खेड : वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रकल्पामुळे तळागाळातला शेतकरी नव्याने उभा राहणार आहे. शेतकऱ्यांच्या घरात लक्ष्मी आणणारा हा प्रकल्प आहे, असा विश्वास खेडचे माजी आमदार संजयराव कदम यांनी व्यक्त केला.
खेड तालुक्यातील वेरळ आणि चिंचघर-दस्तुरी येथे आज (दि. १ नोव्हेंबर) सकाळी वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स या दुग्धप्रकल्पाच्या दूध संकलन केंद्रांचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्री. कदम पुढे म्हणाले, नवी पिढी दुधाच्या व्यवसायात उभी राहील की नाही, याबाबत शंका होती. मात्र वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला आहे. मोठ्या धाडसाने वाशिष्ठी डेअरीचा प्रकल्प उभा राहत आहे. या प्रकल्पाच्या पाठीशी ठामपणे उभे राहायला हवे. शेतकऱ्यांमध्ये आता दूध उत्पादनासाठी स्पर्धा लागली पाहिजे. यातूनच उत्पादन वाढेल आणि जिल्ह्यात दूधगंगा येईल.
यावेळी सुभाषराव चव्हाण म्हणाले, शेतकऱ्यांना आर्थिक ताकद द्यायची असेल, तर दुग्धव्यवसाय हा एकमेव पर्याय आहे. शासकीय दूध योजनांची अवस्था बिकट झाल्याने आम्हाला त्रास सहन करावा लागला तरी चालेल पण शेतकरी अडचणी येऊ नये, यासाठीच वाशिष्ठी डेअरीचा प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच संकलन केंद्रे सुरू केली आहेत. शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या या प्रकल्पाच्या पाठीशी आपण सर्वांनी ठामपणे उभे राहू या. शेतकऱ्यांसाठी काम करताना बाकीचे विचार बाजूला ठेवून सर्वांनी एकाच व्यासपीठावर यायला हवे. प्रशांत यादव यांनी प्रकल्पाबाबत धाडसाने काही निर्णय घेतले ते आमच्या विचारांना पूरक आणि कौतुकास्पद आहेत, असे गौरवोद्गारही श्री. चव्हाण यांनी काढले.
बाबाजी जाधव यांनीही वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे कौतुक केले. ते म्हणाले, सहकारी दूध योजना तोट्यात जाण्याची कारणे आम्ही अनुभवली आहेत. प्रकल्पाचे संचालक प्रशांत यादव यांनी धाडस करून शेतकऱ्यांना रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी प्रकल्प उभा केला आहे. दुधाकडे व्यवसाय म्हणून पाहिले पाहिजे. चांगला दर मिळाला तर शेतकरी समृद्ध होईल, हे ध्यानात घेऊन तसेच जनावरांसाठी वैद्यकीय सुविधा आणि खाद्यपुरवठ्याचा केलेला विचार ही या प्रकल्पाची जमेची बाजू आहे.
प्रकल्पाचे संचालक प्रशांत यादव यांनी प्रास्ताविकात प्रकल्पाची आणि प्रकल्पाच्या माध्यमातून भविष्यात शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांची माहिती दिली. हा प्रकल्प शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या उभे करण्याचे काम या प्रकल्पाच्या माध्यमातून केले जाईल, असा विश्वास यावेळी श्री. यादव यांनी उपस्थितांना दिला.
उद्घाटनाला चिंचघर-दस्तुरीचे सरपंच मधुकर कदम, जागामालक रमेश चव्हाण, मामा जाधव, पोलिस पाटील अरुण पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष स. तु. कदम, पाचाड दूध उत्पादक संघाचे मंगेश गोंधळेकर, वेरळच्या सरपंच वैभवी घाडगे, उपसरपंच सुनील जड्याळ, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सिद्धी पवार, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक रवींद्र भोसले, सत्यवान म्हामुणकर, सोमा गुढेकर, जागामालक अनिल भोसले, ग्रामपंचायत सदस्य विद्या जाधव, ज्योती पिंपळकर, संतोष भोसले, पोलिस पाटील संजय शिंदे, अविनाश जाधव, दिलीपराव मोरे, अजय बिरवटकर आदी मान्यवर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दर्जेदार दूध उत्पादकांना बोनस!
वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भविष्यात अनेक सुविधा दिल्या जातील. हा प्रकल्प, हे संकलन केंद्र माझे आहे, माझ्या हितासाठी आहे, असा विचार करून शेतकऱ्यांना अधिकाधिक दर्जेदार दुधाचे उत्पादन घ्यावे. अशा दर्जा टिकवून ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून बोनस दिला जावा, अशी सूचनाही यावेळी सुभाषराव चव्हाण यांनी केली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

