लांज्याच्या ‘स्थैर्य’ पुस्तकाला कोल्हापूरच्या ‘शिविम’ संस्थेचा पुरस्कार

रत्नागिरी : कोल्हापूर येथील ‘शिविम’ संस्थेचा ‘शिविम संकीर्ण साहित्य’ पुरस्कार लांजा येथील लेखिका डॉ. सौ. विजयालक्ष्मी विजय देवगोजी यांनी लिहिलेल्या ‘स्थैर्य’ या पुस्तकाला मिळाला आहे. रत्नागिरीच्या सत्त्वश्री प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. ‘शिविम’ म्हणजेच शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ ही कोल्हापूरमधील मराठी शिक्षक, प्राध्यापक यांच्यासाठी कार्य करणारी संस्था आहे. शिवाजी विद्यापीठाच्या अखत्यारीत येणाऱ्या महाविद्यालयांमधील मराठी शिक्षकांची ही संस्था गेली पंधरा वर्षे मराठी विषयासाठी सातत्याने कार्य करीत असून विद्यार्थी, मराठी भाषा शिक्षकांसाठी, मराठी भाषेसाठी तिचे मोठे योगदान आहे. चालू घडामोडींवर मराठी विषयाशी निगडित नियमित अधिवेशन आणि चर्चासत्रे संस्थेतर्फे घेतली जातात. संस्थेचे त्रैमासिकही प्रकाशित केले जाते. ते यूजीसी मान्यताप्राप्त आहे.

संस्थेमार्फत मराठी विषयाशी निगडित वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात आणि विविध पुरस्कार जाहीर केले जातात. संस्थेचा २०२५ सालचा ‘शिविम संकीर्ण साहित्य’पुरस्कार डॉ. विजयालक्ष्मी देवगोजी यांना ‘स्थैर्य’ या कलाकृतीसाठी देण्यात आला. हा पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग विभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांच्या हस्ते शिविमच्या नाइट कॉलेजमध्ये झालेल्या अधिवेशनात प्रदान करण्यात आला.

डॉ. विजयालक्ष्मी देवगोजी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या लांजा शाखेच्या उपाध्यक्ष आहेत. रत्नागिरीतील कोकण मीडियाच्या सत्त्वश्री प्रकाशनाने त्यांच्या स्थैर्य या पुस्तकाची निर्मिती केली आहे. कर्नाटकातील ” दोंबिदास” या भटक्या विमुक्त जातीजमातीतील संघर्षपूर्ण जीवन जगत प्रतिभा व अथक मेहनतीच्या जोरावर सनदी अधिकारी बनलेल्या नागराज कुप्पे या अधिकाऱ्याने अलेमारिय अंतरंग हे कन्नड भाषेतील आत्मकथन लिहिले. पुस्तकाला कर्नाटक साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. या पुस्तकाचा डॉ. विजयालक्ष्मी देवगोजी यांनी मराठी भाषेत सुरेख, अभ्यासपूर्ण अनुवाद केला आहे. गैरसोयींची ढाल करून पळवाटा काढणाऱ्या तरुणाईला नागराज कुप्पेंचे व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी ठरावे व त्यांनी आपले ध्येय साकार करावे, यासाठी या पुस्तकाचा प्रवास कन्नड, हिंदीनंतर आता मराठी भाषेपर्यंत झाला आहे.

अजि म्या परदेस पाहिला, अशी घडली राजस्विनी, माझी पीएचडी – एक ध्यासपर्व आदी पुस्तके डॉ. विजयालक्ष्मी देवगोजी यांनी लिहिली आहेत.

स्थैर्य हे पुस्तक ई-बुक रूपातही उपलब्ध असून, त्यासाठी https://play.google.com/store/books/details/?id=1TUQEQAAQBAJ या लिंकवर क्लिक करावे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply