Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

रत्नागिरी-सिंधुदुर्गात सोमवारपासून पहिला कोकण चित्रपट महोत्सव

Advertisements

रत्नागिरी : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांत ९ मे ते १४ मे या कालावधीत पहिला कोकण चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाच्या निमित्ताने कोकणातील निसर्गसौंदर्य आणि सांस्कृतिक वैभव सर्वदूर पोहोचविण्याचे कार्य सुरू आहे, याची जाणीव स्थानिकांना व्हावी, स्थानिक कलाकारांना वाव मिळावा, यासाठी महोत्सव आयोजित केल्याचे सिंधुरत्न कलावंत मंचचे अध्यक्ष अभिनेते विजय पाटकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कोकणातील निसर्ग आणि तेथील पारंपरिक कला महाराष्ट्राची कलासंस्कृती उंचावणाऱ्या आहेत. जागतिक पातळीवर कोकणाचा हा सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा जपला जावा, तसेच चित्रपटाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळावी, या उद्देशाने ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल, विजय राणे, छाया कदम, प्रमोद मोहिते, अमीर हडकर, प्रकाश जाधव, यश सुर्वे आदी मंडळी एकत्र येत ‘सिंधुरत्न कलावंत मंच’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेतर्फे ९ मे ते १४ मे या कालावधीत पहिला कोकण चित्रपट महोत्सव होणार आहे. महोत्सवाची रूपरेषा आणि नामांकनप्राप्त चित्रपट तसेच विजेत्यांची नावांची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली. सिंधुरत्न कलावंत मंच आणि रत्नागिरी नगरपरिषद आयोजित या परिषदेत विजय पाटकर, अलका कुबल, विजय राणे, प्रकाश जाधव, यश सुर्वे, प्रमोद मोहिते, नूतन जयंत, उमेश ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ ९ मे रोजी सायंकाळी ५ वाजता रत्नागिरीत स्वा. सावरकर नाट्यगृहात होईल. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत या महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण आणि दापोली येथे सलग ४ दिवस रोज तीन चित्रपट प्रेक्षकांना विनामूल्य दाखवित्रे जातील. या चार दिवसांत अंदाजे २५ ते ३० हजार प्रेक्षक त्यांचा आस्वाद घेतील, अशी अपेक्षा आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकण चित्रपट महोत्सवाचा पारितोषिक समारंभ १४ मे रोजी मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात सायंकाळी ५ वाजता होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, देवगड, वैभववाडी, कुडाळ, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग या ८ तालुक्यांत ४ दिवस दुसऱ्या फेरीसाठी निवड करण्यात आलेल्रे १४ चित्रपट प्रेक्षकांना विनामूल्य दाखविले
जातील. वेंगुर्ले येथे १२ मे रोजी परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. या महोत्सवात चित्रपटसृष्टीसाठी मोलाचे योगदान असलेल्या दिग्ग्ज कलावंतांचा सन्मान केला जाणार आहे.

झी टॉकीजने नावीन्यपूर्ण संकल्पना आणि उपक्रमांचे नेहमीच स्वागत केले आहे. पहिल्यांदाच होणारा हा कोकण चित्रपट महोत्सव कलासृष्टीला आणि पर्यटनाला चालना देणारा असेल. त्यातून अनेक चांगल्या गोष्टी साध्य होऊ शकतात हे लक्षात घेऊन झी टॉकीजने या महोत्सवासाठी पुढाकार घेतल्याचे झीच्या मराठी मूव्ही क्लस्टरचे चीफ चॅनेल ऑफिसर बवेश जानवलेकर यांनी सांगितले.

महोत्सवासाठी निवडण्यात आलेले चित्रपट आणि घोषित पुरस्कारांची यादी अशी –
कथा- रमेश दिघे- फनरल, पटकथा – रमेश दिघे- फनरल, संवाद – संजय पवार- रिवणावायली, गीतकार- गुरू ठाकूर- नवा सूर्य- फिरस्त्या, ध्वनिमुद्रक- सत्यनारायण-प्रवास,
ध्वनिसंयोजन – परेश शेलार – जीवनसंध्या, वेशभूषा- अपर्णा होसिन- कानभट्ट, रंगभूषा- संजय सिंग- कानभट्ट, कलादिग्दर्शक- सतीश चिपकर- कानभट्ट, पार्श्वसंगीत- चिनार- महेश- चोरीचा मामला, संगीत- अतुल भालचंद्र जोशी- जीवनसंध्या, गायक पुरुष- आदर्श शिंदे- नवा सूर्य- फिरस्त्या, गायक (स्त्री) – अंजली मराठे – आल्या दिसा मागे – रिवणावायली, संकलक- नितेश गावंड- फनरल, छायाचित्रकार- संजय मेमाणे- हिरकणी, नृत्य दिग्दर्शक- विठ्ठल केळेवाली- पांडू, सर्वोत्कृष्ट बालकलाकार – रणवीरसिंग राजे गायकवाड – भारत माझा देश आहे, देवांशी सावंत- भारत माझा देश आहे, रुचित निनावे- पल्याड, ऋग्वेद मुळे- कानभट्ट, मृणाल जाधव- मी पण सचिन, विशेष पारितोषिके – अशोक सराफ, किशोरी शहाणे, मोहन जोशी, पद्मिनी कोल्हापुरे.

दाखविले जाणारे उत्कृष्ट १४ चित्रपट असे – जीवनसंध्या, फनरल, कानभट्ट, भारत माझा देश आहे, ८ दोन ७५, पल्याड, हिरकणी, प्रीतम, प्रवास, मी पण सचिन, सिनियर सिटीझन, रिवणावायली, फिरस्त्या, शहीद भाई कोतवाल.

चित्रपट प्रदर्शनाचे वेळापत्रक असे –

९ मे २०२२ – सायंकाळी ६ वा. प्रवास.

१० मे – दुपारी १२ वा. ८ दोन ७५, दुपारी ३ वा. पल्याड, सायंकाळी ६ वा. रिवणावायली.

११ मे – दुपारी १२ वा. जीवनसंध्या, दुपारी ३ वा. मी पण सचिन, सायंकाळी ६ वा. प्रीतम.

१२ मे दुपारी १२ वा. फनरल, दुपारी ३ वा. भारत माझा देश आहे, सायंकाळी ६ वा. हिरकणी.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version