आठवड्यातून एक दिवस मोबाइलचा उपवास करावा : डॉ. हिंमतराव बावस्कर

कोल्हापूर : आरोग्य बाजारात विकत मिळत नाही. ते स्वतःलाच कमवावे लागते. आजच्या मोबाइलच्या अतिरिक्त वापरामुळेही शरीराचे भरून न येणारे नुकसान होत आहे. ते दुर्लक्षून चालणार नाही. आठवड्यातून किमान एक दिवस मोबाइलचा उपवास अमलात आणावा, असे आवाहन जागतिक कीर्तीचे ख्यातनाम डॉ. हिमतसिंह बावस्कर यांनी केले.

कणेरी (कोल्हापूर) येथील सिद्धगिरी मठाने आयोजित केलेल्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात पहिल्या दिवशीच्या आरोग्यविषयक सत्रात मुख्य मंडपात पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. ते म्हणाले, आज अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भागवण्याकरिता अनेक साधने आहेत. तसेच शैक्षणिक गरजाही पूर्ण करण्यासाठी विविध साधने आहेत, पण आरोग्यविषयक संपन्नता बाजारात कुठेही विकत मिळत नाही, ती कमवावी लागते. त्यामुळे आरोग्य हा विषय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मोबाइलच्या वापरामुळे कानाच्या कॅन्सरसोबतच माणसातील संवाद अतिशय दुर्मिळ होत आहे. मोबाइलमुळे अगदी घरात होणारा संवादही दुर्मिळ होत आहे. याशिवाय स्मृतिभ्रंशासारख्या समस्या वाढत आहेत. लहान बाळाची बौद्धिक वाढ किमान पाच वर्षांपर्यंत होत असते. त्यामुळे या काळात त्याला पाळणाघर अथवा इतरांच्याकडे सोपवणे योग्य नाही, पाच वर्षांपर्यंत त्याला आईचा सहवास मिळणे त्याच्या बौद्धिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.

आजच्या फास्टफूडच्या अतिरिक्त सेवनाने आरोग्याचा तोल ढासळून तणावपूर्ण जीवन वाढत आहे, असे सांगून डॉ. बावस्कर म्हणाले की, माणसाला अनेक प्रकारची व्यसने आज जडली आहेत. दारू, सिगारेट, तंबाखू अशी व्यसने प्रचलित असली तरी याशिवायही अनेक व्यसने आहेत. अगदी खोट बोलण्यासारखी व्यसनेही आहेत. मधुमेह, कमी वयातील ह्रदयविकाराचे वाढते प्रमाण, अनेक आजारांचे प्रमाण ही व्यायामाच्या अभावाची लक्षणे आहेत. शारीरिक व्यायामासोबत मानसिक स्वास्थ्यही सुदृढ होणे गरजेचे आहे. नैसर्गिक सोयीसुविधा, आहार-विहार-विचार आचरणात आणल्यास चांगल्या जगण्याबरोबरच सुखद मृत्यू येऊ शकतो. त्यामुळे वेळीच पर्यावरण आणि आरोग्याकडे लक्ष द्यावे. अन्यथा विनाश व्हायला खूप वेळ लागणार नाही. अतिरिक्त विचारांना विराम देऊन अध्यात्म ज्ञानाचा संगम साधल्यास जीवन परिपूर्ण करण्यास मदत होईल, असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. सिद्धगिरी मठावर होणारा पर्यावरण आणि आरोग्याचा जागर जगाला परिपूर्ण आरोग्याची दिशा देणारा ठरणार आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर सुरेंद्र जैन, हरीश बोटले, विनय हसबनीस, प्रकाश पाटील उपस्थित होते. डॉ. संदीप पाटील यांनी स्वागत केले. सुमंगलम उत्सवाला भेट देणाऱ्या असंख्य लोकांनी या व्याख्यानाचा लाभ सभामंडपासोबतच थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून घेतला.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply