मुरबाड (जि. ठाणे) : एखादा लेखक लिहितो, तेव्हा तो आपला काळ संरक्षित करत असतो. आपला परिसर, आपली संस्कृती जतन करत असतो. एक प्रकारे तो समाजाचे एक कार्य पार पाडत असतो. पुढच्या पिढीसाठी एक संचित तयार करत असतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक सायमन मार्टिन यांनी केले.
डॉ. यशवंत सुरोशे लिखित तरंग जावे गात या पुस्तकाचे प्रकाशन श्री. मार्टिन यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला एसएनडीटी विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक डॉ. किशोर देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान निवृत्त केंद्रप्रमुख उल्हास घोलप यांनी भूषविले. सोनावळे (ता. मुरबाड) येथे हा कार्यक्रम पार पडला.
सायमन मार्टिन पुढे म्हणाले की, आपण लिहीत राहिले पाहिजे. कोणी वाचत नाही म्हणून आपण लिहिण्याचे थांबता कामा नये. भविष्यात माणसे ऐकायची थांबतील. मग काय आपण बोलायचे थांबणार का? आपण वाचन करायला हवे. साहित्यामुळे संस्कृती टिकून राहते. संस्कृतीमुळे माणूस त्याचे माणूसपण टिकवून ठेवू शकेल. लेखकाला, साहित्याला टिकवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. यासाठी आपण वाचत राहायला हवे. एकीकडे आपली भाषा अस्तित्व गमावते की काय अशी भीती असताना नवी पिढी लिहिण्याचे धाडस करीत आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. ‘तरंग जावे गात’ या पुस्तकाच्या लेखकाने तो ज्या परिसरात वाढला आहे, ज्या क्षेत्रात कार्यरत आहे, ज्या माणसांमध्ये वाढला आहे, त्याबद्दल तो लिहीत आहे. ही गोष्ट खचीतच कौतुकास्पद आहे. आजूबाजूला गढुळलेले एकूण वातावरण पाहता मोकळ्या गळ्याने गाणे आणि अभिव्यक्त होणे हेच धाडसाचे ठरत आहे.
ते पुढे म्हणाले, पुस्तकातील लेख शिक्षक आणि शिक्षण याविषयी चिंतन मांडतात. शिक्षण कसे असायला हवे, शिक्षक कसा असावा हेही या लेखांमधून समजत जाते. मात्र बाहेरचे वातावरण चिंता करण्यासारखे आहे. शिक्षकांना नको त्या अशैक्षणिक कामात गुंतवून ठेवले आहे. यातून आपल्या समाजाचे भयानक नुकसान होत आहे. सर्वांत शेवटी ‘हसत हसत, जगत राहू’ अशी आर्त हाक त्यांनी दिली.
डॉ. किशोर देसाई यांनी ‘तरंग जावे गात’ या पुस्तकाचे समीक्षण केले. यातील लेख कथेच्या अंगाने लिहिलेले जणू ‘ललित लेख’ आहेत, असे वर्णन त्यांनी केले. काही लेख आत्मचरित्रात्मक झाले आहेत, तर काही लेख इतरांच्या अनुभवातून आले आहेत. विशेष म्हणजे या लेखांची भाषा स्थानिक आहे. ती लेखांच्या विषयाला साजेशी आहे. काही लेखातून लेखकाचा विनोदी स्वभाव अनुभवास येतो. गॅदरिंगची गंमत, हकीकतवाले विस्ताराधिकारी, ऑफीस ऑफीस, ऑनलाइन शिक्षणातील गमती या लेखातून निखळ विनोद अनुभवास येतो.
काही लेखांमधून लेखकाने एकूणच शिक्षण व्यवस्थेविषयी चिंतन मांडले आहे. सुमाची सहवेदना, पाटी आणि मी, पडलेली भाकरी यासारखे लेख मनाचा ठाव घेतात. आजही आपण कोठे उभे आहोत, याची जाणीव या लेखामंधून होत राहते. व्यवहारातील गुमान, घडवणारे शिक्षक, नवी दृष्टी, थव्यातलं पाखरू, ध्वजस्तंभ यासारखे लेख मनाला आशेचा नवा किरण दाखवतात. या पुस्तकातून ग्रामीण भागातील एकूणच शिक्षणाविषयीची दृष्टी आणि वस्तुस्थिती वाचकांसमोर मांडण्याचे कसब लेखकाने आपल्या पहिल्यावहिल्या पुस्तकातून केले आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी पाच भाग्यवान वाचकांना मान्यवरांच्या हस्ते तरंग जावे गात हे पुस्तक देण्यात आले.
ढोलताशे आणि लेझीम पथकाने मान्यवरांना कार्यक्रमस्थळी सन्मानाने आणण्यात आले. शाळकरी विद्यार्थिनींनी ‘गज वदना’ या प्रार्थनेवर कथ्थक नृत्य सादर केले. सोपान गोल्हे यांनी कवी सायमन मार्टिन आणि डॉ. किशोर देसाई यांचा परिचय करून दिला. राजाराम घुडे यांनी दोन्ही मान्यवरांचे शाल व पुस्तक देऊन स्वागत केले. भरत सुरोशे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमासाठी कवी विलास वेखंडे, नाटककार मेघराज घरत, लेखक वासुदेव सांबरे, कथालेखक लक्ष्मण घागस, सुधीर जोशी उपस्थित होते.




कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

