देवरूख महाविद्यालयात जागतिक वसुंधरा दिन आगळ्या पद्धतीने

देवरूख : येथील आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात जागतिक वसुंधरा दिन आश्वासक चर्चेने आगळ्या पद्धतीने साजरा झाला.

आपल्या सभोवतालच्या जगाबरोबर प्रत्यक्षात आपले जगणेही प्लास्टिकमय होवू लागले आहे. केवळ प्लास्टिक नाही तर कृषी आणि अन्न प्रक्रिया, औषध निर्मिती, बांधकाम, वाहन आणि वेष्टन अशा विविध उद्योग व्यवसायातील रसायने आणि इतर सामग्रीदेखील पर्यावरणाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरत आहे. माणसाने आपल्या उपयोगासाठी अनेक वस्तू निर्माण केल्या, परंतु गरज संपल्यावर त्या वस्तू नष्ट करू शकत नसल्याने अशा वस्तू कचरा म्हणून फेकून, त्या निसर्गाच्या माथी मारल्या जात असल्याने हा वाढता पसारा डोकेदुखी ठरत आहे. व्यक्तिगतरीत्या आपण सर्व प्रकारच्या ऊर्जांचा वापर कमी करणे, नैसर्गिक संसाधनांची उधळपट्टी कमी करणे आणि अनावश्यक कचरा निर्मिती टाळली तर पृथ्वीचा समतोल उत्तम राखला जाऊ शकतो. या सर्व चर्चा देवरूख महाविद्यालयात आयोजित केलेल्या जागतिक वसुंधरा दिनानिमित्ताने झाल्या.

जागतिक वसुंधरा दिनाचा उद्देश आणि पृथ्वीच्या संवर्धनाची गरज विद्यार्थ्यांना ज्ञात व्हावी, यासाठी विद्यार्थ्यांच्या वर्गांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर महत्त्वपूर्ण माहिती आणि यूट्यूब व्हिडिओ पाठवण्यात आले. ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे आणि प्रा. धनंजय दळवी यांनी ती उपलब्ध करून दिली. समाज प्रबोधनासाठी महाविद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी पृथ्वीवरील विविध समस्यांमुळे निर्माण होणाऱ्या हानीची गंभीरता चित्रांद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला.

प्रा. मयूरेश राणे यांनी ‘पृथ्वीची धारणक्षमता आणि नैसर्गिक संसाधनांचा अतिवापर’ या विषयावर विद्यार्थ्यांना यूट्यूब व्हिडिओद्वारे मार्गदर्शन केले. प्रा. राणे यांनी विद्यार्थ्यांना लोकसंख्येचा विस्फोट, अतिरिक्त लोकसंख्येचा पृथ्वीवरील भार, नैसर्गिक संसाधनांचा स्वैर वापर आणि संसाधनांचा तुटवडा, लोकसंख्या नियंत्रणासोबतच पर्यायी संसाधनांच्या वापराची गरज, हरित वसुंधरा निर्माण करण्याची आवश्यकता, हरित वापर आणि हरित व्यवसाय या संकल्पनांची प्रभावी अंमलबजावणीची आवश्यकता विशद केली. प्रा. सोनल अणावकर यांनी ‘आपली वसुंधरा आणि आपली सर्वांची जबाबदारी’ या विषयावरील मार्गदर्शनात जागतिक वसुंधरा दिन साजरा करण्यामागील उद्देश आणि महत्त्व, पर्यावरणाच्या असंतुलनामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्या आणि त्याचा सर्व सजीवांवर आणि नैसर्गिक स्रोतांवर होणारा दुष्परिणाम, निसर्ग संवर्धनासाठी प्रत्येक व्यक्तीने कोणती कृती करणे अपेक्षित आहे, वसुंधरा दिनाची यावर्षीची संकल्पना- ‘आपल्या ग्राहकांसाठी गुंतवणूक’ याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच प्रा. अणावकर यांनी महाविद्यालयात शिकवल्या जाणाऱ्या सस्टेनेबल अॅग्रिकल्चर (शाश्वत कृषी) या पर्यावरणपूरक पदवी अभ्यासक्रमाची आजची उपयुक्तता आणि यामुळे निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी याबाबतही माहिती दिली.

संस्थेचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कुमार भोसले, शिरीष फाटक, वेदा प्रभुदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे कौतुक केले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply