वाचक दत्तक पालक योजना राज्य शासनाने राबवावी – ठाकूर

मालवण : आचरा येथील रामेश्वर वाचन मंदिराने राबविलेली वाचक दत्तक पालक योजना महाराष्ट्र शासनाने सर्व ग्रंथालयांमध्ये राबवावी, असे प्रतिपादन कोकण मराठी सहित्य परिषदेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी केले.

वाचन संस्कृती वाढीसाठी आचरा (ता. मालवण) येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिराने अभिनव वाचक दत्तक पालक योजना सुरू केली आहे. या योजनेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, तरुण पिढीच्या व्यासंगाचा, चिंतनाचा, विस्तृत परीघ पुस्तकाच्या पानापानांतून वाढत जाणारा आहे. तरुणांना लेखन, वाचन, विनोद, अध्यात्म, विज्ञान, अशा नानाविध विषयांची गोडी मोबाइलपेक्षा ग्रंथ लावणार आहेत. म्हणूनच ही योजना राज्यभर राबविली गेली पाहिजे.

अलीकडे ग्रंथालयात जाऊन वाचन संस्कृती जोपसण्याची आवड कमी होत चालली आहे. ३५ वयोगटाच्या आतील तरुण वाचनालयाकडे क्वचितच भेट देताना दिसतात. केवळ एका वाचनालयाची ही समस्या नसून सर्व ग्रंथालयांची हीच प्रमुख समस्या आहे. त्यावर एक उपाय म्हणून श्री रामेश्वर वाचन मंदिर या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या वाचन मंदिराने महाराष्ट्राला मार्गदर्शक करणारी अभिनव योजना सुरू केली आहे. त्याचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष बाबाजी गोपाळ भिसळे, यांच्या हस्ते ग्रंथपूजन आणि दीपप्रज्वलनाने झाला.

प्रास्ताविकात ग्रंथपाल विनीता कांबळी म्हणाल्या, तरुण वर्ग वाचनालयाकडे आकर्षित होण्यासाठी त्यांचे पालकत्व घेऊन त्यांना वाचनाची ओढ निर्माण केली पाहिजे. म्हणूनच महाविद्यालयातील काही निवडक विद्यार्थ्यांना निवडून त्यांचे पालकत्व वाचनालयाचे कार्यकारिणी व सांस्कृतिक समिती सदस्य यांच्याकडे द्यावे ही संकल्पना मला सुचली. दक्ष दत्तक पालकांनी तरुण वाचकांशी सदैव संपर्क ठेवून त्यांना सकस आणि समृद्ध वाचनासाठी नेहमी प्रवृत्त केले, तर ही योजना १०० टक्के यशस्वी होईल.

या योजनेला शुभेच्छा देताना अध्यक्ष बाबाजी भिसळे म्हणाले, ही अभिनव योजना महाराष्ट्रात आमचे ग्रंथालय सुरू करीत आहे. त्याचा मला अभिमान आहे. कार्यवाह अर्जुन बापर्डेकर म्हणाले, दिव्याने दिवा पेटतो त्याच पद्धतीने आम्ही दत्तक पालक प्रथम २५ वाचकांना दत्तक घेऊन त्यांच्या प्रगतीच्या आढाव्याच्या नोंदी वाचनालयात ठेवणार आहोत, जेणेकरून अन्य वाचनालयांना ही योजना सुरू करायची असल्यास ती माहिती मिळू शकेल. उपाध्यक्ष अशोक कांबळी म्हणाले, तरुण वाचक मोबाइलवरून पुन्हा पुस्तकाकडे वळण्यासाठी दत्तक वाचक पालक योजना खरोखरच मार्गदर्शक ठरेल.

यावेळी वाचनालय कार्यकारिणी सदस्य आणि सांस्कृतिक समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी वाचक दत्तक पालक म्हणून पदाधिकाऱ्यांसमवेत ऊर्मिला सांबारी, वैशाली सांबारी, दीपाली कावले, कामिनी ढेकणे, वर्षा सांबारी, भावना मुणगेकर, विलास आचरेकर यांनी पालकत्व स्वीकारण्याची घोषणा केली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply