रत्नागिरी : ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेची रत्नागिरी शाखा स्थापन करण्यासाठी येत्या रविवारी (दि. ४ डिसेंबर) रोजी सभा आयोजित करण्यात आली आहे.
भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे संस्थापक ग्राहकतीर्थ स्व. बिंदुमाधव जोशी यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून राज्यातील २२ जिल्ह्यांत ग्राहक जागृतीचे कार्य सुरू आहे. ग्राहक पंचायतीचे कार्य कोकणात पोहोचविण्याच्या दृष्टीने जिल्हा तेथे संस्थेची शाखा स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्वसामान्य ग्राहक हा केंद्रबिंदू मानून काम करणाऱ्या ग्राहक पंचायतीची रचना, तत्त्वज्ञान आणि कार्यपद्धतीची ओळख रत्नागिरी जिल्ह्यातील विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना करून देण्याकरिता गेल्या १२ नोव्हेंबर रोजी सभा झाली. रत्नागिरी जिल्ह्यात ग्राहक चळवळ पोहोचविणे आणि जिल्हा शाखा स्थापन करण्यासंदर्भात येत्या रविवारी सकाळी ठीक ११ वाजता रत्नागिरीत रा. भा. शिर्के प्रशालेत सभा आयोजित करण्यात आली आहे.
सभेत संस्थेचे राज्य सदस्य आणि सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील, सचिव संदेश तुळसणकर मार्गदर्शन करणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, ग्राहक चळवळीत काम करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन रत्नागिरीचे प्रतिनिधी विलास घाडीगावकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संदेश सावंत (8379017768) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.