मालवण : बँक ऑफ महाराष्ट्रची आचरे शाखा आणि साने गुरुजी कथामालेच्या मालवण शाखेच्या संयुक्त विद्यमाने आचरे येथे मालवण तालुकास्तर कथाकथन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
कथामित्र मारुती आचरेकर कथानगरी आचरे क्र. १ येथे येत्या रविवारी, २९ ऑक्टोबर रोजी हा कथाकथन महोत्सव होणार आहे. संपूर्ण मालवण तालुक्यातून तिसरी ते आठवीपर्यंतचे निवडक ६४ बालकथाकार यात सहभागी होणार आहेत. वर्गस्तर, शाळास्तर, केंद्रस्तर स्पर्धा होऊन त्यातून ६४ जणांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. तिसरी – चौथीचे स्पर्धक ‘शिवरायांचे मावळे’ या विषयावर कथाकथन करणार आहेत, तर पाचवी – सहावीचे स्पर्धक ‘गुरु शिष्य’ यांच्यावर कथा सांगणार आहेत. सातवी-आठवीचे स्पर्धक ‘महिला वैज्ञानिकांच्या कथा’ कथन करतील. दोन्ही संस्थांच्या वतीने आकर्षक पारितोषिके, नेत्रदीपक स्मृतिचिन्हे, दर्जेदार प्रमाणपत्रे, निवडक ग्रंथ पुरस्कार दिले जाणार आहेत.
स्पर्धेचे हे तेरावे वर्ष असून स्पर्धांना वाढता प्रतिसाद लाभत आहे. या स्पर्धा संयोजनाबद्दल सुरेश ठाकूर यांनी सांगितले की, मुलांची वाचनाची ओढ वाढावी, वक्तृत्व कलेत मुले निपुण व्हावीत आणि एक संस्कारक्षम पिढी निर्माण व्हावी म्हणून गेली पन्नास वर्षे मालवण तालुका कथामाला सुमारे १५ विविध उपक्रम राबवीत आहे. तालुकास्तर कथाकथन स्पर्धा हा त्यापैकी एक उपक्रम आहे. संस्कारांची जपणूक आणि बचतीचे संस्कार हे या उपक्रमाचे ब्रीदवाक्य आहे. तीन स्तरांवर चालणारी एवढी भव्य बालकुमार कथाकथन स्पर्धा एकमेव आहे.
महोत्सवाचा शुभारंभ रविवारी सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे. समारंभाचे अध्यक्षस्थान रामेश्वर वैभवशाली पतपेढीचे ज्येष्ठ संचालक लक्ष्मणराव आचरेकर भूषविणार आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रचे डेप्युटी झोनल मॅनेजर आनंदराव डिंगणकर महोत्सवाचे उद्घाटन करतील. प्रमुख मान्यवर म्हणून बँकेचे व्यवसाय विकास अधिकारी कृष्णा संजय दिल्लेवार, आणि शाखाधिकारी. सिलंबु अरुमुगम उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण त्याच दिवशी संध्याकाळी कथामालेचे सल्लागार समिती सदस्य सदानंद कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या समारंभात ज्येष्ठ कथामाला कार्यकर्ते प्रकाश किरात पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. सर्व सहभागी स्पर्धकांसाठी अल्पोपाहार, मध्यान्ह भोजन देण्यात येणार असून प्रत्येक स्पर्धकाला ‘बालकुमार’चा दिवाळी अंक भेट देण्यात येणार आहे.

