मुंबई : स्वातंत्र्यसैनिक डॉ. परशुराम पाटील कला केंद्रांतर्गत ‘कलाश्रम’ संस्थेचा ‘अभियान सन्मान’ कार्यक्रम आज (दि. ३० नोव्हेंबर) सायंकाळी ७ वाजता प्रभादेवीतील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये साजरा केला जाणार आहे.
स्वातंत्र्यसैनिक डॉ. परशुराम पाटील कला केंद्रांतर्गत ‘कलाश्रम’ ही संस्था शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्य करते. या संस्थेच्या वतीने दर महिन्याला ‘अभियान सन्मान’ कार्यक्रम आयोजित केला जातो. या महिन्यात होणारा संस्थेचा त्र्येपन्नवा कार्यक्रम आहे. आजचा कार्यक्रम रवींद्र नाट्य मंदिराशेजारील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये तिसऱ्या मजल्यावरील आर्वाना हॉलमध्ये होणार आहे. संगीतकार अप्पा वढावकर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कुठल्याही साली पण नोव्हेंबर महिन्यात दिवंगत झालेल्या प्रज्ञावंतांच्या नावाचे ‘दखलपत्र’ चार गुणी व्यक्तींना प्रदान करण्यात येते. यावेळी पत्रकार, चित्रपट समीक्षक शंकरराव संकपाळ, अभिनेते, दिग्दर्शक सुरेश गावडे, आदर्श शिक्षिका शालिनी भाबल, चित्रकार, टॉनिक अंकाचे संपादक कृष्णा मानकर या दिवंगतांच्या नावाचे ‘दखलपत्र’ पत्रकार, चित्रपट समीक्षक संतोष मोरे, लेखक, दिग्दर्शक विजय पाटणकर, आदर्श शिक्षिका पौर्णिमा माने, ज्येष्ठ चित्रकार विनायक गोडकर यांना देण्यात येणार असून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येईल. पत्रकार, लेखक, समीक्षक रमेश उदारे यांच्या मार्गदर्शनात ‘मधुर भाव नाट्य’ ही सेहचाळिसावी स्पर्धा घेतली होती. त्यांच्या स्मृतिदिनाचे निमित्त घेऊन स्पर्धेचे पारितोषिक वितरण याच कार्यक्रमात प्रमुख पाहुण्याच्या हस्ते पार पडेल. प्रत्येक महिन्याला त्याच महिन्यात दिवंगत झालेल्या परंतु महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या एका लोकप्रिय कलाकाराला प्रत्यक्ष कलाकृती सादर करून आदरांजली वाहिली जाते. यंदा हा मान कवी, शाहीर अनंतफंदी यांना देण्यात आलेला आहे. अभिनेता, नृत्य दिग्दर्शक सचिन गजमल त्यांच्या गीतावर नृत्य सादर करून त्यांना नृत्यमय आदरांजली वाहणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा ओगले करणार असून दखलपत्र वाचण्यासाठी मंगेश शेटे, मीरा नांदेडकर, विना घारे या कलाश्रमच्या सदस्यांना निमंत्रित केले आहे.
हा कार्यक्रम विनामूल्य असला, तरी संस्थेचे सभासद, सदस्य आणि निमंत्रित पाहुणे यांनाच प्रवेश दिला जाणार आहे, कार्यक्रमाच्या संयोजिका नयना पराडकर-पाटील यांनी कळवले आहे. आकाश वरळीकर हे या स्पर्धेचे समन्वयक असून जीतू वैष्णव रंगमंच व्यवस्थापक आहेत.
अधिक माहितीसाठी पत्रकार नंदकुमार परशुराम पाटील (संस्थापक-अध्यक्ष, कलाश्रम) यांच्याशी ९८६९००८८०५ या क्रमांकावर संपर्क साधावा.


