वृद्धाश्रमांची गरज प्रामुख्याने वेगवान जीवनपद्धतीसाठी अनेक कारणांसाठी आहे. विभक्त कुटुंबपद्धती, पती-पत्नी दोघे नोकरीमध्ये, लग्न न झाल्यामुळे, मुले परदेशात अशा अनेक कारणांचा त्यात समावेश आहे. सांगत आहेत, शिरगाव (ता. रत्नागिरी) येथील स्वगृही सेवा संस्था वृद्धाश्रमाच्या श्रीमती वीणा लेले.

गोळप (ता. रत्नागिरी) येथे ऑगस्ट २०१८ पासून दर महिन्याच्या तिसर्या शनिवारी गोळप कट्टा भरविला जातो. या उपक्रमाच्या चाळिसाव्या कार्यक्रमात मान्यवर म्हणून शिरगाव (ता. रत्नागिरी) येथील स्वगृही सेवा संस्थेच्या श्रीमती वीणा लेले उपस्थित होत्या. सौ. आदिती काळे यांनी घेतलेल्या मुलाखतीद्वारे त्यांनी आपला जीवनप्रवास सांगितला. त्या म्हणाल्या, माझे मूळ गाव गोव्यातील. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे घरात खूप माणसे होती. परिस्थिती बेताचीच होती. शालेय शिक्षण कोल्हापूर येथील म्युनिसिपल शाळेपासून चार शाळांमध्ये झाले. बारावी आर्ट्स करत असताना नर्सिंगच्या कोर्सला अॅडमिशन मिळाली. नर्सिंगबद्दल मनात न्यूनगंड होता. त्यामुळे मनातून अजिबात जायचं नव्हतं. शिवाय शॉर्ट हँड केलेलं असल्याने त्यात इंटरेस्ट वाटत होता. लग्न झालेली मैत्रीण त्या कोर्सला होती. ती आणि तिचे पती यांनी मन वळवलं. मग नर्सिंग कोर्सला गेले. पावणेचार वर्षांचा कोर्स होता. नर्सिंग मनापासून आवडायला लागलं. कोल्हापूरच्या सीपीआरला इंटर्नशिप केली. नंतर पेडिअॅट्रिक कोर्स केला. त्यानंतर बीएस्सी नर्सिंग केलं. मग शासकीय नोकरी लागली. पहिलं पोस्टिंग गडहिंग्लजला होतं. नोकरीत तेरा-चौदा बदल्या झाल्या.
दरम्यान राहिलेलं बीएचं शिक्षण बाहेरून पूर्ण केलं. लॉ करायची इच्छा होती. मात्र बाहेरून करता येत नव्हतं आणि नोकरीमुळे राहून गेलं. स्टाफ नर्स नोकरीमध्ये प्रचंड आनंद मिळाला. अगतिक झालेल्या पेशंटची सेवा करून तो बरा झाल्यावर मिळणारा आनंद सर्वोच्च वाटतो. नर्सिंग ही आवड बनली.
नोकरीत असतानाच पुढील आयुष्यात लोकांना सेवा द्यायचं डोक्यात नक्की झालं होतं. त्यात प्रथम प्रसूतिगृह काढायचं डोक्यात होतं. मात्र शेवटी लहान मुलं, तरुण हे वगळून सध्या समाजात थोडेसे दुर्लक्षित असलेले वृद्ध यांच्यासाठी काम करायचं ठरवलं. आधी संस्था स्थापन केली. नंतर वृद्धाश्रम काढायचं ठरवलं. वृद्धाश्रम सुरू करण्याआधी पंधरा वृद्धाश्रम पाहून आले होते. घरातल्या सगळ्यांनी, ओळखीच्या लोकांनी प्रचंड विरोध केला. पगार आहे, नंतर पेन्शन मिळेल. कशाला सुखाचा जीव दुःखात घालायचा? असं सांगून मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. मात्र माझा विचार ठाम होता. जागेचा प्रश्न होता. शिरगावला जागा घेतली. बांधकाम सुरू केलं. आलेल्या अनेक अडचणींवर मात करून बांधकाम झालं. हळूहळू वृद्धाश्रमाची सुरुवात झाली.
सध्या १९ जणांची क्षमता आहे आणि तो पूर्ण भरलेला असतो. बेड रेस्टपासून चालते फिरते असे सर्व प्रकारचे वृद्ध आहेत. त्यांची खाण्यापिण्यापासून आरोग्यापर्यंत पूर्ण काळजी घेतली जाते. चौदा कर्मचारी आहेत. दिवसाचं पूर्ण शेड्युल ठरलेलं असतं. भजन, कीर्तन बाकी मनोरंजन यासाठी सातत्याने कार्यक्रम घेतले जातात. पडणं, आजारपण अशा तात्पुरत्या स्वरूपातसुद्धा वृद्ध येतात. नातेवाईकांचं पूर्ण सहकार्य मिळतं. नातेवाईकांशी नेहमी संपर्कात राहून काम करतो.
करोनाच्या पहिल्या लाटेत फटका बसला नाही. मात्र दुसर्या लाटेत पंधरा दिवसांत सात वृद्ध दगावले. त्यात माझे वडीलसुद्धा गेले. मला स्वतःला करोना झाला. काही कर्मचार्यांनाही लागण झाली. काही कर्मचारी भीतीमुळे येत नव्हते. सहा-सात दिवस सगळ्या वृद्धांची काळजी एकट्याने घेतली. चहा, नाश्ता, जेवण, कपडे भांडी धुणं, ड्रेसिंग, संडास-बाथरूम साफ करणं इत्यादी सगळी कामं स्वतः केली. प्रचंड दगदग झाली. मात्र परिस्थिती अंगावर पडल्यावर अंगात सामोरं जाण्याचं धैर्य आपोआप येतं. त्याप्रमाणे माझ्यातही ते आलं. कर्मचारी मिळतात. त्यांना स्वतः सगळं ट्रेनिंग देते. सेवाभाव हा आतून असला तरच कर्मचारी टिकतात. सध्याचे सगळे कर्मचारी सेवाभावी आहेत.
वृद्धाश्रमाची गरज अनेक कारणांसाठी आहे. विभक्त कुटुंबपद्धती, वेगवान जीवन, पती-पत्नी दोघं नोकरीमध्ये, लग्न न झाल्यामुळे, मुलं परदेशात इत्यादी अनेक कारणांमुळे वृद्धाश्रमाचा आधार वाटतो. आमच्या वृद्धाश्रमात साठीच्या पुढील वृद्ध घेतो.
भविष्यात अनेक गोष्टी करायच्या डोक्यात आहेत. वृद्धांची काळजी घेण्याचा डिप्लोमा कोर्स, डे केअर, हॉलिडे होम, अनाथालय, मतिमंद, गतिमंदांना ठेवण्याची सोय, कायम आजारी वृद्धांसाठी सोय, गोशाळा, सोलर प्लॅन्ट इत्यादी अनेक उपक्रम राबवायचे आहेत. गोशाळेसारखे उपक्रम कायमची गुंतवणूक म्हणून करायचे आहेत, जेणेकरून भविष्यात संस्था त्यावर टिकेल. आर्थिक मदतीला मर्यादा येतात. त्यामुळे भविष्यात अडचण येऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वृद्धांकडून त्यांच्या गरजेनुसार पैसे स्वीकारावे लागतात. मात्र त्यांच्या पूर्ण समाधानासाठी आणि सेवेसाठी ते खर्च होतात. भविष्यातील उपक्रमांसाठी देणगी स्वीकारली जाते. मात्र देणगीदारांनी प्रत्यक्ष भेट देऊन खात्री करावी, हा आग्रह आहे. संस्थेला आयकर सवलत आहे.
यावेळी विविध प्रश्नांना उत्तरं देताना त्या म्हणाल्या, वृद्ध हे लहान मुलाप्रमाणे असल्याने त्यांच्या स्वभावाला जुळवून घ्यावं लागतं. त्यांच्या कलाने घेतो. खोलीत एकमेकांशी जमेल अशांना एकत्र ठेवतो. वृद्धांच्या नातेवाईकांचं पूर्ण सहकार्य मिळतं. आश्रम परिसरात लोकांचं उत्तम सहकार्य मिळतं. असंख्य लोकांचं सहकार्य मिळत आहे. कर्मचारी मिळतात, मात्र ते टिकवणे महत्त्वाचे असते. कर्मचारी चांगले आहेत, म्हणून उत्तम सेवा देता येते. माझी नर्सिंगची पार्श्वभूमी वृद्धाश्रमाला पोषक आहे. त्यामुळे खूप सोपं पडतं.
यादरम्यान त्यांनी नोकरीतील, वृद्धाश्रमातील,वृद्धांचे असंख्य हृदयद्रावक प्रसंग आणि अनुभव सांगितले. यानंतर श्रीमती लेले यांचा सन्मान करून कार्यक्रम संपला.
(वीणा लेले यांचा संपर्क क्रमांक – ९९७०३२७२८९)
- अविनाश काळे, गोळप, ता. रत्नागिरी
(संपर्क – ९४२२३७२२१२)


