Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

आढावा बैठकांची औपचारिकता

Advertisements

नेमेचि येणारा पावसाळा सुरू झाला आहे. हवामान खात्याच्या लेखी हा पूर्वमोसमी पाऊस आहे. मोसमी पाऊस अजून यायचा आहे. हवामानशास्त्रानुसार ते खरे असले तरी आता जो पाऊस पडला आहे, तो पावसाळ्याची आठवण करून देणाराच आहे. नेहमी येणाऱ्या पावसाळ्याच्या आसपास दरवर्षी आढावा बैठकांचा पूर येतो. अशीच एक बैठक पालकमंत्री उदय सामंत यांच्या पदसिद्ध अध्यक्षतेखाली रत्नागिरीत झाली. रत्नागिरी शहरात गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी खोदलेले रस्ते महानगर गॅस कंपनीने निकषानुसार पूर्ववत करावेत आणि पालिकेने त्यावर लक्ष ठेवावे, अशी सूचना पालकमंत्र्यांनी या बैठकीत केली. गॅस पाइपलाइनचे काम तसे गेली अनेक वर्षे सुरू आहे. रस्ते खोदल्यानंतर ते पूर्ववत करणे ही संबंधित कंपनीची जबाबदारी असते. मग ती कंपनी गॅसची असो, महावितरणची असो किंवा टेलिकॉमची असो. पाणीपुरवठ्यासाठी खोदलेले रस्तेसुद्धा पूर्ववत करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेची असते. त्यामुळे त्या यंत्रणांना सूचना देण्याची तशी काही आवश्यकता नसते. तरीही त्यांना सूचना द्याव्या लागत असतील तर ते प्रशासनाचे अपयश आहे. सर्वसामान्य नागरिक त्रास सहन करत दैनंदिन जीवन जगत असतो.
रस्ता, गटारे, त्यांची साफसफाई ही कामे रत्नागिरी किंवा कोणत्याही पालिकेशी संबंधित आहे ती वेळच्या वेळी व्हायलाच हवीत; पण जिल्ह्यात सर्वत्र जी विकासकामे आणि प्रामुख्याने महामार्गाची कामे सुरू आहेत, त्याकडेही लक्ष द्यायला हवे. आढावा घ्यायला हवा; पण तसे ते दिसत नाही. मुख्य रस्त्यावरून रत्नागिरी रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या आणि स्थानकाकडून मुख्य रस्त्यावर येणाऱ्या रस्त्याची जुळणी व्यवस्थित केलेली नाही. त्यामुळे स्थानकाकडे जाणारी आणि स्थानकाकडून येणारी वाहने अक्षरशः आपटतात. पालकमंत्री या रस्त्याने महिन्यातून किमान आठ वेळा स्थानकावर जातात. एवढ्या वेळा जाऊनही पालकमंत्र्यांनी या रस्त्याची पोलिसांच्या भाषेत सांगायचे तर विशिष्ट परिस्थिती लक्षात घेतलेली नाही किंवा त्यांच्या वाहनाला या खड्ड्यांचा धक्का बसत नसावा.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्ग अशा दोन महामार्गांचे काम रत्नागिरी जिल्ह्यात सध्या सुरू आहे. ते जोमाने सुरू आहे असे म्हणण्यासारखी स्थिती नाही. ते संथगतीनेच सुरू आहे. रत्नागिरी शहराजवळील साळवी स्टॉपचा परिसर, तेथून हातखंब्यापर्यंतचा रस्ता, हातखंबा, पाली, लांजा बाजारपेठ या महत्त्वाच्या ठिकाणी रस्त्यांचे चौपदरीकरण आणि त्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या पुलांची उभारणी सुरू आहे. मुख्य रस्त्यांच्या बाजूला सर्व्हिस रोड केले जाणार असल्याचे सांगितले जाते. काही ठिकाणी तसे रस्ते दिसतातही; पण मुख्य रस्त्यावर कोठे वळायचे, सर्व्हिस रोडवर कसे जायचे, सर्व्हिस रोडवरून मुख्य रस्त्यावर कसे यायचे, महामार्गाच्या मधोमध असलेल्या दुभाजकामुळे त्यावरील एकदिशा मार्गाकडे कसे जायचे, याचे कोणतेही नियोजन दिसत नाही. तसे योग्य ते फलक दिसत नाहीत. त्यामुळे सर्वच मार्गावर दुहेरी वाहतूक सुरू आहे. या वाहतुकीचे ठीक आहे; पण पावसाळ्यात या सर्व ठिकाणची स्थिती अत्यंत गंभीर होणार आहे. अनेक अपघात घडणार आहेत. त्यातील काही प्राणघातकही असू शकतील, अशी स्थिती आहे. सर्वसामान्य माणसांच्याही ही बाब लक्षात येते. पण पालकमंत्र्यांसारख्या जबाबदार व्यक्तीला ती जाणवत नाही आणि जाणवत असेल तर त्याबाबतचा आढावा घ्यावा असे त्यांना वाटत नाही, हे नागरिकांचे दुर्दैव आहे. त्याची त्यांना सवयही झाल्यामुळे कोणीही त्याबाबतची प्रतिक्रिया व्यक्त करत नाही एवढेच. नियमाप्रमाणे आढावा बैठकांची औपचारिकता पार पडेल. अधिकारी सुस्कारा सोडतील. नागरिकांचे हाल सुरूच राहतील. ते सारेसुद्धा पावसाळ्याप्रमाणे नेमेचि होणार आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version