अशोक प्रभू प्रथम स्मृतिदिनी हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धा

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. अशोक वासुदेव प्रभू यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्ताने येत्या १३ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विजेत्यांना स्वरसिंधुरत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

कोकणातील उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कै. प्रभू यांनी स्वरसिंधुरत्न स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेची आणि त्यांची आठवण म्हणून त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी जिल्हास्तरीय हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेचा तपशील असा :
स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरतीच मर्यादित असून जिल्ह्यात राहणाऱ्या स्पर्धकांनाच स्पर्धेत सहभागी होता येईल. स्पर्धा शुक्रवार, १३ मे २०२२ रोजी तीन वयोगटांत घेण्यात येईल. या गटांचा तपशील असा – गट क्र. १ : १९ ते १६ वर्षे पूर्ण (शालेय गट), गट क्र. २ : १७ ते ३५ वर्षे पूर्ण (युवा गट), गट क्र. ३ : ३५ वर्षांवरील (खुला गट). सादरीकरणासाठी गट क्र. १ करिता कोणतेही दोन राग, तसेच गट क्र. २ ब ३ करिता कोणतेही तीन राग अर्जात नमूद करणे आवश्यक आहे. राग निवडीसाठी अर्जासोबत दिलेल्या रागांच्या यादीतील राग निवडून अर्जात समाविष्ट करावेत. गट क्र. १ करिता सादरीकरणाची वेळ १२ मिनिटांची असेल. फक्त छोटा ख्याल सादर करावयाचा आहे. गट क्र. २ आणि ३ करिता २० मिनिटांची वेळ असून स्पर्धकाला विलंबित आणि द्रुत दोन्ही ख्याल सादर करणे बंधनकारक आहे. स्पर्धा परीक्षणासाठी स्वर, ताल, यासोबतच राग स्वरूप, मांडणी, निवड इत्यादी निकष विचारात घेतले जातील. स्पर्धकांनी साथसंगीतासाठी तानपुरा आणि तबला याच वाद्यांचा उपयोग करणे अपेक्षित आहे. वाद्य आणि वादक व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात येईल. स्पर्धकांना स्वखर्चाने आपली वाद्ये आणि वादक आणण्याची मुभा असेल.

स्पर्धा वालावल (ता. कुडाळ) येथील श्री देव लक्ष्मीनारायण देवालयात १३ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत घेण्यात येईल. सहभागासाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत ८ मे २०२२ पर्यंत आहे. तिन्ही गटांतील प्रथम क्रमांक विजेत्या स्पर्धकांना स्वरसिंधुरत्न पुरस्काराने गौरविण्यात येईल. स्वरसिंधुरत्न पुरस्कार रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र या स्वरूपात असेल. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात येईल. वय आणि निवासाचा पुरावा स्पर्धेच्या ठिकाणी आयोजकांकडे सादर करणे बंधनकारक असेल. स्पर्धक दूरदर्शन, आकाशवाणीचा श्रेणीप्राप्त कलाकार, तसेच व्यावसायिक कलाकार नसावा. स्पर्धकांनी स्पर्धेच्या ठिकाणी नियोजित वेळेपूर्वी अर्धा तास उपस्थित राहणे, तसेच दिलेल्या वेळेत आपले सादरीकरण करणे बंधनकारक आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

स्वरसिंधुरत्न पुरस्कारांचे वितरण आषाढी एकादशीला (दि. १० जुलै २०२२) रोजी श्री क्षेत्र वालावल येथील लक्ष्मीनारायण मंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. विजेत्यांना तेथील नियोजित कार्यक्रमात आपली कला सादर करण्याची संधी दिली जाईल. सादरीकरणासाठी आवश्यक मार्गदर्शन केले येईल.

स्पर्धेसाठी १०० रुपये प्रवेश शुल्क असून पूर्ण स्वरूपात भरलेले प्रवेश अर्ज डॉ. प्रभूज्‌ होमिओपॅथी, आंबेडकर पुतळ्यानजीक, कुडाळ (मोबा. ९४२१०७३९०७) येथे स्वीकारले जातील. प्रवेश अर्ज आणि अधिक माहितीसाठी प्रशांत धोंड (९४०३६५१५३८, स्वरसिंधुरत्न पुरस्कार संयोजक) किंवा डॉ. प्रणव प्रभू (९४२१०७३९०७, संयोजक) यांच्याशी संपर्क साधावा.

स्पर्धेचे नियम आणि सहभागाचा अर्ज

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply