रत्नागिरी : नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी म्हणजेच ७ जानेवारी २०२४ रोजी रत्नागिरी धावनगरी होणार असून सुवर्णसूर्य फाउंडेशनने त्या आयोजित केलेल्या कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या सरावाला २ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.
दरवर्षी नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी संपूर्ण जगभरातील धावपटू रत्नागिरीत येऊन धावले पाहिजेत, या उद्देशाने रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या सहकार्याने सुवर्णसूर्य फाउंडेशनने येत्या ७ जानेवारी रोजी कोकण कोस्टल मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. त्याकरिता नोंदणीला सुरुवात झाली आहे. कोकणातून तसेच कोकणाबाहेरून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
या मॅरेथॉनकरिता करायच्या सरावाची सुरुवात रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सेक्रेटरी संदीप तावडे यांच्या उपस्थितीत आणि रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या सहकार्याने गांधी जयंतीच्या शुभमुहूर्तावर सुवर्णसूर्य फाउंडेशन करत आहे. यानंतर प्रत्येक रविवारी अशा प्रॅक्टिस रन आयोजित केल्या जातील.
ज्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे किंवा ज्यांची रजिस्ट्रेशन करण्याची इच्छा आहे, अशा सर्वांसाठी हा सराव मोफत असून थिबा पॅलेस गेट ते शासकीय विश्रामगृह या मार्गावर २ ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वासहा ते साडेसात या वेळेत शुभारंभाचा सराव होईल.
तज्ज्ञ व्यक्तींच्या निरीक्षणाखाली या प्रॅक्टिस रन असतील. तसेच सर्व धावकांना प्रॅक्टिस प्रोग्रॅमदेखील देण्यात येणार आहे. रत्नागिरीला धावनागरी बनवण्याच्या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वांचा जानेवारीपर्यंत धावण्याचा व्यवस्थित सराव व्हावा, धावण्यातील बारकावे त्यांच्या लक्षात यावेत आणि धावण्याची आवड सर्वांमध्ये निर्माण व्हावी, या उद्देशाने मुख्य स्पर्धेच्या जवळपास १०० दिवस आधीपासूनच मोहिमेची तयारी सुरू झाली आहे.
जास्तीतजास्त रत्नागिरीकरांनी अर्धा लिटर पाण्याची बाटली, चिक्की/केळे तसेच नॅपकिन घेऊन या प्रॅक्टिस रनमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन सुवर्णसूर्य फाउंडेशन, रत्नागिरी ॲथलेटिक्स असोसिएशन आणि रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने केले आहे. अधिक माहितीसाठी ९१५१५५१५४७ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

