रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाने मुंबई विद्यापीठाच्या छप्पन्नाव्या आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवात पुन्हा एकदा जिल्हा चॅम्पियनशिप मिळवून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.
महोत्सवात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाने बक्षिसांची लयलूट केली. एकूण ९ प्रकारात महाविद्यालयाला प्रथम क्रमांक मिळाला. त्यामध्ये भारतीय समूह गीत गायन, मराठी एकांकिका, हिंदी एकांकिका, मराठी स्किट, हिंदी स्किट, शास्त्रीय नृत्य (श्रेया पाटकर); लोकनृत्य, मराठी वादविवाद (वर्षा काळे, अवंती काळे), पोस्टर मेकिंग (आर्या थूळ) या प्रकारांचा समावेश आहे.
महाविद्यालयाने ७ प्रकारात द्वितीय क्रमांक मिळविला. ते प्रकार असे – मेंदी (अझमिन साखरकर), हिंदी कथाकथन (ओंकार आठवले), ; मराठी वक्तृत्व (मनस्वी नाटेकर), सुगम गीत गायन (तन्वी मोरे), नाट्यगीत गायन (सानिका गोखले), गीत गायन (चैतन्य परब), हिंदी वादविवाद (जान्हवी जोशी, कल्पजा जोगळेकर).
तृतीय क्रमांकाच्या दोन प्रकारात मराठी कथाकथन (मीरा काळे), मराठी एकपात्री (कौशल मोहिते) महाविद्यालय झळकले. कोलाजमध्ये सुरक्षा महाकाळला उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला.
एकूण १९ कलाप्रकारांमध्ये महाविद्यालयाने ६६ गुण प्राप्त केले. स्पर्धेसाठी मार्गदर्शक म्हणून एकांकिका ओंकार पाटील, समूह गायन ओंकार बंडबे, स्किट यतीन पवार, मूकाभिनय जतिन आग्रे, लोकनृत्य हेमंत कांचन यांनी काम पाहिले. विद्यार्थी व्यवस्थापन स्वराज साळुंखे याने केले. प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी यांनी यशस्वी संघाचे अभिनंदन केले आहे.
मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाने हा आंतरमहाविद्यालयीन जिल्हास्तरीय युवा महोत्सव आयोजित केला होता. महोत्सवाकरिता महाविद्यालय यावर्षी यजमानाच्या भूमिकेत होते. कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक समन्वयक नीलेश सावे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन; कार्यवाह सतीश शेवडे; प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, तिन्ही शाखांच्या उपप्राचार्य डॉ. यास्मिन आवटे; डॉ. अपर्णा कुलकर्णी; डॉ. चित्रा गोस्वामी, सांस्कृतिक विभाग प्रमुख आणि जिल्हा समन्वयक डॉ. आनंद आंबेकर; सहसमन्वयक प्रा. संयोगिता सासणे उपस्थित होते.


