पंचवीस वर्षांनंतरच्या विकसित रत्नागिरीकरिता पायाभूत सुविधांची गरज

रत्नागिरी : पंचवीस वर्षांनंतरच्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी विविध पायाभूत सुविधा पूर्ण करण्याची गरज आहे, असा मुद्दा रत्नागिरी २०५० या चर्चासत्रात मांडण्यात आला. दैनिक लोकसत्तातर्फे रत्नागिरीच्या समृद्ध सफरीचा आढावा घेणाऱ्या ‘रत्नभूमी’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते चार फेब्रुवारीला झाले. त्या वेळी ‘रत्नागिरी २०५०’ या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्रात एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा, गद्रे मरीन एक्स्पोर्ट प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक दीपक गद्रे, रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनचे उपाध्यक्ष उदय लोध आणि ज्येष्ठ आंबा बागायतदार सचिन लांजेकर सहभागी झाले होते.

श्री. शर्मा यांनी सांगितले की, संगमेश्वरजवळच्या कर्णेश्वर मंदिराला भेट देण्याचा योग आला. स्थापत्यशास्त्राचा तो उत्तम नमुना आहे. अशी अनेक मंदिरे आणि वास्तू रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. ती जगासमोर आली पाहिजेत.

आंबा बागायतदार श्री. लांजेकर यांनी आंबा व्यवसायाचा आढावा घेतला. १९९० सालापासून आंबा बागायत मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे सांगून ते म्हणाले की, निर्यातीच्या सुविधा अधिक प्रमाणात उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे बाजारात ७५ दिवसांपर्यंत टिकाव धरू धरू शकेल, अशा आंब्याच्या निर्मितीकरिता संशोधन झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

उदय लोध यांनी पर्यटन आणि हॉटेल व्यवसायासंबंधी आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले की, २५ वर्षांनंतरच्या रत्नागिरीचा विचार करताना २५ वर्षांपूर्वी रत्नागिरीत कोणत्या सुविधा होत्या, याचाही विचार करायला हवा आणि त्यापेक्षा कितीतरी वेगाने पायाभूत सुविधांचा विकास व्हायला हवा. शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून मिळणाऱ्या सवलती रत्नागिरी जिल्ह्यातही पर्यटनाच्या व्यवसायाला मिळाल्या पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर केवळ पर्यटन नव्हे तर इतर सर्वच दृष्टींनी पायाभूत सुविधांचा विकास झाला, तरच कोकणात पर्यटन आणि हॉटेल व्यवसाय वाढीला लागणार आहे. कारण विविध उद्योग, रस्ते, पर्यटनस्थळे यांचा विकास झाला, तरच पर्यटन आणि हॉटेल व्यवसायाला चांगले दिवस येणार आहेत. हॉटेल व्यावसायिकांना सध्या वर्षातील सहा महिन्यांहून अधिक काळ कोणत्याही फायद्याविना घालवावा लागतो. पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यात येण्यासाठी सर्व तऱ्हेच्या दळणवळणाच्या सोयीसुविधा निर्माण झाल्या पाहिजेत. सागरी मार्गे, हवाई मार्गे आणि महामार्गाने पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यात आला पाहिजे. त्यासाठी सोयीसुविधा निर्माण झाल्या पाहिजेत.

दीपक गद्रे म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यातील १९७० च्या सुमारास मत्स्य व्यवसायाला प्रारंभ झाला. तेव्हा भरपूर प्रमाणात मासळी उपलब्ध होत होती. तेव्हा मत्स्य प्रक्रिया उद्योगही नव्हते. आता मासे मिळायचे प्रमाण कमी झाले आहे. कारण सर्व तऱ्हेच्या साधनांनी मोठ्या प्रमाणावर मासेमारी होत आहे. कोस्ट गार्डसारख्या यंत्रणेचा उपयोग करून घेऊन मासेमारीवर मासेमारीच्या वेळेचे, खोल समुद्रातील मासेमारीचे, अंतराचे, मासेमारीच्या निश्चित काळाचे नियंत्रण करता येऊ शकते का, याबाबत विचार झाला पाहिजे. कोकणात येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करण्याची मानसिकता बदलली पाहिजे असेही श्री. गद्रे म्हणाले.

कॉफीटेबल बुकच्या लेखकांसह मान्यवर

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्योग विभागामार्फत रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. महाराष्ट्राच्या ७५ टक्के भागात कोणत्याही उद्योगाचे स्वागत होते. नागपूरमध्ये अलीकडेच अवघ्या दहा दिवसांमध्ये एका व्यवसायासाठी जमीनखरेदीसह करारही होऊ शकला आहे. कोकणात तशी स्थिती नाही. प्रत्येक प्रकल्पाला विरोध केला जातो. कोकणाच्या पर्यावरणाला पूरक असे व्यवसाय आणायचा शासनाचा विचार आहे, पण त्यासाठी स्थानिक लोकांचे सहकार्य हवे आहे. उद्योग आले तर लक्षावधी रोजगार निर्माण होऊ शकतील. इतर पूरक उद्योगांनाही त्यामुळे चालना मिळते. राज्याच्या उर्वरित भागात त्याचे प्रत्यंतर येत आहे. कोकणातही या संधीचा उपयोग करून घेतला पाहिजे, असे श्री. सामंत म्हणाले. रत्नागिरीच्या विमानतळ टर्मिनलकरिता शंभर कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याचे श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले. तसेच, हॉटेल व्यवसायाला लवकरच उद्योग म्हणून मान्यता दिली जाणार असून, त्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. तसे झाल्यास उद्योगांसाठीच्या विविध योजनांचा लाभ हॉटेल व्यावसायिकांनाही घेता येऊ शकेल आणि त्याचा पर्यटनवाढीसाठी उपयोग होऊ शकेल, असे प्रतिपादनही उदय सामंत यांनी या वेळी केले.

(सामंत यांच्या संपूर्ण भाषणाचा व्हिडिओ सोबत दिला आहे.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply