रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारे वाङ्मयीन आणि वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
हे पुरस्कार कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ग्रंथ निवड व पुरस्कार समितीचे प्रमुख प्रा. अशोक रामचंद्र ठाकूर यांनी जाहीर केले.
दरवर्षी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने वाङ्मयीन व वाङ्मयेतर पुरस्कारासाठी विहित कालावधीतील प्रस्ताव मागितले जातात. त्यानुसार आलेल्या प्रस्तावांची परीक्षकाकडून छाननी केली जाते. त्यानंतर पुरस्कार जाहीर केले जातात. त्यानुसार हे पुरस्कार जाहीर केले आहेत.
सन २०२१ – २२ चे पुरस्कार असे – कादंबरी – प्रथम – र. वा. दिघे स्मृती पुरस्कार अशोक समेळ (ते आभाळ भीष्माचे होते), द्वितीय – वि. वा. हडप स्मृती पुरस्कार भारती मेहता (सुटका). कथा – प्रथम वि. सी. गुर्जर स्मृती पुरस्कार विवेक वसंत कुडू (चार चपटे मासे) , द्वितीय – विद्याधर भागवत स्मृती पुरस्कार माधव सावरगावकर (गावगोत). कविता – प्रथम – आरती प्रभू स्मृती पुरस्कार अनुपमा उजगरे (काजव्यांचे झाड), द्वितीय – वसंत सावंत स्मृती पुरस्कार प्रतिभा सराफ (उमलावे), आत्मचरित्र – धनंजय कीर स्मृति पुरस्कार मुरलीधर नाले (संध्या समई). चरित्र – श्रीकांत शेट्ये स्मृती पुरस्कार अशोक चिटणीस (वेचित आलो सुगंध मातीचे). समीक्षा – प्रभाकर पाध्ये स्मृती पुरस्कार डॉक्टर फादर टॉनी जॉर्ज (गोष्ट एका सांस्कृतिक अपूर्व संगमाची). नाटक – भाई भगत पुरस्कार प्राध्यापक विजया पंडितराव (कोंडवाडा आणि दोन एकांकिका). ललितगद्य – अनंत काणेकर स्मृती पुरस्कार साहेबराव ठाणगे (सोयरे सकळ). बालवाङ्मय – प्र. श्री. नेरूरकर स्मृती पुरस्कार स्वप्नील चाफेकर (मनी माऊचं पिल्लू). संकीर्ण – प्रथम – वि. कृ. नेरूरकर स्मृती पुरस्कार जॉन गोन्साल्विस (ज्याच्या हाती पुस्तक), द्वितीय – अरुण आठल्ये स्मृती पुरस्कार सतीश नथुराम पाल (आम्ही कुणबी). वैचारिक – फादर स्टीफन सुवार्ता पुरस्कार प्रशांत राऊत (आनंद नांदे अंबरी).
कोकण मराठी साहित्य परिषदेचे संपादन, कथासंग्रह, कादंबरी विभागातील विशेष पुरस्कार अनुक्रमे अनुराधा नेरूरकर, स्नेहल फणसळकर, वैशाली पंडित यांना जाहीर झाले आहेत.
वाङ्मयेतर पुरस्कारांमध्ये पालघर व ठाणे जिल्ह्यात साहित्य, पर्यावरण, शिक्षण आदी क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा कै. पद्मश्री भाऊसाहेब वर्तक प्रतिष्ठान पुरस्कार सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. किरण सावे यांना, तर संपूर्ण कोकणात साहित्य, पर्यावरण, शिक्षण क्षेत्रात योगदान असलेल्या व्यक्तीला देण्यात येणारा श्री. बा. कारखानीस पुरस्कार देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद मधुकर भागवत यांना जाहीर करण्यात आला आहे. गुरुवर्य अ. आ. देसाई कोमसाप कार्यकर्ता पुरस्कार नवी मुंबईच्या सीबीडी शाखेचे शामसुंदर गावकर व रायगड जिल्ह्यातील नवीन पनवेल शाखेचे विलास पुंडले यांना, राजा राजवाडे स्मृती वाङ्मयीन कार्यकर्ती पुरस्कार ठाण्याच्या मनीषा चव्हाण व पालघरमधील बोईसर शाखेच्या मधुमती कुलकर्णी, वामनराव दाते स्मृती उत्कृष्ट कोमसाप शाखा पुरस्कार रत्नागिरीतील मालगुंड शाखा आणि मुंबईतील वांद्रे शाखा, ग्रामीण भागातील स्त्री लेखिकेसाठीचा सौ. नमिता कीर लक्षवेधी पुरस्कार ठाण्याच्या मीना मधुकर घोडविंदे यांना, सुलोचना मुरारी नार्वेकर स्मृती पुरस्कार सावंतवाडीच्या उज्ज्वला विलास गोवेकर यांना, उमेदीच्या गुणवंत कवीस देण्यात येणारा कवी उमाकांत कीर स्मृति काव्य पुरस्कार पालघरचे कमलाकर राऊत यांना आणि युवा विभागात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला देण्यात येणारा कोमसाप युवा कार्यकर्ता पुरस्कार मुरूडच्या सिद्धेश संतोष लखमदे यांना जाहीर झाला आहे.
पुरस्कार विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, विश्वस्त रमेश कीर, रेखा नार्वेकर, अरुण नेरूरकर यांच्यासह कोमसाप परिवारातर्फे पुरस्कारविजेत्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

