जांभवडे (ता. कुडाळ) : येथील पु. वि. काजरेकर यांच्या घरातील वंशपरंपरागत कोजागरी उत्सव काल रात्री कणकवलीचे गायक मनोज मेस्त्री यांच्या गायनाने अत्यंत उत्साहात साजरा झाला.
यंदाही मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात कोजागरीचा उत्सव साजरा झाला. सायंकाळी कुलदेवता आर्यादुर्गा आणि लक्ष्मींद्र या देवतांची विधिवत पूजा करण्यात आली. देवीला विविध प्रकारच्या पोह्यांचा नैवेद्य अर्पण करून संगीत महाआरती आणि मंत्रपुष्प आदी धार्मिक कार्यक्रम यथास्थित पार पडले.




या धार्मिक कार्यक्रमांनंतर उत्सवाचे विशेष आकर्षण असलेला गायनाचा कार्यक्रम सुरू झाला. पं. डॉ. समीर दुबळे यांचे शिष्य आणि कणकवलीचे प्रसिद्ध गायक मनोज भालचंद्र मेस्त्री यांचे गायन झाले. त्यांनी आपल्या सुरेल गायनाने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. प्रारंभी गोरख कल्याण राग सादर करून त्यांनी उत्तम वातावरणनिर्मिती केली. या रागात विलंबित आणि द्रुत बंदिश सादर करून नंतर राग बिहाग सादर केला. त्यानंतर त्यांनी सरस्वती रागातील द्रुत बंदिश आणि तराणा पेश केला. नंतर ‘मन लोभले’ हे प्रसिद्ध भावगीत, अभंग, गज़ल आदी गायनप्रकार सादर करून भैरवीतील बंदिशीने कार्यक्रमाची सांगता केली. त्यांना संदीप पेंडुरकर यांनी संवादिनी, तर वेदान्त कुयेसकर यांनी उत्तम तबलासाथ केली.
कार्यक्रमाला प्रसिद्ध निवेदक प्रसाद घाणेकर, चित्रपट कलावंत आणि “रात्रीस खेळ चाले” फेम अभय खडपकर, डॉ. श्रुती सामंत आदी मान्यवरांसह काजरेकर कुटुंबीयांचे आप्तेष्ट आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
(श्रीनिवास काजरेकर)
मनोज मेस्त्री यांच्या गायनाची झलक सोबतच्या व्हिडीओमध्ये
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


धव्यवाद