‘सर्व हिंदू धर्मीयांनी एकत्र येऊन देशसेवा करणे गरजेचे’

रत्नागिरी : ‘पतितपावन मंदिराच्या माध्यमातून स्पृश्य-अस्पृश्यतेची दरी मिटवली गेली आणि देशाचा स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र झाला. आजही देशाची एकात्मता राखण्यासाठी आणि देशाच्या रक्षणासाठी सर्व हिंदू धर्मीयांनी एकत्र येऊन देशसेवा करणे गरजेचे आहे,’ असे मत रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाचे अध्यक्ष राजीव कीर यांनी व्यक्त केले. दानशूर भक्तिभूषण श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या ८१व्या पुण्यतिथीनिमित्त आज (२४ फेब्रुवारी) रत्नागिरीत विशेष रॅली, सहभोजन आणि सहभजन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.

जातिभेद निर्मूलनासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विनंतीवरून भागोजीशेठ यांनी रत्नागिरीत स्वखर्चाने पतितपावन मंदिर उभारले. ते क्रांतिकारी पाऊल होते. त्या मंदिराचा कलशारोहण सोहळा २४ फेब्रुवारी १९३१ रोजी झाला होता. भागोजीशेठ यांच्या निधनानंतर बंद झालेला पतितपावन मंदिरातील सहभोजनाचा उपक्रम रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघ, पतित पावन मंदिर संस्था आणि अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ यांनी एकत्र येऊन २०२२ सालापासून पुन्हा सुरू केला. या उपक्रमाचे यंदा चौथे वर्ष असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजच्या सहभोजनातही सर्व जातींचे नागरिक उपस्थित होते, अशी माहिती राजीव कीर यांनी दिली. सहभजनातून भागोजीशेठ कीर यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. त्यात २१ भजनी बुवा कलाकारांनी आपली कला सादर केली, असेही राजीव कीर यांनी सांगितले. तत्पूर्वी सकाळी रत्नागिरीचे ग्रामदैवत असलेल्या भैरीच्या मंदिरातून निघालेल्या रॅलीचा पतितपावन मंदिरात समारोप झाला.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply