डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनंतीवरून संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी बुद्धवंदना संगीतबद्ध करून गायली होती. डॉ. बाबासाहेबांनी त्याचं ध्वनिमुद्रण करून घेऊन १९५६ साली ध्वनिमुद्रिका प्रकाशित केल्या आणि नागपूरच्या दीक्षाभूमीवर झालेल्या धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यात वाजवल्या होत्या. आज ६ डिसेंबर अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. त्या निमित्ताने मास्टर कृष्णरावांची नात प्रिया फुलंब्रीकर यांनी दिलेली याबद्दल दिलेली माहिती… (मा. फुलंब्रीकर यांच्या आवाजातल्या बुद्धवंदनेचा ऑडिओ शेवटी दिला आहे.)
……….
भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले, तरी देशाचे राष्ट्रगीत कोणते असावे, याबाबत सरकारी पातळीवर अजिबात एकमत नव्हते. परंतु बहुसंख्य जनतेचा कौल वंदे मातरम् गीताकडे होता. म्हणून त्यावर्षी १५ ऑगस्टला वंदे मातरम् आणि जन गण मन ही दोन्ही गीते गायली गेली होती.
मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर ऊर्फ मास्टर कृष्णराव स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक वर्षे वंदे मातरम् या गीताचे राष्ट्रगीत म्हणून समर्थन करत होते. त्यावर राष्ट्रगीत याअर्थी १९३४ सालापासून वेगवेगळ्या चालींचे प्रयोग करत होते. पुढे १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांनी संसदेत पंतप्रधान पंडित नेहरू आणि घटना समितीच्या इतर सदस्यांसमोर वंदे मातरम् हे गीत राष्ट्रगीत व्हावे म्हणून प्रात्यक्षिके दिली. या समितीमध्ये अर्थातच भारताची घटना लिहिणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश होताच. कृष्णरावांचा तेजस्वी सांगीतिक लढा डॉ. बाबासाहेबांनी अनुभवला होता. इतर संसद सदस्यांसमवेत मास्तरांच्या सांगीतिक लढ्याची आणि ज्ञानाची त्यांनी वाखाणणी केली होती.
मास्टर कृष्णराव यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून वंदे मातरम्चे केलेले स्वकृत चालीतील गायन, प्रचार आणि प्रसार तसेच १९४७ ते १९५० या कालावधीत घटना समितीसमोर दिलेली प्रात्यक्षिके यांची परिणीती म्हणजे या गीताला पूर्णपणे न वगळता त्याला ‘राष्ट्रीय गीत (National Song)’ म्हणून भारत सरकारतर्फे १९५० साली मान्यता मिळाली.
पुढे डॉ. बाबासाहेबांनी नवबौद्ध धर्माची संस्थापना केली. तेव्हा त्यांनी त्यांच्या अनुयायांसह मास्तरांशी संपर्क साधून त्यांना बुद्धवंदनेला संगीत देण्याची विचारणा केली. मास्तरांनी हे कार्य बुद्धदेवाची सेवा म्हणून आनंदाने आणि कोणतेही मानधन न घेता स्वीकारले आणि मुंबईतील सिद्धार्थ कॉलेजमध्ये जाऊन प्राचार्यांकडून प्रथम पाली भाषेचा अभ्यास केला. नंतर बुद्धवंदनेतील मंत्रांचा अर्थ समजून घेतला. मगच त्यांनी त्रिशरण पंचशील संगीतबद्ध करून स्वतःच्या मुख्य आवाजात कोरसचा प्रभावी वापर करून गायले. डॉ. बाबासाहेबांनी या बुद्धवंदनेचे ध्वनिमुद्रण करून घेऊन त्याच्या दोन 78 RPM ध्वनिमुद्रिका १९५६ साली प्रकाशित केल्या आणि नागपूर येथील दीक्षाभूमीवर झालेल्या धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यात त्या वाजवल्या.
परमपूज्य डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या आजच्या पुण्यदिनानिमित्त ह्या पुण्य घटनेचे हे विनम्रपणे केलेले संस्मरण!
प. पू. डॉ.बाबासाहेब यांच्या खास विनंतीवरून संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव यांनी संगीतबद्ध करून गायलेली बुद्धवंदना ऐकायला पुढच्या लिंकवर क्लिक करावे.
……………
मास्टर कृष्णराव यांच्याविषयीचा लेख कोकण मीडियाच्या २०२३ च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला आहे. गुगल प्ले बुक्स, मॅग्झटर आणि बुकगंगावर दिवाळी अंक ई-बुक स्वरूपात उपलब्ध आहे.
गुगल प्ले बुक्स : https://play.google.com/store/books/details?id=eX7gEAAAQBAJ
मॅग्झटर : https://www.magzter.com/IN/Kokan-Media-Consultancy–Services/Kokan-Media-/News/1492183
बुकगंगा : https://www.bookganga.com/R/8TAUO
(दिवाळी अंकाची हार्डकॉपी घरपोच मागवायची असल्यास 9422382621 या क्रमांकावर संपर्क साधावा.)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

