रत्नागिरी : प. पू. स्वामी स्वरुपानंद जयंती उत्सवानिमित्त रविवार, दि. २२ डिसेंबर रोजी पहाटे साडेचार वाजता रत्नागिरीतील जयस्तंभ येथून पदयात्रेला प्रारंभ होईल. पदयात्रेचे यंदाचे बाविसावे वर्ष आहे.
प. पू. स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या रत्नागिरीकर नागरिकांनी अवीट गोडीचे ॐ राम कृष्ण हरि नामस्मरण करीत पहाटेच्या धुंद वातावरणात ज्ञानदेवांचा हरिपाठ गात पावसला जाण्याचा भक्तिमार्ग वर्षातून एकदा तरी अनुभवावा, म्हणजे नामाची गोडी काय असते, ते या वारीत अनुभवता येईल.
चालण्याने आरोग्याची चाचणी करता येते. आपला धीर, संयम किती आहे हे तपासून बघता येते. ही चालण्याची स्पर्धा नाही. पण आपले आरोग्य किती मजबूत आहे, श्वास किती खोलवर घेता येतो हे अजमावल्यामुळे आपल्या जगण्याला एक नवी उभारी येते. ही स्वामीनामाची मॅरॅथॉन आहे असे समजून स्तीत जास्त भक्तांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जाताना पहिला थांबा कोहिनूर हॉटेलजवळ, दुसरी विश्रांती फणसोप शाळेबाहेर, तिसरा थांबा रनपार फाट्यावर असेल. साधारणपणे पावस येथे सकाळी ९ वाजेपर्यंत पोहोचता येईल. त्यानंतर मंदिरासमोर फेर धरून नाचणे, अभंग सांगणे, नंतर शीण घालवण्यासाठी अल्पोपाहार, नंतर रत्नागिरी येथे परत असे वारीचे स्वरूप आहे. दमल्यामुळे दुपारी विश्रांती घ्यायला मोकळीक मिळेल. कारण हा सर्व कार्यक्रम रविवारी आयोजित केला आहे. सर्वांचा शक्यतो पांढरा ड्रेस असावा. पुरुषांसाठी पांढरी टोपी आवश्यक आहे. आवश्यक असल्यास पाणी बाटली आणावी व शक्यतो सर्वांनी नेहमीच्या वापरातले साधे चालण्याचे बूट, चप्पल घालावे. येताना आपले नाव, पत्ता व फोन नं. एका छोट्या कागदावर लिहून ते संयोजकांकडे द्यावे.
अधिकाधिक भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पदयात्रेविषयीच्या अधिक माहितीसाठी राजन पटवर्धन (९८६०३६६९९१) किंवा अनंत आगाशे (७०८३१६२९७५) यांच्याशी संपर्क साधावा, असे सूचित करण्यात आले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

