रत्नागिरी : पर्यटनदृष्ट्या महत्त्व असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्याची ओळख करून देणारे कॉफीटेबल बुक पर्यटनास चालना देण्यासोबतच या जिल्ह्याला जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यास मदत करेल, असे प्रतिपादन रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी केले.
येथील जिल्हा माहिती कार्यालयातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन ॲड. परब यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे केले. या पुस्तकात सर्व पर्यटकांना तसेच जिल्ह्यात येणाऱ्या सर्व गणमान्य अतिथींना जिल्ह्याचा परिचय होईल, असे सांगून या पुस्तकाचे प्रकाशन झाल्याचे त्यांनी जाहीर केले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर प्रत्यक्ष तर खासदार विनायक राऊत हेही यावेळी ऑनलाइन उपस्थित होते.
पर्यटनरत्न नावाने प्रकाशित या १०८ पानी कॉफी टेबल बुकसाठी प्रधान सचिव तथा माहिती आणि जनसंपर्क महासंचालक दीपक कपूर यांचे प्रोत्साहन लाभले. याबाबत संचालक (माहिती) गणेश रामदासी आणि कोकण विभाग उपसंचालक (माहिती) डॉ. गणेश मुळे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. कॉफी टेबल पुस्तकाबाबत आरंभी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी माहिती दिली. पालकमंत्री ॲङ परब तसेच उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नियोजन निधीतून केलेली तरतूद केल्याबद्दल त्यांनी आभार मानले.
या पर्यटनरत्न कॉफीटेबल बुकमध्ये तालुकानिहाय सर्व महत्वाच्या ठिकाणांची माहिती दिली आहे. यात जिल्ह्यातील गड-किल्ल्यांसह पर्यटनाची इतर ठिकाणे, जिल्ह्यातील जीवनशैली आणि खाद्यपरंपरा याबाबत विस्तृत माहिती सचित्र दिली आहे. रत्नागिरीची ओळख सुंदर समुद्र किनारे असणारा जिल्हा अशी आहे. त्यासाठी सर्व महत्त्वाच्या समुद्रकिनाऱ्यांबाबत माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यात हापूस आंबा,काजू, शेतीमधील इतर उत्पादने, सण,उत्सव आणि परंपरा यांचीही माहिती यात समाविष्ट आहे.
हे पुस्तक पीडीएफ स्वरूपात रत्नागिरी जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाइटवर असावे, अशी सूचना याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केली.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड