सायकल फेरी काढून कुलगुरू डॉ. संजय भावे यांचा सन्मान

दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नव्याने नियुक्ती झालेले डॉ. संजय भावे यांच्या सन्मानासाठी आज दापोलीत काढण्यात आलेल्या सायकल फेरीला चांगला प्रतिसाद मिळाला.

डॉ. भावे कोकण कृषि विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी याच विद्यापीठामधून आनुवंशिकता आणि वनस्पती प्रजनन या विषयात आचार्य पदवी प्राप्त केली आहे. गेली ३३ वर्षे ते या विद्यापीठात विविध पदांवर कार्यरत आहेत. गाडी असूनही घर ते कार्यालय ये-जा करण्यासाठी ते अनेक वर्षे सायकल वापरतात. त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे आज सायकल फेरी काढण्यात आली.

आझाद मैदानावरून निघालेली ही फेरी केळस्कर नाका, बुरोंडी नाका, कुलगुरू निवास, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, पांगारवाडी जालगाव, वडाचा कोंड, आझाद मैदान या मार्गाने ६ किलोमीटरचा प्रवास करून पुन्हा आझाद मैदानात दाखल झाली. यामध्ये सर्व वयोगटातील नागरिक सायकल चालवत सहभागी झाले होते.

कुलगुरू निवासात डॉ. भावे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या सेवाभावाला सलाम करण्यात आला. यावेळेला अनेक विषयावर गप्पा रंगल्या. डॉ. भावे यांनी गोवा, औरंगाबाद, पुणे, सिंधुदुर्ग इत्यादी दूरचे सायकल प्रवास केले आहेत. करोना लॉकडाउनपर्यंत ते कार्यालयात ये-जा करण्यासाठी सायकलचा वापर करायचे. याबद्दलच्या आठवणी, गमतीजमती त्यांनी सांगितल्या. आता आरोग्य जपण्यासाठी पुन्हा सायकल चालवायला सुरवात करेन, असेही त्यांनी सांगितले.

सायकल फेरीचे नियोजन करण्यासाठी विनय गोलांबडे, केतन पालवणकर, अंबरीश गुरव, सूरज शेठ, सुनील रिसबूड, सत्यवान दळवी इत्यादींचे सहकार्य लाभले. आजच्या मैत्रीदिनापासून सायकलसोबत मैत्री करू या. दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करू या आणि आरोग्य तंदुरुस्त ठेवू या, असे आवाहन दापोली सायकलिंग क्लबतर्फे करण्यात आले आहे.


कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply