कला अकदमीचे केंद्र राज्यात सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार – राज्यपाल

मुंबई : नवी दिल्लीतील ललित कला अकादमीचे विभागीय केंद्र महाराष्ट्रात सुरू करण्यासाठी केंद्र आणि राज्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन राज्यपाल रमेश बैस यांनी दिले.

सर ज. जी. उपयोजित कला महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. गजानन शेपाळ यांच्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या दृश्यकलाविषयक लेखांचे संकलन असलेल्या ‘रंगसभा’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल बैस यांच्या हस्ते शनिवारी (दि. १९) महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. ललित कला अकादमीच्या विभागीय केंद्रासाठी आपण व्यक्तिशः लक्ष घालू, असेही ते म्हणाले.

सर्जनशील आणि सांस्कृतिक उद्योग क्षेत्र जगातील अर्थव्यवस्थेत सर्वाधिक गतीने वाढणारे क्षेत्र आहे. कलात्मक वस्तूंचा जागतिक व्यापार सातत्याने वाढत आहे. या क्षेत्रात रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होत आहेत. या संधींचा कलाकारांनी लाभ घ्यावा, असे राज्यपालांनी यावेली सांगितले. कला, शिल्पकला, वारसा, संगीत या क्षेत्रात खासगी क्षेत्रानेदेखील गुंतवणूक करावी, असेही ते म्हणाले. न्यूयॉर्क येथील ‘मेट गाला’ फॅशन उत्सवाप्रमाणे मुंबईचादेखील कलाविषयक ‘मेट कला’ महोत्सव असावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्यातील कला महाविद्यालयांमध्ये हजारो विद्यार्थी कला शिक्षण घेत आहेत. या महाविद्यालयांचे बळकटीकरण करून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण केले पाहिजे. या दृष्टीने कला संस्थांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत आपण शासनाला सूचना करू, असेही राज्यपालांनी सांगितले.

आदिवासी समाज तसेच ग्रामीण भागात लोक घरी चित्रे लावतात किंवा रांगोळी काढतात. त्याचप्रमाणे शहरातील लोकांनादेखील आपल्या घरी, भिंतींवर कलाकृती लावावी. मात्र ती कलाकृती जनसामान्यांना परवडणारी असली पाहिजे. तसे झाल्यास कलेचे लोकशाहीकरण होईल. आपल्या कलाकृती परवडणाऱ्या नसल्या तर चीनसारखे देश आपल्या स्वस्त कलाकृती आणि मूर्ती घरोघरी पाठवतील, असा इशारा राज्यपालांनी दिला.

आपण स्वतः एक छोटे दृश्य कलाकार असून जे जे स्कूलला भेट देण्याचे आपले स्वप्न होते, असे राज्यपालांनी सांगितले. गजानन शेपाळ यांनी राज्यातील अनेक ज्ञात-अज्ञात दृश्य कलाकारांना तसेच कला संस्थांना आपल्या लेखनाच्या माध्यमातून प्रकाशात आणल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या मराठी वृत्तपत्रलेखक संघ मुंबईने अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल राज्यपालांनी संस्थेचे अभिनंदन केले.

प्रकाशन सोहळ्याला ललित कला अकादमीचे माजी अध्यक्ष डॉ. उत्तम पाचरणे, मुंबईच्या मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, ज्येष्ठ पत्रकार विवेक सबनीस, उपयोजित कला महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ संतोष क्षीरसागर आणि कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर, कार्याध्यक्ष रमेश सांगळे, कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड, नितीन कदम, राजन देसाई, दिगंबर चव्हाण, विजय ना. कदम, मनोहर साळवी, सतीश भोसले, सुनील कुवरे, दत्ताराम गवस, अब्बास अतार, प्रकाश बाडकर, दिलिप ल. सावंत, नंदकुमार रोपळेकर, पास्कोल लोबो, जे. जी. स्कूलमधील प्रा. राहुल मेश्राम, दीपक वर्मा, सौ. नीता चौधरी, सौ राधिका कुसुरकर-वाघ आदींनी विशेष मेहनत घेतली.

(रवींद्र मालुसरे, मुंबई)





कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply