Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

आरएचपी फाउंडेशनच्या आसूद येथील शिबिराचा दिव्यांगांना लाभ

Advertisements

रत्नागिरी : दापोली तालुक्यातील आसूद, आंबवली खुर्द, सालदुरे आणि परिसरातील ग्रामपंचायतींसाठी रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनतर्फे आयोजित केलेल्या शिबिराचा दिव्यांगांना चांगला लाभ झाला.

आरएचपी फाऊंडेशनचे सदस्य रवींद्र मुकनाक, संदीप भुवड, दिलीप नरवणकर, गुलाब खांबे आणि रवींद्र पोमेंडकर तसेच आसूद ग्रुप ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या शिबिराला दिव्यांगांसह आसूदचे सरपंच कल्पेश कडू, उपसरपंच राकेश माने, ग्रामपंचायत सदस्य नासीर मुरूडकर, कर्मचारी दीपक मुरकर, गावकरी दिलीप आंब्रे आणि गावातील इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

सरपंच श्री. कडू यांनी प्रास्ताविक केले. आरएचपी फाऊंडेशनच्या सदस्य प्रिया बेर्डे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. संस्थेचे सदस्य समीर नाकाडे यांनी शासनाच्या विविध दिव्यांग योजनांबद्दल इत्थंभूत माहिती दिली. दिव्यांगांचे अपंग प्रमाणपत्र कसे काढले जाते, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद ५ टक्के निधी कसा मिळवायचा याची माहिती त्यांनी दिली. दिव्यांग पेन्शन, दिव्यांग व्यवसाय कर्ज, मतिमंद दिव्यांगांसाठी पालकत्व करणे का आवश्यक आहे याचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. त्याचबरोबर दिव्यांगांच्या शंकांचे निरसन केले.

या शिबिराचा लाभ दिव्यांगांना मिळणार असल्याने दिव्यांगांनी फाउंडेशनचे आभार मानले.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version