रत्नागिरी : प्लास्टिक कचऱ्याची समस्या दररोज अधिकाधिक उग्र रूप धारण करत आहे. संकलन व्यवस्था नसल्याने कचरा जिकडे-तिकडे टाकला जातो आणि रिसायकलिंगची संकल्पना कागदावरच राहते. म्हणूनच ‘अनबॉक्स युवर डिझायर’ या ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅपने आजपासून (एक जानेवारी २०२४) नव्या उपक्रमाची घोषणा केली आहे. खाद्यपदार्थ घरपोच पोहोचवणाऱ्या या अॅपच्या माध्यमातून घरोघरी प्लास्टिक कचऱ्याचे संकलन केले जाणार आहे. दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी हे संकलन केले जाणार असून, नागरिकांनी हा कचरा व्यवस्थित साठवून ठेवणे आवश्यक आहे. हा कचरा संकलित केल्याबद्दल नागरिकांना गिफ्ट व्हाउचर दिले जाणार आहे.
प्लास्टिकचा कचरा दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात वाढतो आहे. या प्लास्टिक कचऱ्याचे योग्य पद्धतीने संकलन आणि पुनर्चक्रीकरण यासाठी सुयोग्य व्यवस्था सध्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. ही समस्या ओळखून रत्नागिरी शहरात ‘अनबॉक्स युवर डिझायर’ या ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅपद्वारे दारोदारी प्लास्टिक संकलन करण्याची अनोखी यंत्रणा सुरू करण्यात आली आहे.
रत्नागिरीतील युवा उद्योजक गौरांग आगाशे यांच्या संकल्पनेतून तयार झालेले ‘अनबॉक्स’ हे अॅप गेली तीन वर्षे रत्नागिरी शहरात फूड डिलिव्हरी देत आहे. ‘स्विगी’, ‘झोमॅटो’ अशा मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करून ‘अनबॉक्स’ने रत्नागिरी शहरात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले असून, त्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. प्रचंड प्रमाणात वाढणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येचा विचार करून फूड डिलिव्हरीसाठी निर्माण केलेली यंत्रणा प्लास्टिक कचरा संकलनासाठी वापरता येईल का, असा विचार झाला आणि या नव्या संकल्पनेचा जन्म झाला. दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी ‘अनबॉक्स’तर्फे दारोदारी प्लास्टिक कचरा संकलन केले जाणार आहे. रत्नागिरीच्या खेडशी ते मांडवी या परिसरातले नागरिक या सुविधेचा लाभ घेऊ शकणार आहेत.
या कचऱ्याच्या संकलनासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून, उलट कचरा संकलित करणाऱ्यांना गिफ्ट व्हाउचर देण्यात येणार आहे. यासाठी आपल्या घरचा प्लास्टिक कचरा कोरडा करून एका पिशवीत साठवून ठेवावा. पिशव्या आणि बाटल्या व इतर कडक प्लास्टिक वेगळे साठवावे. ‘अनबॉक्स : युवर डिझायर’ या अॅपवर एक लिंक तयार केली आहे. या लिंकवर क्लिक करून आपल्या घरी साठवलेल्या प्लास्टिक कचऱ्याच्या पिशवीचा फोटो अपलोड करावा. महिन्याच्या शेवटच्या दिवशी ‘अनबॉक्स’तर्फे ही प्लास्टिक कचऱ्याची पिशवी घरी येऊन नेली जाईल, अशी माहिती गौरांग आगाशे यांनी दिली. या सुविधेचा वापर करण्यासाठी अॅपवरून किमान एक तरी ऑर्डर केलेली असणे गरजेचे आहे.
प्लास्टिक केवळ संकलित करणे पुरेसे नाही, तर त्याचे रिसायकलिंग होणे गरजेचे आहे. या माध्यमातून संकलित झालेल्या प्लास्टिक कचऱ्याच्या पुनर्चक्रीकरणाची (रिसायकलिंग) जबाबदारी रत्नागिरीतील उद्योजक मल्हार मलुष्टे यांनी उचलली आहे. तसेच, प्लास्टिक कचरा संकलनासाठी शहरात भंगार गोळा करणाऱ्या काही व्यक्तींना या यंत्रणेशी जोडून घेण्यात आले आहे. या माध्यमातून अशा व्यक्तींबद्दल समाजात आदराची भावना निर्माण करणे आणि त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याचाही प्रयत्न आहे, असेही गौरांग आगाशे यांनी सांगितले.
कचरा संकलन ही गोष्ट अर्थव्यवस्थेच्या संघटित क्षेत्रात नाही. ‘अनबॉक्स’च्या या उपक्रमातून प्लास्टिक कचरा संकलन ही गोष्ट संघटित क्षेत्रात आणण्याचा एक प्रयत्न केला जात आहे. ही गोष्ट अन्य ठिकाणीही अनुकरणीय आहे. ‘प्लास्टिक कचरामुक्त रत्नागिरी’साठीच्या या मोहिमेत जास्तीत जास्त रत्नागिरीकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ‘अनबॉक्स’तर्फे करण्यात आले आहे.

