण्याचा प्रयत्न पालकमंत्री या नात्याने माझ्याकडून आणि शासनाकडून निश्चितच केला जाईल. डॉ. आंबेडकरांनी केलेला पाण्याचा सत्याग्रह केवळ अस्पृश्यांना पिण्याचे पाणी खुले करून देण्यासाठी दिलेला लढा नव्हता, तर त्यांच्या मूलभूत न्याय्य हक्कासाठी दिलेला लढा होता. गेल्या वर्षी जुलै महिन्यात आलेल्या महापुरापासून चवदार तळेही वाचले नाही. त्यानंतर चवदार तळ्याची साफसफाई करण्यासाठी स्थानिक प्रशासन, महाड नगरपालिका आणइ ठाणे महापालिकेचे मोठे योगदान होते. चवदार तळ्यातील पाणी शुद्धीकरणासाठी जी यंत्रणा बसविण्यात आली आहे, त्याचे उद्घाटन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते लवकरच होणार आहे.
यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, माणसाला माणूस म्हणून जगता यावे, त्याला पाण्यापासून वंचित ठेवता येणार नाही, हा संदेश चवदार तळे सत्याग्रहाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला दिला गेला. म्हणून चवदार तळे हे ऊर्जास्रोत आहे. बाबासाहेबांनी पुकारलेला लढा माणुसकी नसलेल्या समाजव्यवस्थेविरोधातील अजरामर लढा होता. या लढ्याच्या वेळी डॉ. आंबेडकर यांच्या संरक्षणासाठी महाडमधील काही सवर्ण पुढे आले आणि त्यांनी आजूबाजूच्या परिसरातून डॉ. आंबेडकर यांच्यावर हल्ला करण्यासाठी जे सनातनी आले होते, त्यांना परतवून लावले. हा भारताच्या इतिहासातील टर्निग पॉइंट ठरला होता. अन्याय-अत्याचाराविरोधात आवाज उठविलाच पाहिजे, हे बाबासाहेबांनी त्या काळी सांगितले. अस्पृश्य समाजाला समाज व्यवस्थेमध्ये पाणीही पिऊ द्यायचे नाही, या माणुसकीहीन संस्कृती व्यवस्थेविरोधात उभारलेला हा लढा होता, असेही ते म्हणाले.
चवदार तळ्याच्या वर्धापन दिनानिमित्त कालपासूनच हजारो अनुयायी महाडमध्ये दाखल झाले. सकाळपासूनच चवदार तळ्यातील पाणी प्राशन करण्यासाठी तसेच चवदार तळे व क्रांती स्तंभावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी हजारो भीमसैनिक, आंबेडकरप्रेमी, राजकीय नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने जमले होते. जमलेल्या सर्वांसाठी अल्पोपाहार, जेवण, पाणी, वैद्यकीय सुविधा याची उत्तम व्यवस्था महाड येथील चवदार तळे विचार मंच, पोस्ट कर्मचारी संघटना तसेच विविध शासकीय, अशासकीय यंत्रणा, सामाजिक संघटना, संस्थांनी केली होती.


कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड