रत्नागिरी औद्योगिक महोत्सवाचे नारायण राणे यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन

रत्नागिरी : रत्नागिरी औद्योगिक महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते सोमवारी (दि. १९ फेब्रुवारी) होणार आहे.

केंद्रातील मोदी सरकारने युवकांसाठी आणलेल्या योजनांची थेट महिती देत नवउद्योजक घडवण्यासाठी आणि उद्योग करणाऱ्यांना बळ देण्यासाठी भारत सरकारचे सूक्ष्म, लघु व मध्यम मंत्रालय थेट जनतेच्या दारी आले असून रत्नागिरीत १९ आणि २० फेब्रुवारी रोजी हा महोत्सव होणार आहे. सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या पुढाकाराने रत्नागिरीतील जलतरण तलावाजवळ हा दोन दिवसांचा रत्नागिरी औद्योगिक महोत्सव होणार असून श्री. राणे यांच्या हस्ते सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी माजी खासदार नीलेश राणे, माजी आमदार बाळ माने, भारत सरकारच्या एमएसएमई मंत्रालयाच्या डेप्युटी डायरेक्टर जनरल अनुजा बापट, एमएसएमई नागपूरचे संचालक पी. एम. पार्लेवार, खादी ग्रामोद्योग मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत कुमार, एमएसएमई नागपूरचे सहसंचालक डॉ. व्ही. आर. शिरसाट, एमएसएमईचे सहसंचालक अमित तमारिया, गौरव कटारिया, सहाय्यक संचालक व्ही. व्ही. खरे, राहुल मिश्रा, मनोज शर्मा, क्वायर बोर्डाच्या विभागीय संचालक गीता भोईर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, रत्नागिरीचे अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आदी उपस्थित राहणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यमान आणि नवउद्योजकांमध्ये जागरूकता निर्माण करून रत्नागिरी जिल्ह्यातील लघु आणि मध्यम उद्योगांचा विकास करण्याच्या मुख्य उद्देशाने हा महोत्सव होणार आहे.

यावेळी नवउद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारा पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील दहा प्रातिनिधिक उद्योजकांना बँकेच्या कर्ज वाटपाचे धनादेश दिले जाणार आहेत. उद्घाटनानंतर दुपारी आणि मंगळवारी विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवात ६० वेगवेगळे स्टॉल मांडले जाणार आहेत. एमएसएमई मंत्रालयाच्या विविध योजनांबद्दल तसेच त्यांना सरकारच्या पीएम विश्वकर्मा योजनेची जनजागृती करून देणे आणि योजनेचा लाभ घेणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. प्रदर्शनात उद्यम रजिस्ट्रेशन नोंदणी, आधार नोंदणी, पीएम विश्वकर्मा नोंदणी केली जाणार आहे. प्रदर्शनामध्ये रत्नागिरीतील उद्योजक आपली उत्पादने प्रदर्शित करणार आहेत. कार्यक्रमादरम्यान पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत नोंदणीदेखील केली जाईल. त्याचप्रमाणे या कार्यक्रमादरम्यान स्वयंरोजगार आणि उद्योजकता या विषयावर कार्यशाळाही घेण्यात येणार आहेत. MSME-DFO संचालकांनी सर्व विद्यमान आणि संभाव्य उद्योजकांना पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

दुसऱ्या दिवशी MSME द्वारे विक्रेता विकास कार्यक्रमदेखील आयोजित केला जाईल. त्यामध्ये HPCL, VPCL, IOCL, कोकण रेल्वे आणि इतर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम सहभागी होतील. तांत्रिक सत्रादरम्यान, प्रत्येक PSU मधील वरिष्ठ अधिकारी त्यांच्या संस्थेची विक्रेता नोंदणी प्रक्रिया समजावून सांगतील आणि तांत्रिक सत्रादरम्यान त्यांच्या आवश्यकतादेखील स्पष्ट करतील. उद्यम नोंदणी आणि शासन कार्यक्रमादरम्यान उद्योजकांची ई-मार्केट प्लेस नोंदणीदेखील केली जाईल.

KVIC, NSIC, DIC आणि बँकांचे अधिकारी MSEs च्या फायद्यासाठी त्यांच्या संबंधित योजनांबद्दल सादरीकरण करतील. एमएसएमई-डीएफओचे अधिकारीही मंत्रालयाच्या विविध योजनांची माहिती देतील. या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन एमएसएमई-डीएफओ, नागपूरचे संचालक पी. एम. पार्लेवार यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply