मळगावमध्ये दीड दिवसासाठी नागोबाची प्रतिष्ठापना

सावंतवाडी : मळगाव (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) येथील गोसावी घराण्यात गेल्या दोनशे वर्षांहून अधिक काळ दीड दिवस नागपूजन करण्याची परंपरा जपली जात आहे. प्रथेप्रमाणे यावर्षी नागपंचमीला (दि. २१ ऑगस्ट) पाच फडांच्या नागाचे पूजन तेथे करण्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीड, पाच, सात, नऊ आणि अकरा दिवसांचा गणपती माहीत आहे. मात्र सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील गोसावी घराण्यात चक्क दीड दिवस नागोबाचे पूजन करून नागपंचमी साजरी करण्याची अनोखी परंपरा आजही सुरू आहे. मळगावच्या रस्तावाडीतील गोसावी घराण्यात ही प्रथा आहे. श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणून नागपंचमीला विशेष ओळख आहे. पारंपरिक सण-उत्सवातील धार्मिकता जोपासणारा आणि प्राणिमात्रांविषयी प्रेमभावना, निसर्ग-संवर्धन आणि सामाजिक एकोपा निर्माण करणारा सण म्हणूनही नागपंचमीकडे पाहिले जाते. शेतकऱ्यांचा मित्र समजल्या जाणाऱ्या नागाची विधिवत पूजा करून नागपंचमी साजरी केली जाते. मातीच्या नागप्रतिमेचे पूजन करून तिला लाह्या आणि दुधाचा नैवेद्य दाखविला जातो.

नागपंचमीला इतर ठिकाणी सकाळी मूर्ती आणून सायंकाळी पाचच्या सुमारास अळवाच्या पानांखाली त्याचे विसर्जन केले जाते. मात्र मळगावच्या गोसावी घराण्यात दीड दिवस पाच फडांच्या नागोबाची पूजा केली जाते. ही परंपरा शांताराम बंडू गोसावी आणि रामचंद्र बंडू गोसावी. त्यांच्यानंतर त्यांची मुले धर्मनाथ शांताराम गोसावी, संजय शांताराम गोसावी, सतीश रामचंद्र गोसावी, चंद्रकांत बाबी गोसावी आणि त्यांचे कुटुंबीय जतन करीत आहेत.

नागपंचमीच्या पूर्वसंध्येला ब्राह्मण भोजन व एकादष्णी केली जाते. यावेळी कुलदेवतेची पूजा करण्यात येते. पंचमीला नागोबाचे विधिवत पूजन करण्यात येते. दुसऱ्या दिवशी सकाळी व दुपारी नागाला करंज्यांचा नैवेद्य दाखविण्यात येतो. सायंकाळी अळवाच्या पानांमध्ये नागाचे विसर्जन केले जाते. विसर्जनानंतर शेवग्याची भाजी आणि भाकरी असा प्रसाद दिला जातो

महिलांचा ‘ओवसा’, फुगड्या कार्यक्रम
दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपंचमीला सकाळी नागाची मूर्ती आणून मूर्तीभोवती आकर्षक आरास करण्यात आली. त्यानंतर नागोबाचे विधिवत पूजन करण्यात आले. दूध-लाह्यांचा नैवेद्य दाखविण्यात आला. दुपारी गोसावी घराण्यातील महिलांचा “ओवसा” तर सायंकाळी भजन-फुगड्या आदी कार्यक्रम आहेत.

मळगाव तसेच पंचक्रोशीतील भाविक सकाळपासूनच नागोबाचे दर्शन घेत आहेत. मंगळवारी (दि. २२ ऑगस्ट) नागोबाचे पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन केले जाणार आहे.
(विवेक (राजू) परब)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply