खारवी समाज पतसंस्थेची पाच वर्षांत पाचवी शाखा सुरू

रत्नागिरी : येथील खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या पाच वर्षांच्या कालखंडातील पाचवी शाखा पूर्णगड (ता. रत्नागिरी) येथे सुरू झाली. तिचे उद्घाटन नाट्यकर्मी राम सारंग यांच्या हस्ते झाले.

यावेळी श्री. सारंग म्हणाले, खारवी समाज पतसंस्थेचे प्रामाणिक, सुज्ञ आणि विश्वासू संचालक तसेच काटेकोरपणे व्यवहार सांभाळणारे प्रशासकीय अधिकारी यांच्या एकजुटीमुळेच कोकण विभागातून सहकार क्षेत्रातील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार पतसंस्थेला मिळाला. त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो. चांगले नेतृत्वच समाजव्यवस्थेला उभारी देऊन शकते, हे गत पाच वर्षांच्या पतसंस्थेच्या कार्यावरून सिद्ध झाले आहे.

पाचही शाखांच्या उद्घाटनाला हजारोंच्या संख्येने जनसमुदाय एकत्र आला. सहकार मेळ्याची अनुभूती दाखवून संस्थेने मौलिक कार्य केले आहे. पाच वर्षे पूर्ण होण्याआधीच पाच शाखांची निर्मिती हे राज्यातील एकमेव उल्लेखनीय काम ठरले आहे. सर्व संचालक आणि संस्थेशी जोडलेल्या सर्वांच्या साथीने उत्तम संघटक म्हणून अध्यक्ष संतोष पावरी यांनी संस्थेला उभारी देण्याचे काम केले आहे, असे वक्तव्य स्वरूपानंद संस्थेचे अध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी उद्घाटनप्रसंगी केले.

परिसरातील बंधूभगिनींना सभासद करून पतसंस्थेचे लाभ मिळवून द्यावेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जे सहकार्य लागेल ते आम्ही देऊ, अशी ग्वाही पूर्णगडच्या सरपंच सौ. सुहासिनी धानबा यांनी दिली.

पतसंस्थेचे भविष्य उज्ज्वल आहे. समाजाला पुढे नेण्याचे कार्य या संस्थेच्या माध्यमातून होताना दिसत आहे. संस्थेच्या माध्यमातून घेतलेले कर्ज योग्य कामासाठी वापरावे आणि कर्जाचे हप्ते वेळेत भरून सहकार्य करावे, असे आवाहन शंकर लाकडे, अविनाश डोर्लेकर यांनी केले.

संस्थेचा कारभार गतिमान राखण्यासाठी माझ्या बरोबरीने काम करणारे उपाध्यक्ष सुधीर वासावे, सर्व संचालक, प्रशासकीय अधिकारी, सर्व समन्वय समिती पदाधिकारी, सदस्य आणि संस्थेच्या हितचिंतकांमुळेच पतसंस्था दीपस्तंभासाखी उभी राहिली आहे. संस्थेचे सदस्य हे मालक म्हणून सहभागाबरोबरच संस्थेला उभारी देण्याचे कार्य करीत आहेत. सभासद ही आमची पुंजी आहे. त्यांच्या सहकार्यानेच भविष्यातील योजना राबविण्यास आणि त्यांच्या सन्मानाबरोबर त्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी संस्था कटिबद्ध राहील, असे अध्यक्ष संतोष पावरी यांनी सांगितले.

संस्थेने पाच वर्षांत १३ कोटींपेक्षा अधिक भागभांडवल उभारले असून संस्था प्रगतिपथावर जात असल्याचे कार्यकारी अधिकारी प्रसाद खडपे यांनी प्रास्ताविकात सांगून संस्थेच्या वाटचालीची विस्तृत माहिती दिली.

कार्यक्रमाला जिल्हाभरातून सभासद उपस्थित राहिले होते. पूर्णगड येथील शाळा क्र. १ मध्ये तुडुंब गर्दी झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखा पालक वासुदेव वाघे, दिनेश डोर्लेकर, मदन डोर्लेकर, कमलाकर हेदवकर सर, स्थानिक समन्वय समिती पदाधिकारी, पूर्णगड येथील ग्रामस्थांनी सहकार्य केले. शाखेसाठी अनेकांनी विविध वस्तू देणगीरूपाने दिल्या. शाखा उद्घाटन पूर्वीच शाखा सुरू करण्यासाठी १ कोटी १७ लाख ठेवी संकलित झाल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वासुदेव वाघे यांनी केले, तर आभार मदन डोर्लेकर यांनी मानले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply