दापोली : शारीरिक किंवा मानसिक त्रुटीद्वारे विकलांग बनलेल्या समाजातील घटकांच्या समस्या समजावून घेता याव्यात, म्हणून तीन डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस पाळला केला जातो. दिव्यांगांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या उद्धारासाठी हातभार लागावा, तसेच समाजातील अन्य नागरिकांना प्रेरणा मिळावी याकरिता जनजागृतीसाठी आज, (३ डिसेंबर २०२३) जागतिक दिव्यांग दिनानिमित्त, दापोली सायकलिंग क्लबतर्फे सायकल फेरी काढण्यात आली.
दापोलीतील आझाद मैदानातून सुरू झालेली ही सायकल फेरी उदयनगर, लष्करवाडी, बहुविकलांग दिव्यांग मुलांचे शिक्षण व पुनर्वसन केंद्र-जालगाव, बर्वे आळी, पांगारवाडी, शिवाजीनगर, इंदिराबाई वामन बडे कर्णबधिर विद्यालय, आझाद मैदान अशा सहा किलोमीटरच्या मार्गावर झाली. यामध्ये सर्व वयोगटातील नागरिक, तसेच काही दिव्यांगही सायकल चालवत सहभागी झाले होते. आनंद फाउंडेशन संचालित दिव्यांग व बहुविकलांग गतिमंद विद्यार्थ्यांचे पुनर्वसन केंद्र आणि स्नेहदीप संचालित इंदिराबाई वामन बडे कर्णबधिर विद्यालय येथे स्मिता सुर्वे, नीलांबरी अधिकारी, दिनेश जैन, मनोहर जैन, रेखा बागुल, मनोहर जालगावकर, संजय बलाध्ये, सूर्यकांत खेडेकर, श्रद्धा गोविलकर, शीतल देवरुखकर, ज्योती बर्वे, महेश्वरी विचारे, मीनल माने, विनय रेवाळे, कौस्तुभ देऊळगावकर, इतर शिक्षकवृंद, कर्मचारी यांनी अद्ययावत कार्यशाळा, श्रवण यंत्रणा, दिव्यांग विद्यार्थी, उपक्रम, रोजगार प्रशिक्षण इत्यादींबाबत माहिती सांगितली व शाळा दाखवली. त्यांचे हे खूपच आव्हानात्मक असे बहुमूल्य समाजकार्य आहे, याबद्दल या सर्वांचे आभार मानण्यात आले. अपंगत्वावर मात करून यशस्वीपणे स्वकर्तृत्वावर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती केलेल्या श्रावणी सूर्यवंशी आणि इतर विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.
सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने सर्वांसाठी दापोली सायकलिंग क्लबमार्फत अनेक उपक्रम राबवले जातात. या सायकल फेरीचे नियोजन करण्यात प्रशांत पालवणकर, अंबरीश गुरव, विनय गोलांबडे, सूरज शेठ, सुधीर चव्हाण इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली. दैनंदिन जीवनात सायकलचा वापर अधिक करा आणि इतरांनाही प्रेरित करा असे आवाहनही आयोजकांनी केले आहे.
सोबत व्हिडिओ

