कुडाळ : येथील एमआयडीसीत अवघ्या १५ दिवसांत बसवण्यात आलेल्या युनायटेड एअर गॅस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ६ के. एल. क्षमतेच्या लिक्विड ऑक्सिजन रिफिल प्लांटचे ऑनलाइन उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज झाले.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’, ‘मी जबाबदार’ या योजनेप्रमाणे करोनामुक्त गाव योजनेकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष केंद्रित करावे. छोटी छोटी जबाबदारी स्वीकारून सांघिकप्रमाणे जिल्हा करोनामुक्त करण्याचे मोठे काम करावे. आरोग्य सुविधा बळकट करण्याला शासन प्राधान्य देत आहे. भविष्यात पुढची लाट आलीच तर त्यासाठी ऑक्सिजनची क्षमता वाढवणे, आरोग्य सुविधा वाढवणे, चाचण्यांची क्षमता वाढवणे याचे नियोजन आतापासूनच करावे. कोकणच्या किनाऱ्यावर नेहमीच नैसर्गिक संकटे येत असतात. पाऊस, कधी अतिवृष्टी तर कधी चक्रीवादळ अशा संकटांबरोबरच कोविडचाही मुकाबला करत आहात. केवळ मुकाबला न करता एक एक पाऊल पुढे टाकत आहात. तोही आगदी आत्मविश्वासाने. त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून कौतुक करतो. पुढच्या संकटाची गंभीरता कमी करण्यासाठी तजवीज करणे आणि त्याचबरोबर संकट येणारच नाही त्यासाठी ही नियोजन करणे महत्त्वाचे आहे. सध्याच्या प्लांटची क्षमता 20 के.एलपर्यंत वाढवावी. त्याचबरोबर मागील अनुभव पाहता जिल्ह्याला भासलेल्या ऑक्सिजनची आवश्यकता पाहून तशी तरतूद करून ठेवावी, असेही श्री. ठाकरे यांनी सूचित केले.
ते पुढे म्हणाले, शासनाकडून आवश्यक ती सुविधा जिल्ह्याला दिली जाईल. जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा पडता कामा नये. त्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी प्लांट उभे करावेत. लोकप्रतिनिधींनी मतदार यादीप्रमाणे करोनामुक्तीसाठी काम करावे. सर्वप्रथम ‘माझे घर करोनामुक्त’ या मोहिमेवर भर द्यावा. करोनाचे संकट मुळापासून उपटून फेकायचे आहे. त्यासाठी आतापासूनच जिल्ह्याच्या आरोग्य सुविधांची क्षमता वाढवण्यासाठी नियोजन करावे. ज्याप्रमाणे विक्रमी वेळेत ऑक्सिजन प्लांट उभा केला, तसाच जिल्हाही करोनामुक्त करून राज्याला दिशा दाखवावी, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
यावेळी पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर ऑनलाइन सहभागी झाले होते. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, सहायक जिल्हाधिकारी संजित मोहोपात्रा, एमआयडीसीचे क्षेत्रीय संचालक अविनाश रेवणकर, जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, युनायटेड एअर गॅस कंपनीचे अतुल नलावडे, अमोल नलावडे, सचिन आम्रे, संजय पडते, संदेश पारकर, अमित सामंत, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसीलदार अमोल पाठक आदी यावेळी प्रत्यक्ष उपस्थित होते.
उदय सामंत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२ अद्ययावत रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. मॉड्युलर ओटीची संकल्पना घेऊन सिंधुदुर्ग, सावंतवाडी, कणकवली, कुडाळ या ४ ठिकाणी त्याची उभारणी करण्यात येणार आहे. ऑक्सिजनमध्ये जिल्ह्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी दोन ऑक्सिजन प्लांट उभे केले आहेत. सावंतवाडी आणि कणकवलीलादेखील ऑक्सिजनचे प्लांट उभे केले जातील. तालुक्याच्या ठिकाणीही ऑक्सिजन प्लांट असावा, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. काही ठिकाणी जिल्हा नियोजनमधून प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात ५६५ ऑक्सिजन बेड आहेत. त्यामध्ये एक हजारपर्यंत वाढ केली जाणार आहे. तिसऱ्या लाटेला सामोरे जाताना आवश्यक ती सुविधा, साधनसामग्रीसह उभी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सारस्वत बॅँक, काही उद्योजक, काही स्वयंसेवी संस्था यांनीही सीएसआर फंडामधून योगदान दिले आहे.
खासदार राऊत म्हणाले, जाहीर केलेल्या मिशन ऑक्सिजनअंतर्गत अवघ्या १५ दिवसांत ६ के.एल चा प्लांट उभा राहिला. यासाठी एमआयडीसीसह गतिमान प्रशासनाचे कौतुक करतो. आमदार वैभव नाईक यांनीही यावेळी या प्लांटमुळे ऑक्सिजनची गैरसोय दूर होईल, असे सांगून लसीकरणाचे डोस वाढवून द्यावेत, अशी मागणी केली. आमदार दीपक केसरकर यांनी वेंगुर्ले रुग्णालयाचे उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी स्वागत, प्रास्ताविक करत ऑक्सिजन प्लांट उभारणीबाबतची सविस्तर माहिती दिली. प्लांट उभारणीबाबतची छोटी चित्रफित दाखविण्यात आली. मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशीष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन हे ऑनलाइन सहभागी झाले होते.
Follow Kokan Media on Social Media

