सिंधुदुर्गनगरी : मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा पुढे नेण्याचे काम पत्रकारांनी करावे. हे पत्रकार भवन पत्रकारांना प्रेरणा आणि ऊर्जा देणारे ठरेल. या ज्ञान मंदिराचे पावित्र्य जतन करून बाळशास्त्री जांभेकराच्या पत्रकारितेचा वारसा पुढे नेऊ या, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे येथील स्मारक आणि पत्रकार भवनच्या उद्घाटन प्रसंगी (दि. २० फेब्रुवारी) दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी सामाजिक सुधारणेवर भर दिला. त्यांचे स्मारक मराठी पत्रकारांना, भावी पत्रकारांना प्रेरणा देणारे, ऊर्जा देणारे ठरेल. ज्ञान मंदिर बनवून त्याचे पावित्र्य जतन करू या. त्यांचा वारसा पुढे नेण्याचे काम पत्रकारांना करायचे आहे. हे स्मारक त्यासाठी प्रेरणा आणि स्फूर्ती देणारे ठरेल. भविष्यातही जे जे आवश्यक आहे. ते ते सरकार पूर्ण करेल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनीही दूरदृश्य प्रणालीद्वारे स्मारकाला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर हे महाराष्ट्राचे भूषण आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पत्रकार भवनाची आवश्यकता होती. ती आता पूर्ण झाली आहे. यापुढील काळातही पत्रकार भवनाबाबत सर्वतोपरी मदत शासनाच्या माध्यमातून केली जाईल. पत्रकार भवनामध्ये सुसज्ज ग्रंथालय होण्यासाठी मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून पुस्तके दिले जातील.

बाळशास्त्री जांभेकर स्मारक आणि पत्रकार भवनाचे उद्घाटन फीत कापून तसेच कोनशिला अनावरण करून केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले. त्यानंतर जिल्हा नियोजन समिती नवीन सभागृहात झालेल्या कार्यक्रमात श्री. राणे म्हणाले, आपला पेशा पत्रकारितेचा आहे, त्याचे पावित्र्य टिकवणे हा आपला धर्म आहे. आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी विधायक, विकासात्मक कार्यकर्तृत्वाची ऊर्जा मराठी पत्रकारितेतून दिली आहे. आपले काय योगदान आहे, याचाही विचार व्हायला हवा. त्यासाठी समाजप्रबोधन होऊन समाजाच्या विकासाचे प्रगतीचे विषय भवनातून हाताळले जावेत.
श्री. राणे म्हणाले, आज राज्यभरातील पत्रकारांसाठी एक हक्काचे दालन सज्ज झाले आहे. स्मारक आणि भवन उभारण्यामागे सर्व पत्रकारांचे योगदान आहे. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाकडे पाहून चांगले गुण आत्मसात करावेत. पत्रकारितेत त्यांनी सांगितलेले पावित्र्य जोपासले आहे का, पावित्र्याचा अंगीकार केला आहे का, त्याचा अंमल होतो आहे का, याचा विचार मंथनातून व्हावा. त्यावेळची पत्रकारिता आता कोठे गेली, याचाही विचार व्हायला हवा. पत्रकारिता हे आयुध आहे. त्यासाठी अभ्यास लागतो. विकास, बेरोजगारी, जीडीपी, उद्योगधंदे, रोजगारावर वृत्तपत्रातून मार्गदर्शन व्हायला हवे, त्यासाठी आवश्यक पोषक वातावरण बनवणे पत्रकारांचे काम आहे. पत्रकार परिषदेत विकासावर प्रश्न असावेत. जिल्ह्याच्या विकासाला पोषक, समृद्धीचे वातावरण निर्माण करावे, समाजाला प्रेरणा देऊन उत्तेजन देऊन, समाजाचे प्रबोधन करून समाजाच्या विकासाचे, प्रगतीचे विषय भवनातून हाताळले जातील, लिहिले जातील, असे काम व्हायला हवे. आपला जिल्हा देशात समृद्ध जिल्हा म्हणून ओळखला जावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
आमदार नितेश राणे म्हणाले, काळानुरूप पत्रकारितेत झालेल्या बदलांची दखल जिल्ह्यातील पत्रकारांनी घ्यावी. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या पत्रकार भवनात व्हावा. या भवनातून विचारमंथन होऊन विकासात्मक पत्रकारिता घडत जावी. जिल्ह्यात एक दर्जेदार पत्रकार भवन उभे राहावे, अशी सर्व पत्रकारांची इच्छा होती. ती यानिमित्ताने पूर्णत्वास आली आहे.
जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी स्मारक आणि पत्रकार भवन पूर्णत्वास आणल्याबद्दल सर्व आजी-माजी पत्रकार आणि अधिकारी यांचे अभिनंदन केले. त्या म्हणाल्या, राज्यातील, जिल्ह्यातील प्रशासन आणि पत्रकारांनी मिळून एवढा मोठा प्रकल्प पूर्ण केला आहे. हे काम जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी करून दाखविले. स्मारकाची देखभाल-दुरुस्ती पुढे कशी करता येईल, याचेही नियोजन करावे. याही पुढच्या काळात प्रशासनाच्या माध्यमातून संपूर्ण सहकार्य दिले जाईल.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पद्मश्री परशुराम गंगावणे, कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एम. एम. देशमुख, किरण नाईक, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, सचिव देवयानी वरसकर, माजी आमदार राजन तेली, जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक, अण्णा केसरकर, नंदकिशोर महाजन, शशी सावंत, गणेश जेठे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष मनीष दळवी आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा पत्रकारितेचा वारसा कथन केला. स्मारक साकारण्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. श्री. तोरसकर यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेचा इतिहास सांगितला आणि पत्रकार भवन उभारणी सहाय्य केलेले सर्व पत्रकार, प्रशासन आणि पक्षाचे पदाधिकारी यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे ऋण व्यक्त केले.
जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गजानन नाईक, पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एम. एम. देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कै. जयानंद मठकर यांचे वारसदार, कै. श्रीधर मराठे यांचे वारसदार, माजी अध्यक्ष गजानन नाईक, संतोष वायगंणकर, वसंत केसरकर शशी सावंत, गणेश जेठे, स्मारकातील बाळशास्त्री जांभेकर यांच्या मूर्तीचे शिल्पकार विलास मांजरेकर आणि वास्तुतज्ज्ञ अमोल नष्टे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, शाखा अभियंता विनायक जोशी, संजय दहीफळे, उपअभियंता युतिका केणी यांना सन्मानित करण्यात आले. अर्चना घारे-परब यांनी पत्रकार भवनाला शंभर पुस्तके भेट दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलेश जोशी आणि ज्योती तोरसकर यांनी केले, तर गणेश जेठे यांनी आभार मानले.
(महाराष्ट्राच्या आधुनिकतेचे अग्रदूत ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर; लेखक : यशवंत पाध्ये; प्रकाशक : राजे पब्लिकेशन्स) (हे पुस्तक ‘ई-बुक’ स्वरूपात खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)
Follow Kokan Media on Social Media

