धावनगरी रत्नागिरी मोहिमेला पुरातत्त्व विभागाची साथ

रत्नागिरी : येत्या ७ जानेवारी रोजी होणार असलेल्या कोकण कोस्टल मॅरेथॉनला भारतीय पुरातत्त्व विभागाचे सक्रिय सहकार्य लाभणार आहे. मॅरेथॉनच्या सराव सत्रासाठी थिबा पॅलेसचे प्रांगण खुले करण्यात आले.

रत्नागिरी जिल्हा फिटनेस टुरिझम ऑफ इंडियासाठी प्रसिद्ध होऊ शकतो, या संकल्पनेतून सुवर्णसूर्य फाउंडेशनने कोकण कोस्टल मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. मॅरेथॉनच्या माध्यमातून नवीन वर्षाचा पहिला रविवार दरवर्षी रत्नागिरी धावनगरी व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. धावनगरी रत्नागिरी मोहिमेला रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रजिस्ट्रेशन प्रक्रियेला उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

कोकणामध्ये ही संकल्पना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी सराव सत्राची सुरुवात रत्नागिरीमध्ये झाली आहे. ही सराव सत्रे रत्नागिरीतील प्रसिद्ध पर्यटनस्थळी घेण्याचा फाउंडेशनचा विचार होता. त्यासाठी थिबा पॅलेस प्रांगणाची निवड करण्यात आली. पुरातत्त्व विभागाच्य अखत्यारीत असलेल्या थिबा पॅलेसच्या प्रांगणाचा उपयोग करण्याबाबत निवेदन दिल्यापासून एक दिवसात सर्व परवानग्या मुंबईहून मिळाल्या. चांगल्या संकल्पनेला रेड कार्पेट ट्रीटमेंटचा अनुभव रत्नागिरीकरांना आला आणि थिबा राजवाड्याच्या प्रांगणाचे दरवाजे सराव सत्राच्या वॉर्मअपसाठी खुले करण्यात आले.

यासाठी असिस्टंट डायरेक्टर डिपार्टमेंट ऑफ आर्किओलॉजीचे डॉ. विलास वहाणे, रत्नागिरी पुरातत्त्व विभागाचे अभियंता शांताराम केकाडे, समन्वयक(तंत्र सहायक) सौ. रुची शेटे यांनी सहकार्य केले. पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे शासकीय कामानिमित्त लंडनला होते. त्यांनी तेथूनच रत्नागिरीकरांच्या स्तुत्य उपक्रमाची दखल घेऊन आवश्यक ते निर्देश दिले.

या निर्देशांनुसार रविवारी सकाळी थिबा राजवाड्याची व्यवस्था पाहणारे सेवक दीपक बाणे यांनी भल्या पहाटे थिबा प्रांगणाचे दरवाजे रत्नागिरीकरांसाठी खुले केले. सराव सत्र संपेपर्यंत ते स्वत: तेथे उपस्थित होते

पोलीस भरती प्रशिक्षण घेणाऱ्या सौरभ रावणंग आणि त्यांच्या चमूने रत्नागिरीकरांचे वॉर्मअप सेशन घेतले. सात ते ६७ वयोगटातील सुमारे ६० हून अधिक रत्नागिरीकर या सराव सत्रामध्ये सहभागी झाले. थिबा राजवाडा ते मारुती मंदिर आणि परत असे हे सराव सत्र होते. हॉटेल गोपाळचे मृत्युंजय खातू यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे विनायक पावसकर यांनी जवळपास ८ मिनिट प्रति किलोमीटर या वेगाने या धाव मार्गावर नेतृत्व केले. डॉ. नितीन सनगर यांनी त्यापेक्षा कमी वेगाने पाठीमागे राहून सर्वांना प्रोत्साहित केले

रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे योगेश मोरे, सुहास ठाकूरदेसाई, राकेश होरांबे, श्रद्धा रहाटे, बॉबी सावंत, अमित कवितके, अजिंक्य प्रभुदेसाई, धीरज पाटकर, मृणाल वाडेकर यांनी धाव मार्गावर मार्गदर्शन केले. अॅथलेटिक्स असोसिएशनचे सेक्रेटरी संदीप तावडे यांनी कुल डाऊन सेशन घेतले.

रत्नागिरीतील अशा प्रसिद्ध स्थळांच्या ठिकाणी सरावर सत्रे आयोजित करून ती सर्व ठिकाणे जागतिक पटलावर धावनगरी रत्नागिरीच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा सुवर्णसूर्य फाउंडेशनचा आणि रत्नागिरीकरांचा प्रयत्न आहे, असे फाउंडेशनचे प्रसाद देवस्थळी यांनी सांगितले.

कोकण कोस्ट्ल मॅरेथॉनमध्ये नावनोंदणीकरिता लिंक अशी –
https://www.alpharacingsolution.com/race/register/825

मॅरेथॉनच्या तसेच सराव सत्राच्या अधिक माहितीसाठी ९१५१५५१५४७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply