गोळप (ता. रत्नागिरी) येथील गोळप कट्टामध्ये सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात अल्पावधीत रत्नागिरीत नावाजलेल्या इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी आपला जीवनप्रवास उलगडला.
भांबेड (ता. लांजा) येथील मूळचे रहिवासी असलेले डॉ. श्रीधर ठाकूर यांची मुलाखत सौ. आदिती काळे यांनी घेतली. मुलाखतीतून त्यांनी आपला प्रवास उलगडून सांगितला.
माझे बालपण सावंतवाडीत गेले. वडील एलआयसीमध्ये होते. त्यांच्याकडे त्या काळातील पूर्ण रत्नागिरी जिल्हा होता. वडिलांना मंडणगड ते सावंतवाडी फिरावे लागत असे. मी त्यांच्याबरोबर खूप वेळा जात असे. त्या काळात पायी खूप चालावे लागत असे. विविध स्वभावाच्या ग्रामीण लोकांशी संबंध येत असे. शाळेपेक्षा मी या जगाच्या शाळेत खूप शिकलो. त्या काळात माणसे स्वार्थी नव्हती आणि ध्येयवादी होती. चिपळूणजवळच्या एका गावात एका शिक्षकाकडे त्या काळात दहा हजार पुस्तके होती आणि ते ती आजूबाजूच्या गावातील मुलांना वाचायला देण्यासाठी देत असत. अशा प्रकारच्या अनेक माणसांचा माझ्यावर प्रभाव पडला.
आईवडिलांनी उत्तम संस्कार केले. गावात राहायचे, असे डोक्यात असल्याने शेती करायची, वकील किंवा डॉक्टर व्हायचे ठरवले होते. दापोलीच्या कृषी विद्यापीठात प्रवेश घेतला. हॉस्टेलला आलो. सहावी ते दहावी मी सांगलीला होतो. त्यामुळे माझ्या बोलण्यामध्ये तसे जाणवायचे. पहिल्या दिवशी एका मुलाने मला तू घाटी की कोकणी? असे विचारले. आपल्या भागातील विद्यापीठात आपल्याला कोणी घाटी की कोकणी, असे विचारावे हे अपमानास्पद वाटल्याने मी इथे शिकायचे नाही असे ठरवले.
दरम्यान, मेडिकलला प्रवेश मिळाला. डॉक्टर झाल्यावर सहा महिने इंटर्नशिपला पहिल्या दिवशी प्रसूती वॉर्डमध्ये डिलिव्हरीची ड्युटी लागली. प्रसूती वॉर्डमध्ये काम करू नये, अशी मनःस्थिती होती. मात्र मित्राने मन वळवल्याने काम सुरू क ले. नंतर सहा महिन्यांत १४०० डिलिव्हरी केल्या. पुढची सहा वर्षे झोकून देऊन काम करताना सगळ्या प्रकारच्या रुग्णांवर यशस्वी उपचार करून प्रावीण्य मिळवले. नोकरीत काम प्रचंड आणि मनापासून करत असल्याने नऊ वर्षांत चार वेळा बदली झाली. त्यामुळे मी इतरांची बदली करू शकेन, अशा जागी जायचे ठरवले. वैद्यकीय अधीक्षक, डायरेक्टर, सीईओ अशी पुढची पदे मेहनतीने मिळवली.
तत्कालीन पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी १९८८ ला श्रीलंकेला पाठवलेल्या शांतीसेना मध्ये जाण्याची संधी मिळाली. सुमारे दीड वर्षाने आल्यावर समारंभात राजीव गांधींनी जेवताना जवळ बोलावून घेतले. तासभर गप्पा मारताना गावाला जाण्यासाठी मला किमान तीन दिवस लागतील आणि रत्नागिरीत विमानतळ आहे, हे ऐकल्यावर आपले खासगी सचिव व्ही. जॉर्ज यांना बोलावून मला पंतप्रधान यांचे पाहुणे असा आजीवन विमान पास दिला. राजीव गांधी असेपर्यंत अनेक वेळा तो वापरून विमानाने रत्नागिरीला येत असे.
व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार, शंकर पाटील हे ग्रामीण जीवन आधारित लिखाणामुळे आवडते लेखक, सुमारे ५० हजार पुस्तके माझ्याकडे आहेत. वेळ मिळेल तसा वेळ वाचनात घालवतो. प्रत्येकाने आपल्या आवडीचे काहीही वाचले पाहिजे. मनन केले पाहिजे.
सुमारे १९९० च्या दशकात वैद्यकीय सेवेचे व्यावसायिकीकरण झाले. त्यावेळी वैद्यकीय फायनान्स, बजेट, प्रोजेक्ट इत्यादी विषय सिंगापूर, हार्वर्ड येथे शिकलो. आफ्रिकेत टांझानियामध्ये काम करायची संधी मिळाली. तेथे २४ हजा स्टाफचा सीईओ होतो. तेथे सगळे सीईओ ब्रिटिश आणि ऑस्ट्रेलियामधील असायचे. मी पहिला भारतीय म्हणजे काळा होतो. तेथे दोन वर्षे काम केले. निघताना तेथील राष्ट्रपतींनी बोलावून देशात राहण्याची तसेच विद्यापीठात कुलगुरू पदाची ऑफर दिली. मात्र मी ती नाकारून आपल्या देशात आलो.
भारतात परतल्यानंतर २०१८ पर्यंत वैद्यकीय व्यवस्थापनातून विविध राज्यांत २७८ हॉस्पिटल उभी केली. केरळ, पश्चिम बंगालमध्ये सीईओ म्हणून काम केले. महिन्यात २५ दिवस प्रवास करावा लागत असे. देशभरातील प्रवासामुळे मला गुजराती, बंगाली, मल्याळम भाषा बोलता येतात. खूप मेहनत केली, नवीन शिकत गेलो. प्रत्येक ठिकाणी शंभर टक्के योगदान होते. संपर्कात आलेल्या प्रत्येक माणसाकडून मिळेल ते शिकलो.
निवृत्त होऊन गावी आलो. स्वस्थ बसवत नव्हते. त्यामुळे मुंबईत इन्फिगो आय केअर कंपनी सुरू केली. त्याला आयआयएफएलने भांडवल गुंतवले. मुंबई, रत्नागिरी,खेड, लांजा येथे शाखा सुरू केल्या. आजपर्यंत एक लाख ऑपरेशन झाली. दरवर्षी एक कोटी रुपये दान व्हावे, असा प्रयत्न असतो. वैद्यक हे शरीराकडे पाहणारे शास्त्र आहे. बाकी गोष्टीकडे लक्ष देताना आपण शरीराकडे लक्ष दिले पाहिजे.
डॉ. ठाकूर यांच्या निवेदनानंतर श्रोत्यांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. त्यावेळी ते म्हणाले, सरकारी आणि खासगी वैद्यकीय व्यवस्था यात फरक नसतो. कर्मचारी हा फरक असतो. काम करणारे आणि संस्कार असणारे कर्मचारी कुठेही चांगले काम करतात. भांबेड या गावी देश-विदेशातील १७०० झाडे आणून लावली आहेत. ही झाडे असलेल्या परिस्थितीवर मात करायचे शिकवतात. माणसे घडवणे महत्त्वाचे. महाविद्यालयीन शिक्षणापेक्षा जगाच्या शाळेतील शिक्षण महत्त्वाचे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी वैद्यकीय व्यवस्थापनाचा उपयोग सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बदलासाठी करण्याच्या दृष्टीने माझ्याशी चर्चा करून काम करण्याची संधी दिली. त्यामुळे तेथील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारली. तो खूप छान अनुभव होता.
त्यांच्याशिवाय अटलबिहारी वाजपेयी, राजीव गांधी, मनमोहन सिंग पंतप्रधान असताना सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, हॉस्पिटल सक्षमीकरणाबाबत आणि राहुल गांधी यांच्या अमेठी मतदारसंघातील आरोग्य व्यवस्थेबाबत वैयक्तिक चर्चेचा योग आला होता. सगळे जण याबाबत गंभीर असल्याचे जाणवले. कोकणात चाळीस वर्षांत भौगोलिक खूप बदल झाला. विचारसरणी आणि मानसिक बदल कमी झालेला जाणवतो.
सुनील लिमये, अनंत आगाशे,राजेंद्र पटवर्धन, निशिगंधा पोंक्षे यांनी गोळप कट्टामधील पन्नासाव्या कार्यक्रमाबद्दल मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
– अविनाश काळे
(९४२२३७२२१२)

