सेवानिवृत्त विमा अधिकाऱ्याकडून अपंगाला व्हीलचेअरची मदत

रत्नागिरी : सेवानिवृत्त विमा अधिकारी सौ. मनाली खवळे यांनी संदेश रवींद्र लांजेकर या अपंगाला व्हीलचेअर देऊन त्याच्या आयुष्यात आनंद फुलविला. आरएचपी फाउंडेशनतर्फे ही मदत देण्यात आली.

संदेश लांजेकर हा मूळचा तुळसणी (ता. संगमेश्वर) येथील २४ वर्षांचा तरुण सध्या रत्नागिरीत राहतो. त्याला जन्मत:च सेरेब्रल पाल्सी हे अपंगत्व आहे. त्याच्या दोन्ही हातापायांमध्ये ताकद कमी असल्याने तो कधीच चालू शकला नाही. त्याचे कुटुंबीय त्याला शाळेत नेऊन सोडायचे आणि आणायचे. पाच वर्षांचा असताना मुंबईत केईएम हॉस्पिटलमध्ये त्याच्या पायावर शस्त्रक्रिया झाली. सायन येथील पॅराप्लेजिक फाउंडेशनमध्येही त्याने चार वर्षे फिजिओथेरपी घेतली. पण फारसा फरक पडला नाही. चौथीपर्यंतचे त्याचे शिक्षण तुळसणी (ता. संगमेश्वर) या त्याच्या गावी झाले. त्यानंतर मिरज येथील शासकीय अपंग संस्थेत पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. पुढील शिक्षणासाठी तो रत्नागिरीत आला. आंबेडकर भवन येथे राहून गोगटे जोगळेकर महाविद्यालयात त्याने बारावीपर्यंतचे शिक्षण व्हीलचेअरवरुन जाऊन पूर्ण केले. सध्या तो घरीच असतो. पुढील शिक्षण थांबविले आहे. त्याची व्हीलचेअर नादुरुस्त झाल्याने त्याला बाहेर कुठेच जाता येत नाही.

संदेश चार भावंडांमध्ये सर्वांत मोठा मुलगा असून त्याला धाकट्या तीन बहिणी आहेत. एका बहिणीचे लग्न झाले आहे. एक बहीण दुकानात कामाला जाते, तर धाकटी बारावीत शिकते. वडील राजेंद्र दत्ताराम लांजेकर मुंबईला प्रेसमद्ये काम करत होते, पण आता ते घरीच असतात. आई सौ. रजनी गृहिणी आहे. इतरांचे घरकाम करून त्या उपजीविका करतात. सध्या आई आणि बहीण कमावतात. त्यावरच त्यांचा कौटुंबिक खर्च चालतो.

संदेशच्या पालकांनी आरएचपी फाउंडेशनला व्हीलचेअरसंदर्भात संपर्क साधला. संस्थेचे अध्यक्ष सादिक नाकाडे यांनी संदेशची सविस्तर माहिती घेतली. संस्थेचे सदस्य समीर नाकाडे यांना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या सेवानिवृत्त अधिकारी सौ. मनाली विनायक खवळे यांनी दिव्यांगांसाठी मदत करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्याप्रमाणे समीर नाकाडे यांनी सौ. खवळे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी संदेशला उपयुक्त व्हीलचेअरची मदत केली. त्यामुळे लांजेकर कुटुंबीयांनी मालती खवळे आणि आरएचपी फाउंडेशनचे आभार मानले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply