रत्नागिरी : रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनचा (आरएचपी) सभासद मंदार रमेश आगरे (रा. तुळसणी, ता. संगमेश्वर) मार्च २०२२ मध्ये झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत ७९ टक्के गुणांनी उत्तीर्ण झाला. त्याच्या अपंगत्वावर त्याने जिद्दीने केलेले प्रयत्न श्रेष्ठ ठरले.

मंदारचा पाच वर्षापूर्वी २०१७ साली तो आठवीत असताना दुचाकीवरून जाताना पडल्याने अपघात झाला होता. त्यानंतर दोन वर्षे तो सर्वसामान्य जीवन जगत होता. काहीच त्रास होत नव्हता. त्यानंतर डिसेंबर २०१९ मध्ये तो दहावीत असताना कबड्डी खेळायला गेला होता. खेळून घरी परत आल्यावर दोन दिवस ताप आला आणि हळुहळू कमरेपासून खालच्या भागाची त्याची ताकद कमी होत गेली. त्यामुळे त्याला अपंगत्व आले. तो पॅराप्लेजिक असून व्हीलचेअरविना फिरू शकत नाही. त्यावेळी त्याला रुग्णालयात असल्याने दहावीची परीक्षा देता आली नव्हती. यावर्षी मंदारने जिद्दीने घरी बसून अभ्यास करून दहावीची परीक्षा दिली आणि घवघवीत यश मिळविले. त्यामुळे त्याचे सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.
अपंगत्व आल्यानंतर कमरेखाली संवेदना नाहीशा झाल्या. पण मंदारने जिद्दीने आइस्क्रिमच्या काड्यांपासून विविध हस्तकलेच्या वस्तू बनवायला सुरवात केली. पक्षी, प्राणी, जहाज, इमारत, मंदिर यांसह विविध प्रकारचे शोपीस तो साकारतो, हे विशेष आहे.
मंदारने यूट्यूबवर पाहून पॅराप्लेजिक पेशंट बेडवर, व्हीलचेअरवर कसे बसतात ते पाहून तो ते सर्व शिकला. कोणाकडूनही विशेष प्रशिक्षण न घेता तो स्वत:च स्वत:चे सारे करायला शिकला. पराकोटीचे अपंगत्व येऊनही रडत न बसता लढायला शिकला. आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे, सदस्य समीर नाकाडे, प्रिया बेर्डे यांनी मंदारच्या घरी जाऊन त्याची सर्व माहिती घेतली. त्याच्या दहावीतील यशाबद्दल त्याचे अभिनंदन केले.
त्याला पॅराप्लेजिक रुग्ण स्वत: पोट कसे साफ करतात, युरीन इन्फेक्शन होऊ नये, बेडसोअर होऊ नये, यासाठी कशी काळजी घ्यायची, बेडवरून व्हीलचेअरवर आणि व्हीलचेअरवरून कमोडवर कसे जायचे, पायर्यांवरून व्हीलचेअर कशी चढवायची, उतरावयाची, नाष्टा, जेवण, झोपणे, उठणे, व्यायामाच्या वेळा ठरविणे याविषयी सविस्तर माहिती आणि प्रशिक्षण त्याला रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनने मदत केली. अपंगत्वाचा दाखला, एसटी पास, रेल्वे पास, युनिक आयडी, शासकीय योजना, दिव्यांग निधी याविषयी माहिती आणि आवश्यक कागदपत्र याविषयी पूर्ण माहिती दिली. मंदारला पुढील आयुष्यासाठी आणि पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देऊन आरएचपी फाउंडेशनने मोलाची मदत मंदारला केल्याबद्दल आगरे कुटुंबीयांनी आभार मानले.



मंदारने तयार केलेल्या विविध कलात्मक वस्तू
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड