राजापूर : सेवादलाची पंचतत्त्वे राष्ट्र सेवादल शिबिरार्थींच्या माध्यमातून घराघरात पोहोचावीत. त्यासाठी शिक्षणाची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत ओणी (ता. राजापूर) येथील नूतन विद्यामंदिरचे माजी मुख्याध्यापक शहाजीराव भाऊराव खानविलकर यांनी मांडले.

नूतन विद्यामंदिरमध्ये राष्ट्रसेवा दलाचे दस्तानायक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन श्री. खानविलकर यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. आजपासून येत्या २७ एप्रिलपर्यंत राष्ट्र सेवा दलाच्या ओणी शाखेतर्फे ओणी पंचक्रोशी मंडळ, सर्वोत्कर्ष सामाजिक संस्था, वात्सल्य मंदिर आणि कमल मोहन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वात्सल्य मंदिरचे माजी अध्यक्ष देवेंद्र गुजर यांनी भूषविले. उद्घाघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. के. गोंडाळ सर यांनी केले.
शिबिराची सुरुवात नूतन विद्यामंदिरचे माजी विद्यार्थी नामदेव तुळसणकर यांच्या हस्ते झेंडावंदन करून करण्यात आली. प्रास्ताविक वात्सल्य मंदिरचे अध्यक्ष डॉ. महेंद्र मोहन यांनी केले. आजच्या जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून मान्यवरांचे स्वागत शिवाजी कोण होता? हे पुस्तक देऊन करण्यात आले. यावेळी श्रीधर तुळसणकर, माजी प्रा. एम. आर. पाटील, सेक्रेटरी नाना मुजुमदार, संयोजक आलोक गुजर, अधीक्षिका सुवर्णा राघव, प्रतिभा गुजर, आशाताई गुजर, रूपेश रेडेकर उपस्थित होते.
शिबिरात जुवाठी, ओणी, वडदहसोळ, खरवते, पाचल, कोंड्ये रत्नागिरी, राजापूर, रत्नागिरीचे निरीक्षणगृह, शिवणे खुर्द, राजापूरची माहेर संस्था, मिरज येथून १४२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. शिबिरासाठी प्रशिक्षक म्हणून कोल्हापूर येथून विजय हेग्गण्णकर, सतीश शिंदे, प्रकाश कोरुचे, सागर पाटील दाखल झाले आहेत.









