परशुराम घाटातील मेगाब्लॉक २५ एप्रिल ते २५ मेपर्यंत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील परशुराम घाट रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी येत्या २५ एप्रिल ते २५ मे या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत पूर्णपणे बंद राहणार आहे. यापूर्वी २० एप्रिलपासून दुपारी पाच तास घाट बंद ठेवण्याचा निर्णय उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला होता. मात्र आज झालेल्या बैठकीत सकाळी ११ ते सायंकाळी ५ असे तास घाट बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे.

गेल्यावर्षी परशुराम घाटात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या होत्या. एका दरडीखाली गा़डले गेल्याने एका घरातील तिघांचा मृत्यू झाला होता. यावर्षीचा पावसाळा आता जवळ आला आहे. पावसाळ्यात घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प होऊ नये, यासाठी आतापासूनच गतीने घाटाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन सुरू झाले आहे. भूस्खलन होऊ नये आणि चौपदरीकरणासाठी सुरू असलेले रुंदीकरण गतीने व्हावे, यासाठी नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन घातलेल्या अटींची पूर्तता करण्याच्या कार्यवाहीनंतर परशुराम घाट रुंदीकरणाचे काम २५ एप्रिलपासून २५ मे २०२२ पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत करण्याचा आणि त्या वेळेत वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय आज घेण्यात आला. मात्र नेमक्या कोणत्या वेळात वाहतूक बंद ठेवायची याचा निर्णय आगामी २ दिवसांत घेतला जाणार आहे. घाटातील रुंदीकरणाच्या कामाला गती देऊन पावसाळयापूर्वी रुंदीकरण पूर्ण करणे तसेच आवश्यक तेथे संरक्षण भिंत उभारणे यासाठी ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. साधारणपणे एक महिना हे काम चालेल.

काम सुरू करण्यापूर्वी परशुराम घाटासह चिपळूण ते आंबा घाट आणि खेड ते पनवेल या मार्गावर याबाबतचे फलक लावून माहिती द्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केली. घाटात काही वळणांवर अपघात होण्याचा धोका आहे, त्या ठिकाणी गतिरोधक आवश्यक आहे. त्याची उभारणी करण्याची सूचनाही त्यांनी केली.

आजच्या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलिस परिवहन आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media