वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज प्रबोधिनीचे विसावे राष्ट्रीय अधिवेशन शनिवारपासून

रत्नागिरी : पप श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज प्रबोधिनीतर्फे येत्या १९ आणि २० ऑक्टोबर २०२४ रोजी विसाव्या राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन पावस येथे केले आहे.

या अधिवेशनाचे उद्घाटन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री नामदार श्रीपाद नाईक यांच्या हस्ते होणार आहे. प्रबोधिनी आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे-जोगळेकर महविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पावस येथील श्री स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिरात हे अधिवेशन होईल. पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती देण्यात आली.

अधिवेशनामध्ये पप श्री. वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांच्या साहित्यावर दोन्ही दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या जन्मशताब्दी वर्षापूर्वी स्वामीजींच्या श्री क्षेत्र गरुडेश्वर येथील समाधी स्थानी १९ आणि २० ऑक्टोबर २००२ रोजी नारायणकाका ढेकणे महाराजांच्या मार्गदर्शनाखाली वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज प्रबोधिनीची स्थापना झाली. स्वामीजींच्या संपूर्ण ग्रंथांचे प्रकाशन, विविध भाषांमध्ये भाषांतर, स्वामीजींच्या संपूर्ण जीवनकार्याचा प्रसार ही प्रबोधिनीची मुख्य उद्दिष्टे आहेत.

परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचा जन्म १८५४ साली सावंतवाडीजवळील माणगाव गावी एका सत्प्रवृत्त कुटुंबात गणेश टेंबे आणि सौ. रमाबाई यांच्या पोटी झाला. त्यांचे पाळण्यातील नाव वासुदेव होते. स्वामींनी श्री द्विसहस्री गुरुचरित्र, श्री दत्त पुराण, श्री दत्तलीलामृताब्धिसार, योगरहस्य आणि बोधरहस्यावर द्विसहस्री टीका चूर्णिका, श्री दत्त पुराणावर टीका, माघ माहात्म्य, श्री दत्त महात्म्य, श्री दत्त काव्य त्रिशती, श्री गुरुसंहिता (समश्लोकी), लघु वासुदेव मानससार, सप्तशती गुरुचरित्रसार, श्री कृष्णालहरी, श्री दत्तचंपू, कुमारशिक्षा, समश्लोकी चूर्णिका, श्री कृष्णालहरीवरील टीका, युवाशिक्षा आणि वृद्धशिक्षा, स्त्रीशिक्षा यासारखी फार मोठी ग्रंथसंपदा संस्कृत आणि मराठी या दोन्ही भाषेत निर्माण केली आहे.

याच ग्रंथांवर आणि संशोधनावर आधारित दोन दिवसांच्या पावस येथील अधिवेशनात सहभागी होण्याचे आवाहन प्रबोधिनीचे विश्वस्त सी. एस. नितीन देशपांडे, डॉ. श्वेता जेजुरकर, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी पत्रकार परिषदेत केले. हे अधिवेशन सर्वांसाठी खुले आहे. अधिक माहितीसाठी संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांच्याशी संपर्क साधावा.

पत्रकार परिषद

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply